प्राची पाठक
"मला कोणी समजूनच घेत नाही" ही एक फार अस्वस्थ करणारी भावना आहे. एकटं पाडणारी भावना. असं मनात येतंच ना आपल्या कधी ना कधी. की आपल्याला कुणीच समजून घेत नाही. एकीकडे घरातले, नातेवाईकांमधले आपण आणि दुसरीकडे मित्र मैत्रिणींमधले, कामाच्या ठिकाणचे आपण. स्पर्धा, हेवेदावे, नात्यांमधले ताण. सगळ्या ताणांमधले आपण!
म्हंटलं तर, आपल्या भोवती मित्र मैत्रिणींचा गराडा, नातेवाइक आहेत. सोशल मीडीयावर दोस्त आहेत. गप्पा मारायला लोकच लोक आहेत. सतत आपल्याभोवती कोणी ना कोणी असते. पण त्यांच्याशी बोलता येत नाही. त्यांना आपण बोललेले कळेल असे वाटत नाही. फोन, नेट हातात आहे. सगळी संवाद माध्यमे हाताशी आहेत. पण संवाद कसा, किती, कुणाशी साधावा, तेच कळत नाही. त्या संवादात मनातले असे किती असते? की निव्वळ हल्ला गुल्ला? वरवरचे बोलणे? कोणाशी धीर करून बोलायला गेले, तरी "आता वेळ नाही, नंतर बोलू" असे ऐकविले जाते. कधी नसतोही कुणाला वेळ. इतरांच्याही प्रायोरिटी लक्षात घेऊन त्यांच्याशी बोलावे लागते. पण बोलायचे कसे? इथेच तर सगळे अडलेले असते.
आणि एवढं करुन बोलावं की नाही, हे मनातून जात नाहीच.
कुणी असले जवळचे, तरी आपली गुपिते सुरक्षित राहतील का त्या व्यक्तीकडे की आपल्या माघारी आपली खिल्ली उडविली जाईल, असे वाटते.
कुणाशी बोलायचे? मनातले? कुठून सुरुवात करायची? काय बोलायचे? काहीच कळत नसते. फक्त प्रश्नच असतात.
घरात तरी काय वेगळं चित्रं असतं? त्यात घरातल्यांच्या अपेक्षा असतात काय- काय. घरात एकत्र राहतो आपण, पण मनातले बोलतो का त्यांच्याकडे तरी? त्यांनाही आपले काही समजूनच घेता येणार नाही, असेच सारखे वाटत राहते. कोंडमारा नुसता. एकटं वाटायला लागतं ते अशावेळी.
एखादी व्यक्ती कशी समोरच्याच्या मनातले बरोब्बर ओळखते, ह्याच्या कौतुकाच्या अनेक गोष्टी आपण वाचत असतो. असे सिनेमे पाहत असतो. निदान आपल्या घरातल्या लोकांनी तरी आपल्याला समजून घेतले पाहिजे, असे वाटते. पण कोणाला तुमच्या मनातले अगदी ऑटोमॅटिक कळणार नाहीये. "याने हे समजून नको का घ्यायला", "कळत नाही का इतकेसे", असे डायलॉग्स मनात येतातच.
पण या अपेक्षा योग्य असतात का?
दुसऱ्याला काही वेगळा, जास्तीचा डोळा असेल, तरच तुमचे विश्व जाणून घेता येईल त्याला. नाहीतर तुमच्या मनात एखादा स्कॅनर हवा. जो तुमच्या भावना, तुमचे विचार स्कॅन करून दुसऱ्याच्या डोक्यात धाडेल, जसेच्या तसे!
पण असं होत नाही. मात्र एक नक्की की, सांगताच येणार नाहीत, अशी खरोखर कोणतीच दुःखे नसतात, हे डोक्यात फिक्स करून टाका. हळूहळू मनातले बोलायची सवय करायला लागते त्यासाठी. कितीतरी शाळा- कॉलेजांमध्ये, वेगवेगळ्या तोंडी परीक्षा, मुलाखतींमध्ये मुलामुलींना नाव विचारले, स्वतःविषयी दोन ओळी सांगा म्हटले की आवाज एकदम खोल जातो अनेकांचा. काय बोलावे कळत नाही. अगदी हळू आवाजात, तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलून मोकळे होतो मग आपण. खरी सुरुवात तर आपलेच नाव आत्मविश्वासाने, समोरच्याला ऐकू जाईल इतपत मोठ्याने बोलण्यापासून करावी लागेल. ग्रुपमध्ये आपण कुठे गेलो, कुणा नातेवाईकांकडे गेलो, तर खासकरून मुली "तुम्ही म्हणाल ते... ", "काहीही चालेल" अशी उत्तरे देतात. ती ही बुजऱ्या आवाजात. स्वतःला काय म्हणायचे आहे, ते कळण्यासाठी थोडा विचार करावा लागतो. सततच छोट्या- छोट्या निर्णयांची निवड इतरांवर सोपवून द्यायची सवय तोडावी लागते. त्यातूनच हळूहळू आपण बोलायला शिकू. आपण जितके मनातले बोलायची/मांडायची सवय करू, तितके एकटेपण दूर जाईल.
"तुला चहा हवा की कॉफी की सरबत?" ह्या प्रश्नाच्या छोट्याश्या उत्तरापासून आपण बोलायला सुरुवात करून बघायची का?
याचे उत्तर "तुम्ही म्हणाल ते",
"काहीही चालेल",
असं उत्तर दिलं तर समोरच्यानं मनातलं ओळखून आपल्याला काय द्यावं अशी अपेक्षा असते?
तेच आपण आयुष्यात करतो. इतरांनी आपल्याला समजून घेण्याचा खेळ खेळतो.
तो बंद करायला हवा, बोलायला हवं. स्पष्ट. मनमोकळे.
( लेखिका मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)