दसरा, सण मोठा नाही आनंदाचा तोटा. आपण सारं घर तर लख्ख करतोच. अगदी दसऱ्याला आपापली गाडी धुवून काढून हार घालतो. शस्त्रपूजा करतो. तसं आपण घरातल्याही अनेक साठवलेल्या गोष्टी डिक्लटर करतो का? म्हणजे काढून टाकतो का? आणि आपल्या मनाचं काय? मनात साचलेलं, नकोसं.राग लाेभ, संताप, जुन्या आठवणी त्या आपण कशा पुसून काढणार? कधी डीलीट मारणार आठवणींचे नकोसे फोल्डर. किती काळ आपली मेमरी वाया घालवायची नकोशा गोष्टीत विचार करा?घराप्रमाणे मनातही आपण किती अनावश्यक पसारा आपण उगाच साठवून ठेवलेला असतो. आपले जे कपडे आपण वापरत नाही, ते कपाटांमध्ये कोंबून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. कपड्यांसारख्याच न वापरता जपून ठेवलेल्या कितीतरी वस्तू घरात पडून असतात. आपल्याला त्या टाकवत नाहीत. त्यांचा उपयोगही नसतो.काही आठवणी, काही नाती, काही माणसं यांचंही असंच होतं का? लागतील- लागतील करत- करत आपण किती वस्तू सहज घेतो. काही नाती, काही मित्रमैत्रिणी पण असे भावनिक निर्णय घेऊन जपलेले असतात. त्यांचा ना आपल्याला उपयोग, ना त्यांना आपला?
(Image : Google)
आपण काय करतो अशा नात्यांचं?आणि आपल्या मोबाईल्समधला कचरा दूर करणं, स्पेस रिकामी करणं हे ही एक कामच होऊन बसलेलं आहे. अनावश्यक फोटोज्, व्हिडीओज्, फॉरवर्ड्स, नंबर्स हे सगळं डिलीट मारणं देखील तितकंच आवश्यक होऊन बसतं. आणि नव्या गोष्टींना तर काही जागाच उरत नाही. योग्य वेळी काही सापडतही नाही.आपल्या मनाचंही आपण असंच करुन ठेवलंय का? नको ते साठवून ठेवतो, हवं ते सगळं ठेवायला जागा नाही. त्या फाइल करप्टही होतात. डीलीट होतात तर आपल्याला कळत नाही.असं कशाला, या दसऱ्याला जरा करु सिम्मोलंघन. आणि नको ते सारं पुसून टाकू मनातून. जुनी ओझी कायमची फेकून देऊ मनाबाहेर.जरा प्रसन्न जगू.. करु आनंदी सिम्मोलंघन.दसऱ्याचा मन:पूर्वक शुभेच्छा..