Lokmat Sakhi >Mental Health > बाकीचे आनंदात दिसतात आणि आपणच मरमर करतो असं वाटतं तुम्हाला?

बाकीचे आनंदात दिसतात आणि आपणच मरमर करतो असं वाटतं तुम्हाला?

आपलं व्यक्तिमत्व आणि आपलं काम यांची रेशीमगाठ आपसूक पडली तर ठीक नाहीतर ती बांधता आली पाहिजे, नाहीतर ना कामात यश ना कामाचा आनंद. बघा पटतंय का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:12 PM2021-03-07T16:12:42+5:302021-03-10T13:39:25+5:30

आपलं व्यक्तिमत्व आणि आपलं काम यांची रेशीमगाठ आपसूक पडली तर ठीक नाहीतर ती बांधता आली पाहिजे, नाहीतर ना कामात यश ना कामाचा आनंद. बघा पटतंय का ?

do you think that all others are happy and but we are exhausted and tired? | बाकीचे आनंदात दिसतात आणि आपणच मरमर करतो असं वाटतं तुम्हाला?

बाकीचे आनंदात दिसतात आणि आपणच मरमर करतो असं वाटतं तुम्हाला?

Highlightsनुसतं धुसफूसत बसण्यात काय अर्थ आहे?

समिंदरा हर्डीकर-सावंत

माधुरी एका प्रख्यात हॉटेलमध्ये फ्रंट ऑफिस सांभाळते. हसरी. प्रसन्न.  स्वभाव बोलका, लाघवी. सहज लोकांना बोलतं करणारी. कुणी चिडून बोललं तरी हसून उत्तरं देणारी. तिची कामं चटचट होतात. ती फ्रेश दिसते. कामाचा जरासुद्धा ताण तिला जाणवत नाही. 
त्याउलट रीना. माधुरीपेक्षा हुशार. कामाला तर वाघ. माधुरी तरी टाइमपास करते, पण रीना मात्र कामात चोख. हिशेबात काटेकोर. एक शब्द अधिकवजा बोलत नाही. मात्र कुणी नाहीते किंवा फुटकळ प्रश्न विचारले की तिची चिडचिड होते. लोकही या मॅडम खूप चिडतात म्हणून तक्रार करतात, ती कायम स्ट्रेसमध्ये दिसते.
असं का होत असेल? काम तेच, मुली दोन्ही गुणी. एक जास्त कामसू तरी तिच्याविषयी तक्रारी, दुसरी मात्र काम फार न करताही लोकप्रिय. 
त्याचं कारण असं की माधुरीचं व्यक्तिमत्व फ्रण्ट ऑफिस जॉबसाठी एकदम योग्य आहे. रीना मात्र हिशेबात चोख, त्यामुळे लोकांशी आघळपघळ बोलण्यापेक्षा ती काम करते, आकडेमोड प्रिय. ती अकाऊण्टसमध्ये असती तर एकटीनं उत्तम काम केलं असतं. लोकसंपर्क हा तिच्या व्यक्तिमत्वाचा भाग नाही, तसा माधुरीला आकडेमोड-हिशेब जमत नाही.
फरक इतकाच की माधुरीला तिच्या व्यक्तिमत्वाला साजेसं काम मिळालं, रीनाला मिळालं नाही.
त्यामुळे हे लक्षात ठेवायला हवं की आपलं व्यक्तिमत्त्व सावलीसारखं सतत आपल्याबरोबर असतं. आपण काय बोलतो, काय करतो, कुठल्या गोष्टींकडे आकर्षित होतो, या सर्व निर्णयांवर आपल्या व्यक्तिमत्वाची सावली पडतेच. साहजिकच आपण कोणते करिअर निवडतो यातही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा वाटा असतो. त्याच बरोबर ते काम आपण कशा प्रकारे निभावतो हे देखील आपले व्यक्तिमत्त्व निश्चित करतं.
व्यक्तिमत्त्व आणि कामात विसंगती असली तर आपण आपल्या व्यवसायिक जीवनात सतत असमाधानी राहतो. अर्थात, आपल्या आवडीचे करिअर जरी आपण निवडलं, तरी त्याची रेशीम गाठ आपल्याला आपल्या व्यक्तिमत्त्व बरोबर बांधता आलीच पाहिजे. 
आता हे कसं जमावं?
मुळात हे समजून घ्यायला हवं की आपलं व्यक्तिमत्व कसं आहे. त्यात चांगलं वाईट काही नसतं, ज्याचे त्याचे आपापले गुणविशेष असतात.
त्यामुळे स्वत:ला स्वीकारा!


त्यासाठी काय करायचं?
१. सर्वप्रथम आत्मपरीक्षण करा. आपले महत्त्वाचे गुण काय आहेत, याची योग्य तशी नोंद घ्या. तुम्ही शांत स्वभावाचे आहात की तापट, अंतर्मुखी आहात की बहिर्मुखी, लोकांबरोबर पटकन मिसळता की ओळख व्हायला वेळ लागतो, विचारपूर्वक स्वभावाचे आहात की उत्स्फूर्त  अशा अनेक पैलूंचा विचार करा. वाटल्यास जवळच्या माणसांची त्यासाठी मदत घ्या. अचूक आणि शास्त्रोक्त मार्गाने करायची असेल तर सायकॉलॉजिकल टेस्टचा वापर करा. मनोवैज्ञानिकांनी अशा अनेक व्यक्तिमत्व चाचण्या तयार केल्या आहेत, त्यातून आपलं व्यक्तिमत्व समजतं. गुगल करुन पहा, काही चाचण्या तर तुम्हाला मोफतही ऑनलाइन मिळतील.
२. आता तुमच्या कामाकडे वळा. तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या कोणत्या गुणांचा खास उपयोग तुम्हाला कामा मध्ये होतो. असे तुमच्या बाबतीत कुठे होते ते पहा.
ज्या गोष्टी त्रासदायक आहेत, त्यांचा आपल्या कामावर तर प्रतिकूल परिणाम होणारच, तो कसा कमी करता येईल हे पहा. दृष्टीकोन बदला. प्रतिक्रिया बदला.
३.  व्यक्तिमत्त्व बदलणं सोपं नाही. त्यासाठी विलक्षण चिकाटी, जिद्द, तसेच वेळ पाहिजे. बरेचदा स्वभाव बदलण्याचीही गरज नसते, फक्त स्वत: मध्ये  थोडे सकारात्मक बदल केले की काम सोपं होतं.
४. कामातला आनंद आणि भराभराट हवी असेल, ताण कमी करायचा असेल तर हे सारं करावं लागेल. नाहीतर मग नुसतं धुसफूसत बसण्यात काय अर्थ आहे.

(लेखिका क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि दिशा काऊन्सिलिंग सेण्टरच्या संचालक आहेत.)
samindara@dishaforu.com
http://www.dishaforu.com

Web Title: do you think that all others are happy and but we are exhausted and tired?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.