Join us

घरभर वस्तूंचा पसाराच पसारा? चटकन आवरा नाहीतर, तुमच्या आयुष्यातला आणि घरातला आनंदच हरवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2025 18:17 IST

आपण जमवलेल्या वस्तू आणि आपला आनंद यांचा ‌थेट संबंध आहे, असं सांगितलं तर?

ठळक मुद्देजेवढ्या वस्तू आपण जमवल्या तेवढ्या आवश्यक आहेत का, याचा विचार नक्की करायला हवा.

समजा, ठरवलंच की आपल्याकडे अशा किती वस्तू आहेत ज्या ‘आवश्यकच’ आहेत, त्यांच्याशिवाय नाहीच जगता येणार? तर  किती वस्तू असतील? कपडे, बॅगा, बूट, मोबाइल, पैशाचं पाकिट, केसाला लावायच्या तेलाची बाटली, अंगाचा साबण, हॅण्डवॉश, सॅनिटायझर ते स्वयंपाकाची भांडीकुंडी करायलाच घेतली यादी तर किती वस्तूसंख्या होईल एकुण? यासगळ्या वस्तू खरंच गरजेच्या आहेत?

आजकाल सतत फॉरवर्ड येतात की जगण्यामरण्याचा क्षण आहे आणि फक्त एकच वस्तू घेऊन तुम्हाला घराबाहेर पडायचं आहे तर तुम्ही काय न्याल? या प्रश्नाचं कामचलाऊ उत्तर देता येतं पण आपल्याला जीवापाड गरज असलेली खरंच अशी कोणती वस्तू असते? मुळात असते का?गरज आणि शौक, हव्यास आणि हावरट खरेदी, वस्तूसंग्रहाची आवड आणि सवय हे सारं नक्की कशातून येतं हा मोठ्याच शोधाचा विषय आहे. सध्या जगभर त्याचा अभ्यास सुरु आहे. फोर्ब्ज मासिकात नुकताच एक लेख ‘जर्नल ऑफ पॉझिटिव्ह सायकॉलॉजी’च्या हवाल्याने प्रसिध्द झाला आहे. अमेरिकेतील नॉर्थ टेक्सासमध्ये जोशुआ हूक यांनी हा अभ्यास केला. त्यांचे निष्कर्ष सांगतात की मिनिमिलिझम आणि हॅपीनेस यांचा जवळचा संबंध तर आहेच पण मानसिक स्वास्थ्य आणि स्थैर्य यांचाही त्यांच्याशी थेट संबंध दिसतो.

 

जितका पसारा कमी, तितका आनंद जास्त, कामावर आणि वर्तमानावर फोकस जास्त, मन:शांती जास्त आणि भरभरुन जगण्याची आस जास्त, मन ताळ्यावर. मिनिमिलिझमचा मन:शांती आणि आनंद यांचा काय संबंध आहे, तो कशातून येतोय आणि वस्तूसंचय आनंदाला का कात्री लावतो यावर त्यांचा अधिक अभ्यास सुरु आहे. आनंदानं शांतपणे जगणं माणसांना या नव्या ‘हॅव मोअर’ म्हणत सतत वस्तूंचा मारा करणाऱ्या बाजारपेठीय जगात शक्य आहे का?

रॉब ग्रीनफिल्डची नावाचा ३५ वर्षांचा माणूस. आणि सध्या त्याच्याकडे फक्त ४४ वस्तू आहेत. त्या तेवढ्याच वस्तूत तो सुखानं आनंदात जगतो आहे.त्याचं म्हणणंच आहे की केवळ ४४ वस्तूत तुम्ही आनंदानं जगू शकता. आता त्यातल्याही काही कमी करता येतील का असा त्याचा प्रयत्न आहे.इतक्या कमी वस्तूत आपण जगू शकतो का हा प्रश्न आहेच. पण जेवढ्या वस्तू आपण जमवल्या तेवढ्या आवश्यक आहेत का, याचा विचार नक्की करायला हवा.

 

टॅग्स :मानसिक आरोग्यमहिलासुंदर गृहनियोजनलाइफस्टाइलआरोग्य