गौरी पटवर्धन
घरातल्या स्त्रीला जरी निर्णय घेण्याचा किंवा घरातल्या दोन सदस्यांमधलं भांडण सोडवायचा अधिकार नसला, तरीही तिने घरातलं वातावरण चांगलं राहील याची जबाबदारी घेणं मात्र अपेक्षित असतं. घरातल्या वातावरणातला ताण कमी करणं ही जणू तिची एकटीचीच जबाबदारी असते. अनेक घरात वडिलांचा लहानपणापासून मुलांशी विशेष संवाद नसतो.“अभ्यास केला का?”“एवढी मस्ती कशाला करतोस?”असे जुजबी प्रश्न विचारणं, प्रगतिपुस्तकावर सही करतांना रागावणं इतपतच संवाद वडील आणि मुलांमध्ये असलेला दिसून येतो. काही ठिकाणी हे चित्र बदलतं आहे. त्याचे चांगले परिणामही त्या घरातून दिसायला लागलेले आहेत. पण जिथे हा संवाद नसतो, तिथे त्या मुलाच्या आईने दोघांमधला संवादाचा पूल व्हायचं हे जणू गृहीत धरलेलं असतं.अश्या वेळेला ती काही वेळा वडिलांचं म्हणणं मुलांच्या गळी उतरवते, तर काही वेळा मुलांच्या बाजूने वडिलांशी किंवा घरातल्या इतर वडीलधाऱ्या मंडळींशी रदबदली करते. कधी कधी मुलं आईच्या मार्गे वडिलांपर्यंत मागण्या पोचवतात. त्या मागण्या सरळपणे मागितल्या तर मान्य होणार नाही अशाच असतात. मग आईला वडिलांचा मूड बघून, हळूहळू विषय काढून ती मागणी पुढे रेटावी लागते. कित्येक वेळा केवळ आई मध्यस्थ आहे म्हणून ती मागणी मान्य होते. अशा वेळी मुलांनी त्या कराराचा त्यांचा भाग नीट पार पाडणं ही आईची नैतिक जबाबदारी होऊन बसते, पण प्रत्यक्षात तिचा मुलांच्या वागण्यावर कुठलाही कंट्रोल नसतो.
उदाहरणार्थ, जर का मुलीला मैत्रिणीच्या वाढदिवसाला ११ पर्यंत थांबायचं असेल आणि एरवी त्या घरात मुलींनी ८ पर्यंत घरी परत येण्याची पद्धत असेल, तर ही मागणी आईच्या मार्फत वडिलांकडे पोचवली जाते. वडील होकार देतांना आईला सांगतात,“जाऊदे एखाद्या वेळी. पण तुझं लक्ष असू दे.”आता मैत्रिणीच्या घरी गेलेल्या मुलीवर आई कसं काय लक्ष ठेवणार? ते अशक्य आहे हे आई आणि वडील दोघांनाही माहिती असतं. पण त्या वाक्याचा गर्भित अर्थ असा असतो, की जर का मुलगी कबूल केल्याप्रमाणे ११ पर्यंत घरी आली नाही, किंवा तिथे ती कुठल्या मुलाशी बोलत होती असं समजलं किंवा असं काहीही झालं तर त्यासाठी मुलीच्या बरोबरीने आईलाही जबाबदार धरलं जातं.असे ताणतणाव बहुतेक सगळ्या घरातून असतात. मुलं आणि वडील, नवरा आणि नणंद, सासू आणि सासरे, मुलं आणि आजीआजोबा अशा प्रकारच्या कुठल्याही कॉम्बिनेशनमध्ये जरी तणाव असतील तरी त्यात मध्यस्थाची भूमिका घरातल्या स्त्रीला करावी लागते. या सततच्या ताणतणावाशी डील करण्याचा तिला ताण येतो. पण तिला त्या भूमिकेत गृहीत धरलं जातं. बायका ही भूमिका स्वतःवर कशाला लादून घेतात असा प्रश्न नक्कीच विचारता येऊ शकतो, पण त्यात एक मेख आहे. जर का हे ताण वेळीच सोडवले नाहीत आणि त्यामुळे घरातलं वातावरण बिघडलेलं राहिलं त्यासाठी सामान्यतः घरातल्या स्त्रीला जबाबदार धरलं जातं. त्यामागचं आर्ग्युमेंट असं असतं, की अहोंचा स्वभाव तापट आहे हे खरं आहे, पण मग त्यांना बायको नाही सांभाळून घेणार तर कोण घेईल?आणि यासाऱ्या पसाऱ्यात बाईचा इमोशनल लोड वाढत डोकं शांतच होत नाही तिचं. आणि ते ओझं घेऊनच तिला जगावं लागतं.