Lokmat Sakhi >Mental Health > आपण एकदम भंगार -बंडल आहोत, म्हणून काहीच धड होत नाही असं वाटतं तुम्हाला?

आपण एकदम भंगार -बंडल आहोत, म्हणून काहीच धड होत नाही असं वाटतं तुम्हाला?

आपल्यातच काहीतरी कमी आहे, आपलंच सगळं चूकतं असंही वाटतं? मग तुमच्या सेल्फ एस्टिमशी जरा चार गप्पा मारा, बघा तसं खरंच आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 02:45 PM2021-03-16T14:45:38+5:302021-03-16T14:57:31+5:30

आपल्यातच काहीतरी कमी आहे, आपलंच सगळं चूकतं असंही वाटतं? मग तुमच्या सेल्फ एस्टिमशी जरा चार गप्पा मारा, बघा तसं खरंच आहे का?

do you think we have nothing? its always your fault? self esteem is the key to succses. | आपण एकदम भंगार -बंडल आहोत, म्हणून काहीच धड होत नाही असं वाटतं तुम्हाला?

आपण एकदम भंगार -बंडल आहोत, म्हणून काहीच धड होत नाही असं वाटतं तुम्हाला?

Highlightsस्व ओळखीच्या मदतीनं आपण आपल्या, कुटुंबियांच्या , मित्र मैत्रिणींच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह निर्माण करु शकतो. हीच आहे या स्व ओळखीची खरी ताकद.

- डॉ. धारव शहा

‘तुम्ही किती चांगला स्वयंपाक करता’अशी दाद तुम्हाला कुणी दिली तर तुम्ही काय करता?
कुणी छान धन्यवाद म्हणेल पण अनेकजणी काय म्हणतात, त्यात काय एवढं, माझ्यापेक्षा चांगलं करणाऱ्या खूप जणी आहेत!’ असं म्हणणं म्हणजे कुण केलेलं कौतुकच नाकारणं. ते न स्वीकारणं. आता सांगा, जर आपल्याला आपल्या चांगल्या गोष्टीचं कौतुक स्वीकारता येत नसेल तर आपण आपली चांगली ओळख कशी तयार करु शकू? आपणच आपल्या कामाला महत्व देणार नसू तर इतर लोक ते का देतील? स्व प्रतिमा , स्वत:ची ओळख निर्माण करायची असेल तर आधी कौतुक स्वीकारयला शिका. त्यासाठी फार काही करावं आणि म्हणावं लागत नाही. आपल्या केलेल्या कौतुकाला ‘थॅंक्स’ म्हणून दिलेली दाद आपल्यालाच मदत करते.
पण हा विषय त्याहून महत्वाचा आहे, प्रश्न आहे की तुम्ही स्वत:ला ओळखता का? ओळखून आहात, की स्वत:विषयी काही माहितीच नाही तुम्हाला? सेल्फ एस्टीमचं काय तुमच्या?


स्व -ओळख  आपल्या जीवनात खूप महत्त्वाची आहे. आपण कल्पनाही करु शकणार नाही इतक्या मार्गानी ही स्व ओळख आपल्या जगण्यावर परिणाम करत असते. जर एखादी व्यक्ती म्हणत असेल की मी खूप स्मार्ट आहे, कोणतंही आव्हान स्वीकारायला खूप सक्षम आहे तर तिचा आत्मविश्वास पहा. ती व्यक्ती लोकांना अतिशय आत्मविश्वासाने सामोरी जाते. त्या व्यक्तीला भरपूर मित्र-मैत्रिणी असतात. त्या व्यक्तीचा असा विश्वास असतो की ती व्यक्ती जीवनात काहीही मिळवू शकते. ती व्यक्ती उत्साहानं मोठमोठी आव्हानं स्वीकारते. तिला पूर्ण खात्री असते, इतरांविषयी नाही तर स्वत:विषयी. त्यामुळे इतर लोकं आपल्याबद्दल काय विचार करतायेत याची तिला अजिबात पर्वा नसते. त्याचाच परिणाम म्हणजे ती व्यक्ती जीवनात आनंदी आणि यशस्वी होते.
त्याउलट अशा काहीजणी असतात. ज्यांना कायम वाटतं की आपण चांगल्या नाही, पुरेशा सक्षम नाही, आपल्यात काहीच खास नाही. त्या कायम दु:खी आणि जगताना असमाधानी असतात. त्यांना वाटतं की, बाकीचे लोकही आपल्याबाबत असाच असा विचार करत असतील.  लोकं आपल्याबद्दल काय विचार करतील अशी चिंताही सतत छळते. अतिशय संवेदनशील, हळवं होणंही मग घडतंच. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतल्या जातात. स्वत:ला कमी लेखण्याच्या वृत्तीमुळे  त्यांना असं वाटतंच नाही की कुणी आपल्याला आदरानं आणि सन्मानानं वागवेल. म्हणून मग आपल्याशी कोणी चुकीचं वागलं, अन्याय झाला तरी वाईट वाटण्यापलिकडे ते काही करत नाही. काही करण्याचा आत्मविश्वास त्यांच्याकडे नसतो. असं  स्वत:ला कमी लेखण्याचा परिणाम म्हणजे नातेसंबंधात त्यांना सतत अपमानास्पद वागणूक मिळते.
यातला सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे ज्या व्यक्ती स्वत:ला कमी लेखतात त्या मूळात मूर्ख किंवा अकार्यक्षम असतात असं नाही. आपण कमी आहोत हा केवळ त्यांच्या मनात निर्माण झालेला चुकीचा समज असतो. 
त्यामुळे ही समज काढून टाकून  स्वत:विषयी समतोल विश्वास निर्माण करायला हवा. तो मग वास्तवातही उतरतो. त्यामुळेच आपण  एक निरोगी स्व ओळख निर्माण करायला हवी. स्व आदर जोपासायला हवा.
प्रयत्न केलं तर ते जमू शकतं..

स्वत:बद्दलचा हा कमीपणाचा भाव कुठून निर्माण होतो.


१. आपल्याला आपणच कमी वाटायला लागतो कारण आपल्या आजूबाजूला, घरात , मित्र मैत्रिणींच्या गटात किंवा कामाच्या ठिकाणची एखादी वरिष्ठ व्यक्ती सतत टीका करत असते. पण अशा परिस्थितीत स्वत:ला कमी लेखण्याची चूक करण्यापेक्षा जी व्यक्ती सतत टीका करत असते तीच अपरिपक्व आणि निराश असते हे आधी समजून घ्यावं. त्याच्या टीकेनं आपण दुखी होण्यापेक्षा त्या व्यक्तीचीच ही समस्या आहे . आपला दोष नाही हे स्वत:ला सांगाव. हे जरी आपण समजून घेतलं तरी सतत टीकेचा खूप नकरात्मक प्रभाव स्व ओळखीवर होतो.
२. त्यामुळे सतत टीका करणाऱ्यांना टाळावं. आणि ज्या व्यक्ती आपल्यातील चांगल्या गोष्टींना मनापासून दाद देतात त्यांच्या संपर्कात जास्तीत जास्त वेळ राहावं हा एक चांगला उपाय.
३. पण आपल्याकडून काही चूक झाली, किंवा कशात तरी आपण कमी आहोत असं आपल्याला वाटत नाही का? तसं होत नाही का?  तर होतं. मात्र त्यासाठी स्वत:ला कमी लेखायची काय गरज आहे. जी व्यक्ती काम करते ती चूूका करतेच. चूका होणं हे आपण नवीन काहीतरी करुन बघतोय, काहीतरी अवघड करुन बघण्याचा प्रयत्न करतोय याचं लक्षण आहे. त्यामुळे चुकणं म्हणजे कमी पडणं नव्हे.
४. चांगलं नेतृत्त्व हे नकळत झालेल्या चुकांवर कधीच टीकेचा भडिमार करत नाही. चुका होतातच. फक्त त्या चुकांमधून आपण काय शिकतोय याला ते महत्त्व देतात. एक्सपर्टबद्दल एक व्याख्या आहे. जो व्यक्ती आपल्या क्षेत्रात असंख्य चुका करते आणि त्यातून शिकते, ती व्यक्ती तज्ज्ञ असते.

५.साहजिकच आहे की काम करताना आपल्याकडून चुका होणार. आपल्यात काही कमतरता असणार. या चुका आणि कमतरताच तर आपल्याला माणूस बनवतात. सचिन तेंडुलकर अभ्यासात कच्चा होता. त्याला गाणं आणि आणखी शंभर गोष्टी येत नव्हत्या. पण त्याबद्दल कोणाला काहीच वाटत नाही. तसंच मी एक मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि तरीही मी तोतरं बोलतो याबद्दल मला अपराध्यासारखं वाटावं की मी तोतरं बोलत असूनही मी चांगला कौन्सिलर आणि प्रभावी वक्ता होण्याचं प्रशिक्षण घेतलं याबद्दल अभिमान बाळगावा.
तुम्हाला काय वाटतं मी काय करावं?
६. आपण जे काही काम करतो त्याबद्दल आपल्याला अभिमान असायला हवा. डॉक्टर, शिक्षक, सेल्सवुमन, सफाई करणारे आणि आणखी ही बरीच काम करणारी माणसं समाज उत्तम चालवण्यास खरंतर हातभारच लावत असतात. त्यामुळे आपल्या प्रत्येकाला आपल्या कामाचा अभिमान असायला हवा. अनेक गृहिणींना आपण नोकरी वगैरे काही करत नाही, नुसतेच नवऱ्याचे पैसे खर्च करतो ही सल असते. स्वत:बद्दल असा नकारात्मक विचार करताना आपण घर सांभाळतो, सगळ्यांच्या खाण्यापिण्याची, आरोग्याची काळजी घेतो म्हणून नवरा बिनदिक्कत ऑफिसचं काम करु शकतो, मुलं नीट अभ्यास करु शकतात या वास्तवाकडे त्या पूर्णपणे दुर्लक्ष करतात. जर तुम्ही स्वत:च स्वत:च्या कामाला, आपल्या भूमिकेला महत्त्व देणार नसू तर मग इतरांकडून आपण कशी अपेक्षा करणार?
७. काहींना वाटतं की आपल्यातल्या चांगल्या गोष्टींचा जर आपण अभिमान बाळगला तर आपण उर्मट ठरु. त्यामुळे इतरांनी केलेल्या कौतुकालाही ते त्यात काय विशेष अशाच स्वरुपाची दाद देतात. 

 

स्व ओळखीसाठी व्हॉटसॲप ग्रूप


स्व ओळख , स्व प्रतिमा चांगली होण्यासाठी एक चांगली आणि सोपी युक्ती आहे. ती म्हणजे आपल्या कुटुंबियांचा किंवा आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींचा एक व्हॉटसॲप ग्रूप करावा. या ग्रूपवर प्रत्येकानं आपलं छोटं मोठं यश शेअर करावं. यामुळे आपल्या चांगल्या गोष्टींवर स्वत: बोलण्यातला संकोच निघून जातो. शिवाय आपल्या यशावर इतरजण ज्या प्रतिक्रिया देतात त्यामुळे आपली स्व ओळख निर्माण व्हायला, ती विकसित व्हायला मदत होते.
स्व ओळखीच्या मदतीनं आपण आपल्या, कुटुंबियांच्या , मित्र मैत्रिणींच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह निर्माण करु शकतो. हीच आहे या स्व ओळखीची खरी ताकद.


(लेखक एम.डी. सायकॅट्रिस्ट अर्थात मनोविकार तज्ज्ञ आहेत.)
dharavshah@gmail.com
you tube- dharav shah

Web Title: do you think we have nothing? its always your fault? self esteem is the key to succses.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.