Join us  

फक्त १ गोष्ट ठरवा आणि रोज करा, सगळं काही आयुष्यात तुमच्या मनासारखं घडेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2022 5:01 PM

आपण आईवडील, शिक्षक, बॉस यांचं कायम ऐकतो, स्वत:चं कधी ऐकतो का? जे ठरवलं ते करतो का?

ठळक मुद्देआपण आपलं ऐकायचंच असतं हे आपलं  प्रोग्रामिंग आपणच केलं तर आपलं जगणं आपल्या कण्ट्रोलमध्ये येईल. 

आपल्याला अनेक गोष्टी कळतात पण वळत नाहीत. म्हणजे रोज लवकर उठून व्यायाम करावा, असं आपल्याला वाटतं आपण करत नाही. कधी वाटतं, फिटनेसवर काम करायला हवं आपण करत नाही. मागचं सारं सोडून द्यायला हवं, माफ करायला हवं लोकांना पण आपण करत नाही. अनेकदा वाटतं स्वत:साठी वेळ काढावा, आपल्या आवडीचं काम करावं आपण करत नाही. त्याला आपण वेळ नाही असं लेबलही चिकटवतो. मात्र ते ही खरं नसतं. मग खरं काय असतं? अनेक गोष्टी आपण इचछा असूनही का करत नाही?त्याचं कारण आपण आपल्याशी बोलत नाही.बोललो तरी स्वत: स्वत:च्या ऑर्डर फॉलो करत नाही.आपण आपल्याच शब्दाला किंमत देत नाही.बघा, तुम्ही ठरवता की, मी नियमित व्यायाम करायला हवा. पण बॉस ने सांगितलेलं काम त्याच दिवशी करता, तसं हे स्वत: सांगितलेलं काम का करत नाही?तुम्ही म्हणता आज कामाचं योग्य नियोजन करणार, करत नाही.कारण तेच आपला आपल्यावर कण्ट्रोल नाही.

(Image : google)

मग तो कण्ट्रोल कसा आणायचा?

रोज रात्री झोपताना स्वत:शी बोलायला हवं. काय चांगलं झालं, काय चुकलं, याचा हिशोब रोज ठेवायचा.उद्या कोणत्या चुका टाळायच्या हे स्वत:ला बजावायचं आणि तेच करायचं.एका दिवशी एक बदल करा, ठरवून एकच गोष्ट करा. पण आपलं ऐकतो जे ठरवतो तेच होतं ही भावना एकदा मनाला कळली की मग ते आपोआप आपलं ऐकायला लागतं. मी, माझं घर, माझं शिक्षण / नोकरी / व्यवसाय, माझा परिसर, या चारही गोष्टींमधलं तुम्ही जे काही ठरवाल, ते का करताय याबद्दल आपल्याच मनात पुरेसा स्पष्टपणा असेल, तरच हे जमेल. उदा. ‘रोज का चालायचं?’ याचं उत्तर तुमच्याकडे ठामच हवं. काय केलं म्हणजे काय साध्य होईल, किती दिवसात साध्य होईल असं टार्गेट सेटिंग आपल्याला जमायला हवं. नवीन शिकण्याच्या गोष्टी जमतात ना, ठरवलेल्या एखाद्या गोष्टीत यश मिळालं तरी आपल्याला उत्साह मिळतो.आपल्या मेंदूला आपणच ‘प्रोग्राम’ द्यायला हवा. शाळेत शिक्षकांचं ऐकायचं, घरात पालकांचं ऐकायचं आणी नोकरीत बॉसचं ऐकायचं यात इतर माणसं आपलं प्रोग्रामिंग करत असतात. तसं आपण आपलं ऐकायचंच असतं हे आपलं  प्रोग्रामिंग आपणच केलं तर आपलं जगणं आपल्या कण्ट्रोलमध्ये येईल. आणि मग खरोखर गोष्टी आपल्या मनासारख्याच घडू लागतील.

टॅग्स :मानसिक आरोग्य