Lokmat Sakhi >Mental Health > खूप कमी खाताय?- तुम्ही मनानं आजारी तर नाही? 

खूप कमी खाताय?- तुम्ही मनानं आजारी तर नाही? 

भूकच लागत नाही, खाल्लं तरी ओकारी येते, मळमळतं, किंवा मग खूप खा खा लागते, बिंज इटिंग सतत होतं? मग काळजी घ्या, इटिंग डीसऑर्डरचं मानसिक आजाराशी नातं असतंच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 12:53 PM2021-03-06T12:53:01+5:302021-03-06T18:08:42+5:30

भूकच लागत नाही, खाल्लं तरी ओकारी येते, मळमळतं, किंवा मग खूप खा खा लागते, बिंज इटिंग सतत होतं? मग काळजी घ्या, इटिंग डीसऑर्डरचं मानसिक आजाराशी नातं असतंच..

eating disorder and anorexia , is it related to mental health? | खूप कमी खाताय?- तुम्ही मनानं आजारी तर नाही? 

खूप कमी खाताय?- तुम्ही मनानं आजारी तर नाही? 

Highlights मानसिक आरोग्यासंबंधातील नवीन अभ्यास असं सांगतात की, इटिंग डीसऑर्डरचा मानसिक आजाराशी थेट संबंध असतो.

-अनन्या भारद्वाज

भूक लागते पण तरी तुम्ही ठरवून उपाशी राहता, कारण तुमच्या मैत्रिणी तुम्हाला सांगतात की आम्ही तर फार कमी खातो. एक पोळी खाल्ली तरी माझं पोट भरतं, एक सफरचंदही मला जास्त होतं. किंवा त्याउलट कधीकधी तुम्ही बिंज इटिंग करता, दिसलं ते खात सुटता. खूप खाता. आणि मग चिडताही स्वत:वर की आपण आपलं हे काय करुन बसलो आहोत. - वरकरणी हे सारं वजन वाढणं, पोट सुटणं एवढ्यापुरतंच मर्यादित वाटत असलं तरी हे सारं म्हणजे नुसतं इटिंग डीसऑर्डर नाही. ही एकप्रकारची मेण्टल डीसऑर्डर असू शकते आणि त्याची मुळं कुठंतरी क्रॉनिक डीप्रेशनमध्येही असू शकतात हे अनेकींना माहितच नसतं. विशेषत: १५ ते १९ या वयात यासाऱ्याची सुरुवात होते आणि पुढे साधारण पंचविशी उलटून जाईपर्यंत या इटिंग -मेण्टल डीसऑर्डरचे गंभीर परिणाम पहायला मिळतात. वरकरणी पीसीओडी, ते वजन कमी किंवा जास्त असणं, पिंपल्सचा त्रास ते ॲनिमिक अशी लक्षणंही दिसतात मात्र आपण नैराश्यातून एका भयंका इटिंग डीसऑर्डरकडे ढकलले जात आहोत आणि त्यातून अनेकविध शारीरिक लाइफस्टाइल आजारही दिसायला लागतात मात्र त्याचं मूळ आपल्या मनाच्या आजारात आहे हे अनेकदा लक्षातही येत नाही.

एक किंवा अगदी दोन पोळ्या खाल्ल्या तरी तुम्हाला असं वाटतं की, आपण फार खाल्लं. हे इतकं खाणं काही बरं नव्हे. ॲनोरेक्सिया या तरुण मुलींच्यामधल्या गंभीर आजाराची चर्चा तर गेली अनेक दशकं सुरु आहे. अगदी फॅशन टीव्हीवरच्या रोडावलेल्या हँगर म्हणवणाऱ्या मॉडेल्सपासून. एकतर कमी खायचं किंवा खाल्लेलं सगळं ओकून काढायचं असं अनेकजणी या आजारात करतात. मात्र मुळातच ऐन पंचविशीपर्यंत अगदी कमी खायचं आणि आपण फार कमी खातो, आपल्याला भूकच लागत नाही हे सांगण्यातही अनेक मुलींना भूषण वाटतं. हे सारं कशातून येतं याचा अभ्यास अगदी अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ या संस्थेनंही केलेला आहे. त्यांच्या अभ्यासातही असंच दिसतं की, ज्याकाळात मुली कमी खाण्याचं समर्थन करतात किंवा खाणंच टाळतात. तेव्हा त्या खरंतर स्वत:लाच टाळत असतात. म्हणजे काय तर त्यांचं स्वत:वरचं प्रेम इतकं कमी झालेलं असतं की, त्या सतत स्वत:ला दुसऱ्याच्या नजरेतून जोखत असतात. आणि त्या जोखण्यात वजन कमी असणं, मानेची हाडं अर्थात कॉलर बोन्स दिसणं. पोट अगदीच सपाट असणं हे सारं इतकं महत्वाचं होतं की त्यातून शरीर हेल्दी असणं, आपण फीट असणं हेच कमी महत्वाचं ठरतं.
मग पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की, हे सारं त्या ठरवून करतात की त्यांच्या डोक्यातला केमिकल लोचा त्यांना असं करायला भाग पाडतो.

 

तर मानसिक आरोग्यासंबंधातील नवीन अभ्यास असं सांगतात की, इटिंग डीसऑर्डरचा मानसिक आजाराशी थेट संबंध असतो. औदासिन्य,नैराश्य, आत्मविश्वाचा अभाव आणि स्वप्रतिमेशी सतत असलेलं भांडण यातून अजिबात न खाणं किंवा स्ट्रेस इटिंगच्या नावाखाली खूप खाणं अशी दोन्हीही टोकं गाठली जातात. असं वागणा्या मुलींच्या संदर्भात त्यांचं कोणतंच रुटीन नसणं, परीक्षेपासून करिअरपर्यंतचं गांभीर्य नसणं अशा गोष्टीही ठळकपणे दिसतात.
मानसशास्थ अभ्यासक निलेश होवाळे सांगतात की, ‘मुळात आपल्या मुलींना असा काही त्रास होतो आहे हेच पालक भारतासारख्या देशात मान्य करत नाहीत. मात्र मुली मनातल्या मनात कुढत असतात. एकेकट्यानं अनेकदा रडतात. हसऱ्या मुली एकदम गप्प आणि अबोल होतात. काहीजणी जास्तच भांडखोर होतात हे सारं ऐन तारुण्यात घडतं. हे सारं होत असताना त्यापैकी अनेक मुली नैराश्याच्या अगदी सीमारेषेवर उभ्या असतात. काहींचे प्रश्न साध्या काऊन्सिलिंगने सुटतात. काहींना औषधोपचारही करावे लागतात. मात्र उघडपणे या गोष्टी न बोलणारा आपला समाज, मुलींकडे पालकही इतकं बारकाईने लक्ष त्यामुळेच देत नाहीत. मात्र पुढे वाढत्या वयात हे डीप्रेशन त्रासदायक ठरू शकतं.’
- आपलं खाणं, भूक लागणं- न लागणं, आपण करत असलेला वा नसलेला व्यायाम आणि आपलं मानसिक स्वास्थ्य यासाऱ्याचा असा थेट संबंध आहेच, त्याकडे दुर्लक्ष करणं धोकेदायक ठरूच शकतं.

( अनन्या मुक्त पत्रकार आहे.)

Web Title: eating disorder and anorexia , is it related to mental health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.