गौरी पटवर्धन
घरातले ताणतणाव मॅनेज करणं हे अत्यंत तणावपूर्ण काम घरातल्या बायकांना बहुतेक वेळा करावं लागतं. त्याच्याच बरोबरीने त्यांना स्वतः कायम हसतमुख राहण्याचं प्रेशरही असतं.घरात वेळीअवेळी पाहुणे येऊ देत, भांडणं होऊ देत, अडचणी असू देत, पैशांचे ताण असू देत… घरातल्या स्त्रीने सतत प्रसन्न आणि हसतमुख असावं अशी एक अलिखित अपेक्षा असते. नवऱ्याला स्ट्रेस असेल तर तो चिडचिड करू शकतो, घुम्यासारखा गप्प बसून राहू शकतो, मित्रांबरोबर बाहेर जाऊ शकतो, दारू पिऊ शकतो. पण घरातल्या स्त्रीने मात्र शक्यतो चिडचिड करू नये. कधी केलीच तर त्यामुळे बिघडलेलं वातावरण पुन्हा हसतं खेळतं करण्याची जबाबदारी ही तिचीच असते.स्त्रीने शांत असावं असंच तिला लहानपणापासून शिकवलेलं असतं. घरातलं कोणी फटकन काहीतरी बोललं, अपमान केला तरी तिने तो निमूटपणे गिळायचा असतो. म्हणजे उलट उत्तरं द्यायची नाहीत, चिडचिड करायची नाही हे तर आहेच, पण वाकडं तोंड करून सुद्धा बसायचं नाही. रडायचं तर नाहीच नाही.घरात असलेल्या या सगळ्या अपेक्षा अशाच्या अश्या कामाच्या ठिकाणीही केल्या जातात. टीम लीड करणाऱ्या स्त्रीने लीडरपेक्षाही घरातल्या कर्त्या स्त्रीच्या भूमिकेत राहून टीमला सांभाळून घ्यावं अशी अपेक्षा असते. टीमच्या सदस्यांमधल्या भावनिक ताणतणावांचं नियोजन तिने करावं अशी अपेक्षा तिच्याकडून आपोआप केली जाते. तिने चुका करणाऱ्यांना सांभाळून घ्यावं, समजावून सांगावं... आणि हे सगळं करून रिझल्ट मात्र पुरुष सहकाऱ्यांइतकेच द्यावेत अशी अपेक्षा असते. कामाच्या ठिकाणी बायका वाहात असलेला इमोशनल लोड हा अजूनच एक वेगळा विषय आहे.
पण घरातल्या या सततच्या भावनिक कसरतींनी तिची दमछाक होते. सतत होणाऱ्या भावनांच्या या कोंडमाऱ्याचा तिच्यावर अतिशय गंभीर आणि खोलवर परिणाम होऊ शकतो. पण हे सगळं तरीही तिलाच रेटत रहावं लागतं, कारण घरातल्या इतर सदस्यांना अशा प्रकारच्या भावनिक मॅनेजमेंटचं ट्रेनिंग कोणी दिलेलं नसतं. खरं म्हणजे तिलाही ते कोणी दिलेलं नसतं, पण आपण उलटून बोलायचं नाही, समोरच्याचं ऐकून घ्यायचं अशा ‘मुलगी’ संस्कारांमुळे ती ते हळू हळू करायला शिकते.
हा इमोशनल लोड एकट्या स्त्रीला फार होतो, हे खरं. पण मग हा प्रश्न सोडवायचा कसा?
१. पहिलं म्हणजे घरातल्या इतर सदस्यांचा स्वभाव तापट, विचित्र, हळवा वगैरे आहे याचं कौतुक करणं बंद करायचं.२. सर्व सज्ञान व्यक्तींनी आपापले भावनिक इश्यूज सोडवायला शिकलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं. त्यासाठी मुलं अठरा वर्षांची होईपर्यंत त्यांना सतत पाठीशी न घालता त्यांचं म्हणणं स्वतः मांडण्याची सवय लावायची.३. सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातलं वातावरण हे घरातल्या सर्व सदस्यांवर अवलंबून असल्यामुळे ते चांगलं ठेवण्याची जबाबदारी फक्त घरातल्या स्त्रीची नाही हे इतर सदस्यांनी आणि घरातल्या स्त्रीने लक्षात ठेवायचं. ४. आणि फार विषय डोक्याबाहेर जायला लागला तर सरळ त्यातून अंग काढून घ्यायचं. इतर माणसं सुद्धा माणसंच आहेत. तेही त्या परिस्थितीतून काहीतरी शिकून आपापला मार्ग काढतील यावर विश्वास ठेवायचा!