एकतर आपण सतत खातो, कुछ मंचिंग चाहिए म्हणत, अनेक कार्पोरेट ऑफिसेसमध्ये टेबलावर सतत खायला काहीनाकाही घेऊन बसतात काम करताना. खात राहतात. चहा कॉफी तर होतेच. पण चिप्स, कुरकुरे, सॅण्डविच असं सतत काहीनाकाही खाणं सुरुच असतं. हे एक टोक, सतत खात रहायचं. तोंड चालूच. दुसरं एक टोक, माझं डाएट आहे म्हणत काही खायचंच नाही. उपाशीच रहायचं. फळं खायची किंवा सॅलेड किंवा मग कसकसल्या स्मुदी प्यायच्या. खाणं या शब्दाचाच नॉशिया यावा असे खाण्याचे आणि पर्यायानं स्वत:चे हाल होत असतात. त्यातून मग वजन वाढतं, पोट सुटतं, डाऊन वाटतं, आपण देखण्या दिसत नाही म्हणत स्वत:चाच राग येतो. पण हे सारं केवळ लाइफस्टाइलपुरतं मर्यादित की याचा मनावरच्या ताणाशी संबंध असतो?
इटिंग डीसऑर्डर ही फक्त खाण्यापुरतीच मर्यादित गोष्ट नाही तर ती एकप्रकारची मेण्टल डीसऑर्डर असू शकते. मनावरचा ताण, लपलेलं डिप्रेशन, जेलसी, भयंकर असुरक्षितता आणि स्वत:कडून असलेल्या अपेक्षा यासाऱ्यातून आलेलं नैराश्य याचा परिणाम म्हणूनही स्वत:च्या खाण्याशी असा खेळ सुरु होतो. वरवर पाहिलं तर वाढलेलं वजन, पीसीओडी,पिंपल्स, कॉन्स्टिपेशन, असे काही आजार दिसतात. मात्र आपल्या मनाच्या आजाराशी त्याचा संबंध आहे, आपण इटिंग डिसऑर्डर नाही तर मानसिक आजाराकडे ढकलले जातोय हे लक्षातही येत नाही.
(Image : Google)
ॲनोरेक्सिया हा शब्द तर चर्चेत असतोच. बारीक दिसण्यासाठी कमी खायचं किंवा खाल्लेलं ओकून टाकायचं. हे जुनं झालं आता तर आपण फार खातच नाही, कमीच खातो, नाश्ताच करत नाही, वेळच नाही, स्वयंपाक घरात तर जातच नाही, हे सारं सांगण्यात अनेकींना (आणि अनेकांनाही) भूषण वाटतं. अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ या संस्थेनं केलेल्या अभ्यासानुसार आपलं अती खाणं किंवा न खाणं हे स्वत:वरचं प्रेम कमी झाल्याचं लक्षण आहे. आपण स्वत:कडे लक्षच देत नाही, शरीराच्या गरजा पाहत नाही, पोषणाचा विचार नाही, वरवर सुंदर दिसण्यासाठी मेकअप पण शरीर पोखरलेलं हे सारं मनावरच्या ताणाशी संबंधित आहे. इटिंग डीसऑर्डरचा संबंध औदासिन्य,नैराश्य, आत्मविश्वाचा अभाव आणि स्वप्रतिमेशी सतत असलेलं भांडण यासाऱ्याशी असू शकतो. त्यामुळे आपण काय खातो, किती खातो, केव्हा खातो, खाऊन आनंदी वाटतं की गिल्टी वाटतं याचा विचार करा आणि आवश्यक ती वैद्यकीय मदत घ्या.