अश्विनी बर्वे
अस्तिवाच्या लढाया सतत आपण देत असतोच, अगदी जन्मापासूनच. आपण रडतो, हसतो, वाट्टेल तसे जगतो. आपल्या अस्तित्त्वाच्या खाणाखुणा सांगत असतो. कधीकधी स्वत:चं अस्तित्त्व विसरुनही जगतो. तसे अनुभव घेतो. पण हे सारे तसे थोडेच. एरव्ही कायम आपण मी, मी, माझे माझे, मी केले म्हणत इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो.
हे सारं मनात येता येता मला आठवलं एक विठ्ठलाचं छोटंसं मंदिर. बोळकांड्यातून रस्ता काढत देवळाजवळ पोहचले. स्वच्छ,सुंदर आवार आणि तितकंच सुंदर, स्वच्छ देऊळ. शांत विठोबा,भक्तांची ये-जा ही शांतच. एकदम प्रसन्न वाटावं असं हे देऊळ पाहून खूप समाधान वाटले. देवळात आणि देवळाच्या बाहेर एक सुंदर रांगोळी काढलेली होती..
ती रांगोळी पहिली आणि वाटलं,जाणून घ्यावं त्या व्यक्तीला. कारण ती रांगोळी फार मनापासून काढलेली दिसत होती. त्यातील रेषा कलाकाराच्या संवेदनशीलतेच्या होत्या. शिवाय रांगोळी काढणाऱ्या त्या व्यक्तीला स्वतःचे अस्तित्व फक्त त्या रांगोळी पुरतेच आहे असं दाखवायचे होते. मला त्या रांगोळीने काहीतरी नवीन समजल्यासारखे वाटले.
(Image :Google)
वाटलं आपण किती धावपळ करतो आपल्या एखाद्या रेषेसाठी, शब्दांसाठी, आपलं अस्तित्व जाणवून देण्यासाठी शहरं हवी आहेत, जाणकार हवे आहेत. कोणाची सूक्ष्म टीका आपल्याला दुःखी करते. तर कोणी केलेले कौतुक जगण्यालायक बनवते. किती लाचार आणि दिनदुबळे होत आहोत आपण. आपलं अस्तित्व इतरांनी मान्य करावं म्हणून किती झटणार आहोत? या रांगोळीच्या रेघेइतकी बेफिकिरी का नाही आपल्यात? त्या व्यक्तीला वाटलेच नसेल का कोणी आपल्याला छान म्हणावे? काय असेल तिच्या मनात?
मला खूप अस्वस्थ वाटले. अजून एक गोष्ट त्या रेघेत मला जाणवली, अप्रतिम निष्ठा. आपलं काम चोख,प्रामाणिकपणे आणि तितकेच निष्ठेने करण्याचे बळ त्या रेघेत होते. समोरच्या विठोबाचे अस्तित्व जणू त्या व्यक्तीला रोज जाणवत असावे किंवा कोणी सांगावे तो सखा रोज त्या रांगोळीसाठी तिच्याकडे हट्ट धरत असावा. ते त्यांचे गुपितही असेल.
ते पाहून क्षणभर वाटलं. म्हणजे स्वतःच्या स्वीकृतीसाठी दुसऱ्याचे अस्तित्व हवेच हा दांभिकांचा कायदा मी विसरतच नाही.
बाहेरच्या जगाचा माणसावर किती परिणाम होत असतो. अंतर्मनाला कशाला हवे आहेत हे उपचार, ते या बाह्य उपचारापासून स्वतंत्र ,मुक्त असू शकत नाही का? निश्चित असणार. हो ती रांगोळीची रेघ मला हाच विश्वास जणू देत होती.
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)