Join us  

‘फ्रेण्ड्स’ खूप आहेत पण मनातलं बोलायला ‘आपलं’ कुणीच नाही, असं खूप एकेकटं वाटतं तुम्हाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 6:15 PM

मनातलं बोलायलाच कुणी नाही असं म्हणताना, आपल्याला मनातलं सांगता येतं का, असं विचारा स्वत:ला, लोक का आपल्या मनातलं ओळखतील?

ठळक मुद्दे‘फ्रेण्ड्स’ खूप आहेत पण मनातलं बोलायला ‘आपलं’ कुणीच नाही, असं खूप एकेकटं वाटतं तुम्हाला?

प्राची पाठक

आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना चांगले मार्क्स मिळतात आणि पटापट भारीतल्या नोकऱ्या लागतात, असे आपल्याला वाटत असते. मग ते "सेटल" वगैरे होतात, लग्न करून. त्यांना मिळालेले जोडीदार सुद्धा भारीतलेच असतात. त्यांचे सगळे कसे चौकटीबद्ध असते आणि "वेळच्यावेळी" होते. आपली गाडी कुठल्या आडरस्त्याला जाऊन खड्ड्यात पडते, कळत नाही. ट्रॅक सोडूनच चालते ती! किंवा कोणा त्यांची प्रगतीची फास्ट बुलेट ट्रेन असते आणि आपली कायम बैलगाडी. आपल्या आयुष्यातल्या कुठल्यातरी "त्यांचे" कसे सगळे मस्तं सुरु आहे आणि माझे मस्तं सुरु नाही, असे सातत्याने वाटतेय का? मग थांबू जरा, विचार करू. आपण सारखंच दुसऱ्यावर भिंग रोखून का बसले आहोत? आपण आपल्या नजरेत भारी ठरायला करतोय तरी काय? कुठे कमी पडतोय आपण ते विचारू स्वतःला. मनात असूयेचा, तुलनेचा खेळ खेळत बसण्यात काही मजा नाही बॉस.फ्लॅशी असे काहीच नाहीये आपल्याकडे, असेच सारखे वाटत राहते. त्यांनी आपल्याला त्यांच्यात घेतले नाही की आपल्या आयुष्याला काही अर्थ उरला नाही, आपल्यात मजेदार असे काहीच नाही, आपली पर्सनॅलिटी धड नाही, असेही बरेच काय काय मनात यायला सुरुवात होते. जणू मनाचा ताबा घेऊन टाकतात हे विषय. दुसरं काही सुचत नाही. झोप उडते. खाण्यापिण्यावर लक्ष नसते. घरात काही बोलायची सवयच केलेली नसते. त्यामुळे, घरातले आणि आपण दोन वेगवेगळ्या ध्रुवांवर चढून बसलेलो असतो. एकटेपण आणखीन वाढत जाते. जीव नकोसा होऊन जातो. त्यात शरीराचे काही वेगळेच सुरु असते. कधी आपल्या आवाक्यातले केमिकल लोचे असतात, तर कधी आपल्या समजेच्या बाहेरचे आणि नकळत घडणारे. 

(Image : Google)

अशा कोणत्याही एकटं पाडणाऱ्या क्षणी आपल्या मनातली धोक्याची घंटा वाजली पाहिजे मोठ्याने. तिचा आवाज आपण नीट ऐकला पाहिजे. मनातले बोलायला सुरवात केली पाहिजे. कदाचित एकदम जमणार नाही. पण जसे मोबाईलमध्ये काहीतरी डाऊनलोड करतांना आपण जे जसे समोर येईल, तसतसे हॅन्डल करत जातो, एकट्याने प्रयत्न करत जातो आणि शेवटी हवी ती गोष्ट डाऊनलोड करून घेतोच, तसेच हे शिकायचे असते. आपल्या डोक्यात डाउनलोड करायचा, आपल्याच मनाच्या आरोग्याचा विषय!

(Image : Google)

त्यासाठी काय करायचं?

१.  केवळ मोकळेपणी मनातले बोलायला शिकण्याने आपल्या मनातल्या अनेक कचकची दूर होऊ शकतात. उगाच एवढ्या तेवढ्या कारणांनी झोप उडायची, निराश व्हायची, तहानभूक विसरायची गरज नसते, ते आपल्याला स्वानुभवातून कळायला लागते. २. आपल्यासाठी सगळ्यांत सुरक्षित असा शेअरिंगचा वाटा आपल्याच घरात उचलला जाऊ शकतो. सध्या असे कोणी नसेल, तर हळूहळू तसे नाते डेव्हलप करायची जबाबदारी सुद्धा आपलीच असते. कोणाशी बोलून आपल्याला छान वाटते, बरे वाटते असे आपल्याला वाटते, ते शोधायचे. त्या व्यक्तीच्या सोयीनुसार दोन घटका मागून घ्यायच्या आणि बोलून टाकायचे जे असेल ते.३. घरातली माणसं महत्त्वाची. आपल्यासाठी मदतीला धावून येणाऱ्यांमध्ये हे असे काही लोक असतात. त्यापलिकडे मग आपले मित्रमैत्रिणींचे विश्व असते. तिथेही अगदी दिलखुलास बोलता येईल, असे कोणी असतात. शेजार-पाजाऱ्यांमध्ये सुद्धा असा मनाचा सोबती कोणी सापडू शकतो.४.  परंतु, कुठेच कोणीच आपल्यासाठी नाहीतच, अशी आपली खात्रीच झालेली असेल, तर एखाद्या मानसतज्ज्ञाला, समुपदेशकाला जरूरच गाठावे. आपल्या शरीराला आपण चांगले ठेवायचा बऱ्यापैकी प्रयत्न करतो. 

(Image : Google)

मुख्य मुद्दा कसं करायचं?

१. मनातले बोलायचे आहे, हे स्वतःला बजावणे ही पहिली टीप.२. मनातले बोलायची सवय करणे. मनात नेमके बिनसले काय, ते नीट मांडता येणे. त्यासाठी ते आपल्याला पुरेसे समजलेले असणे.आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष समोर असतील असे कोणी, ज्यांच्याशी आपण मोकळेपणी बोलू शकू आणि आपली गुपिते तिथे सुरक्षित राहतील असे आपल्याला वाटते, त्यांच्याशी छान नाते डेव्हलप करायचे. त्यात त्यांची सोय सुद्धा बघायची. नाहीतर, मी निवडले नां ह्यांना, तर ह्यांनी वेळ दिलाच पाहिजे, मैत्री केलीच पाहिजे माझ्याशी अशी सक्ती नको. ३. ठराविक दिवसांनी स्वतःलाच विचारायचे. काय बाबा, कसे सुरु आहे तुझे? सगळे ठीक नां? जेवण खाण, झोप, व्यायाम, हाताला-डोक्याला पुरेसे काम आहे नां? रुटीन कसे सुरु आहे? त्यात काय सुधारता येईल? करायची आपलीच एक चेक लिस्ट आणि ती अधिकाधिक उत्तमरित्या फॉलो करत जायचे. लगेच फरक जाणवेल आपला आपल्यालाच. जगायला नवा हुरूप येईल. लाईफ ट्रॅक सोडणार नाही. मग पुढचा प्रवास झकासच होणारच.

(लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :मानसिक आरोग्य