संवाद ही माणसाची गरज असून विविध टप्प्यावर आपण समाजातील विविध घटकांशी संवाद साधत असतो. संवादातून विचारांची, भावनांची, माहितीची देवाणघेवाण होते. त्यामुळे संवादाला बरेच महत्त्व आहे. इतरांशी संवाद साधताना आपण स्वत:शीही संवाद साधायला हवा असे म्हटले जाते. त्यामुळे आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येते आणि स्वत:ची ओळख होणे सोपे जाते. मात्र याचे प्रमाण जास्त झाले तर आपले मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. सतत स्वत:शी संवाद साधणे किंवा आपल्याच विचारांमध्ये गुंग असणारी लोकं आपण आपल्या आजुबाजूला पाहतो. मात्र अशा लोकांना सतत स्वत:शी संवाद साधल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कधी झोप न लागणे तर कधी विसरभोळेपणा अशा समस्या या लोकांना भेडसावतात. हे लोक स्वत:च्याच विश्वात गर्क राहतात. आता हे विचार थांबवण्यासाठी नेमके काय करता येईल पाहूया.
१. मोठ्याने बोला
तुम्ही आयुष्यात ज्या समस्यांचा सामना करत आहात, तुम्हाला जे प्रश्न आहेत किंवा निर्णय घेण्यासाठी ज्या अडचणी येतात त्याविषयी आपण सामान्यपण स्वत:शी संवाद साधत असतो, म्हणजेच विचार करत असतो. अशाप्रकारे फक्त विचार करत बसण्यापेक्षा मोठ्याने बोला. हे काहीवेळा वेडेपणाचे वाटू शकते. पण यामुळे तुमच्या डोक्यातील विचार कमी होतील आणि तुम्ही ज्या प्रश्नांचा, अडचणींचा सामना करत आहात ते सुटण्यास मदत होईल.
२. विचारांकडे योग्यपणे लक्ष द्या
आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात सतत काही ना काही विचार सुरू असतात. हे विचार डोक्यातून जावेत म्हणून आपण तयाकडे दुर्लक्ष करतो. मात्र असे न करता या विचारांकडे नीट लक्ष द्या. त्यामुळे डोक्यात हा एकच विचार सतत येत राहणार नाही. आपले म्हणणे आपणच नीट ऐकले तर तो विचार डोक्यातून जायला मदत होईल. डोळे मिटून ५ ते १० सेकंदात डोक्यात सतत आणणाऱ्या विचाराचा पूर्णपणे विचार करा.
३. वेगवेगळे आवाज काढा
आपल्या डोक्यात सतत एकामागे एक वेगवेगळे विचार येत असतील तर डोकं शांत करण्यासाठी वेगवेगळे आवाज मोठ्याने काढायला हवे. यामध्ये आपण विमानाचा, घडाळ्याचा एखाद्या मशीनचा, ट्रेनचा असे कोणतेही आवाज काढू शकतो. लहानमोठ्या विविध प्रकारच्या आवाजांमध्ये तुमच्या विचारांमध्ये खंड आणण्याची ताकद असते. त्यामुळे असे आवाज काढून बघा.
४. ध्यान किंवा योगा करा
योगा आणि ध्यानधारणा हा अनेक उपायांवरील एक उत्तम उपाय आहे. ध्यान करत असताना आपण डोळे मिटून काही वेळासाठी शांत बसतो. त्यामुळे आपले मन एकाग्र होण्यास मदत होते. इतकेच नाही तर शांत बसल्याने डोक्यात विचार येतात आणि जातात. त्यांचा निचरा होत असल्याने त्यानंतर आपोआपच डोके शांत होते. त्यामुळे रोजच्या रोज न चुकता योगा आणि ध्यान करायलाच हवे.