आपण रोज आनंदी आणि पॉझिटीव्ह असायला हवं हे आपल्याला कळत असतं. पण आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, लोकांचं वागणं याचा आपल्यावर परीणाम होतोच. स्वत:ला कायम आनंदी ठेवायचं असं कितीही ठरवलं तरी आपण कधी ना कधी निराश होतो. अनेकदा आपण कारण नसताना नकारात्मक विचार करतो किंवा कधी कधी खूप दु:खीही होतो. आपण निराश किंवा दु:खी असलो की नकळत आपल्या आजुबाजूचं वातावरणही आपल्याला नकारात्मक वाटायला लागतं. पण आपल्या आजुबाजूचं वातावरण सकारात्मक हवं तर आपण आतून आनंदी आणि पॉझिटीव्ह असायला हवं (7 Ways to Have Positive Aura Easy Tips for Happiness).
काही लोकं अशी असतात की जी नुसती आपल्या आसपास असली तरी आपल्याला पॉझिटीव्ह वाटतं. याचं कारण ते आतून खरंच पॉझिटीव्ह असतात आणि त्यामुळे त्यांच्या संपर्कात आल्यावर आपल्याला छान वाटतं. आपणही अशाच लोकांपैकी एक व्हावं असं जर वाटत असेल तर रोजच्या आयुष्यात काही बदल करणं गरजेचं आहे. सोल सारथी या इन्स्टाग्राम पेजच्या माध्यमातून प्रसिद्ध समुपदेशक आणि योग अभ्यासक गरीमा काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. पॉझिटीव्ह राहण्यासाठी करायला हवेत असे ७ सोपे उपाय त्या सांगतात, ते कोणते पाहूया...
१. दिवसभर मी ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणी मी प्रेम आणि आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करेन असे स्वत:ला बजावून सांगा.
२. न चुकता रोज किमान काही वेळ मंत्रोच्चार करा. यामध्ये ओमकार किंवा कोणत्याही मंत्राचा समावेश असू द्या.
३. आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्या.
४. चांगले कपडे घाला, पण हे कपडे केवळ दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही तर तुम्ही त्यामध्ये कम्फर्टेबल असायला हवे.
५. कायम प्रामाणिक राहा. तुम्ही खोटं वागाल, बोलाल तर नकळत तुमच्या आजुबाजूला नकारात्मक व्हायब्रेशन्स निर्माण होतील.
६. योगासन आणि ध्यान करा, ज्यामुळे नकळत तुम्ही मनाने शांत व्हाल.
७. इतर लोकांमधल्या नकारात्मक गोष्टींपेक्षा त्यांच्यातील सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्या.