होतं काय की अनेक लोक फिरायला जातात. मजेत असतात कुटूंब आणि मित्रमैत्रीणींसह. त्याचे फोटो टाकतात. वाटतं सगळं जग आनंदात आहे आपल्यालाच एकटेपणा खातो. एकटेपण आणि एकाकीपण अतिशय बोचतं, छळतं. डाचतंही. पण बोलायला कुणी नसतं. अलिकडे एक फॉरवर्ड् खूप गाजले. ज्यात म्हंटलं होतं की, तुम्हांला एकटे वाटत असेल, जीव द्यावासा वाटत असेल, तर एक कप कॉफी प्यायला माझ्याकडे या. माझे दार खुले आहे. खचलेल्या, आत्महत्या करायला प्रवृत्त होणाऱ्या, एकटं वाटणाऱ्या अनेकांना हे सांगणं होतं की मी आहे सोबत. पण असं कुणी म्हणालं म्हणून आपण भडभडून बोलू का मनातलं कुणाशीही?
एकटं वाटणं, ही एक भावना आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकाला मनात येत असते. कधी थेट एकटे नसाल. भरल्या घरात एकटे असाल. मित्र यादीत, फोनच्या लिस्टमध्ये शेकडो नावे सेव आहेत आणि तरीही गरजेला कोणी नाही, असे होतेच. आजूबाजूला माणसं खूप. पण बोलायला कोणी नाही, हे वाटणे अजूनच एकटे पाडते आपल्याला. "मला कोणी समजूनच घेत नाहीत", "माझ्याबाबत नेहमी गैरसमजच केले जातात", असे वाटते.
त्यातून माणसांवर विश्वास ठेवायलाही आपण कचरतो. आणि मग एकटेपणाचा बोगदा अजूनच जास्त अंधारा होऊ लागतो.
(Image :google)
वर्ष सरता सरता एकटेपणाची ही सल अशी मनात असेल तर काय करता येईल?
१. सोपं नसतं एकटेपणाशी डील करणं हे आधी मान्य करु.
२. मग शोधू आपली जीवाभावाची माणसं. आपल्याला वाटत असलं की आपल्यासोबत कुणी नाही तरी तसं नसतं. आपल्यावर आपली माणसं चिडू शकतात पण त्यांना आपली काळजी असतेच. त्या काळजीपोटी ते आपल्या मदतीला येतात.
३. मदत मागा. त्यात कमीपणा काही नाही. बोला, मन मोकळं करा, चिडा. जगात एकटे वाटणारे प्रसंगी अतिशय बिचारे वाटणारे आपण काही एकटेच नसतो.
४. मुळात आपला प्रश्न काय हे शोधा. उत्तर तर सापडेलच.
५. सगळ्यात महत्त्वाचं ताप आला की आपण मलाच का ताप आला म्हणून कुढत नाही औषध घेतो. तसं मनाला बरं नाही तर मनाच्या डॉक्टरकडे जाऊन औषध घेण्यात काहीच कमीपणा नाही. आपल्या आनंदापेक्षा जगात तसंही मोठं काहीच नसतं.