गौरी पटवर्धन
सततच्या मेंटल लोडमुळे, सतत काम केल्याने बायका चिडचिड्या होतात. पण हे घरातलं सगळं काम आपणच करायचं असतं हे त्यांच्या मनावर इतकं पक्कं ठसलेलं असतं, की आपली चिडचिड कशामुळे होते आहे हे त्यांनाही कळत नाही. पण इतर लोक नुसते बसून आहेत किंवा आपल्याला नुसत्या ऑर्डर सोडतायत किंवा फर्माईशी करतायत आणि आपण एकट्या सकाळपासून रात्रीपर्यंत घाम गाळत सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत नुसत्या घरभर धावतोय यातला अन्याय त्यांना जाणवतोच. पण तो बोलून दाखवण्याची सोय नसते. एखाद्या बाईने ती घरच्यांसाठी काय करते याचा हिशोब मांडून दाखवला की ती लगेच घरातली व्हिलन, व्हॅम्पायर वगैरे ठरते. तिचे संस्कार काढले जातात. तिच्या आईवडिलांचा उद्धार केला जातो. आणि या सगळ्याला तोंड देऊन स्वतःची बाजू लावून धरणं तिला शक्य होत नाही. कारण स्वतःच्या हक्कांसाठी बोलण्याची शिकवण तिला कोणी दिलेलीच नसते. इन फॅक्ट स्वतःच्या हक्कांबद्दल बोलायचंच नाही हीच शिकवण मुलींना घराघरातून दिलेली असते.मग सुरु होतं बायकांचं मनात कुढणं. आपण नुसतीच मरमर करतो. आपली कोणाला किंमत नाही. अशी भावना मनात खोलवर रुजायला लागते. मग त्या स्वतःशी, पण इतरांना ऐकू जाईल अशी पुटपूट, कटकट, बडबड करायला लागतात.इतकं करते मी… पण आहे का कोणाला काही?एक गोष्ट धड माझ्या मनासारखी होत नाही.कितीही केलं तरी यांची मनं भरणार आहे का?अशी धुमसणारी वाक्य मग घराघरातून ऐकू यायला लागतात. मग आई चिडचिड करते, बायको उगाच कटकट करते अशी लेबल्स त्यांना लावली जातात. या सगळ्यातून त्या एखादं काम मुलाला किंवा नवऱ्याला सांगतात. तेही काम जर का तो विसरला तर त्यावरून त्या सतत टोमणे मारतात आणि हे सगळं कशामुळे बिघडतंय ते मात्र कोणालाच कळत नाही.
काही घरातले सदस्य म्हणतात, तू सांग काय काम करायचं आहे ते. आम्ही करतो.काहीच न करणाऱ्यांपेक्षा असे लोक केव्हाही चांगले. पण तरीही त्यांच्या हे लक्षात येत नाही, की जोवर ते एखादं काम पूर्ण जबाबदारी घेऊन करत नाहीत, तोवर त्या बाईवरचा त्या कामाचा मेंटल लोड कमी होत नाही. म्हणजे तिने समजा नवऱ्याला सांगितलं, की दहा मिनटात स्वयंपाक तयार होईल. तोवर ताटं घेऊन जेवायला बसायची तयारी कर. तर नवरा काय काय घेतो तर बहुसंख्य ठिकाणी ताटं, वाट्या, पाणी प्यायची भांडी आणि पाणी. ते ही एकाजागी गोळा करुन ठेवतो. अन्न किचनमध्येच. तरी मग आपण कशी बायकोला मदत केली म्हणून स्वतःवर खूश होऊन तो फोन घेऊन बसतो. आणि मग ती दहा मिनिटांनी घाम पुसत येते. आणि त्याच्यावर चिडते,अरे तुला सगळी तयारी करायला सांगितली होती ना मीहो मग ही काय केलीये ना… तो बावचळतोच.अशी तयारी आपण केली असती तर नवऱ्याची आई आपल्याला काय काय बोलली असती आणि आपले कसे संस्कार काढले असते ते तिच्या मनात येऊन जातं. मग ती पुन्हा चिडायला लागते आणि मदत करुनही ही का चिडचिड करते हे त्याला कळत नाही.
(लेखिका पत्रकार आहेत.)