Lokmat Sakhi >Mental Health > नाही गं चालत आमच्याकडे ! -इमोशनल घोळ का घालतात बायका?  एवढा इमोशनल लोड येतो कुठून?

नाही गं चालत आमच्याकडे ! -इमोशनल घोळ का घालतात बायका?  एवढा इमोशनल लोड येतो कुठून?

एक ना अनेक काळज्या, मुलांच्या, नवऱ्याच्या, सासूसासरे, नातेवाईक, प्रथापरंपरा सगळ्यांचं ओझं, त्यात नुसता मामला सेण्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:05 PM2021-05-27T16:05:52+5:302021-05-27T16:14:09+5:30

एक ना अनेक काळज्या, मुलांच्या, नवऱ्याच्या, सासूसासरे, नातेवाईक, प्रथापरंपरा सगळ्यांचं ओझं, त्यात नुसता मामला सेण्टी!

emotional load, mental load and women, why women carry all the burden? | नाही गं चालत आमच्याकडे ! -इमोशनल घोळ का घालतात बायका?  एवढा इमोशनल लोड येतो कुठून?

नाही गं चालत आमच्याकडे ! -इमोशनल घोळ का घालतात बायका?  एवढा इमोशनल लोड येतो कुठून?

Highlights सगळा इमोशनल लोड ती स्वत:वर घेते, त्यात पार पिचून जाते, पण हा लोड आहे हे बाहेरुन दिसतं का कुणाला?

गौरी पटवर्धन

“नाही गं… आमच्याकडे चालत नाही.”
“वन डे रिटर्न ट्रिपला जायला तसा काही प्रॉब्लेम नाही. तरी पण एकदा यांना विचारून सांगते.”
“मुलगा कॉलेजला जायला लागल्यापासून त्याचे वडील आणि तो एकमेकांशी बोलतच नाहीत. ते काही बोलले की त्याला राग येतो आणि तो ऐकत नाही म्हणून ते चिडचिड करतात. मग दिवसभर याचे निरोप त्यांना द्या आणि त्यांच्या चौकश्यांना उत्तरं द्या. पुन्हा दोघंही कधी माझ्यावरच चिडतील याचा काही नेम नाही.”
“वयोमानानुसार सासूबाईंचा कॉन्फिडन्स कमी झालाय. त्यांना सारखी मी आजूबाजूला लागते. कुठे बाहेर गेले आणि तासाच्या जागी दीड तास लागला तरी त्या अस्वस्थ होतात. त्यामुळे हल्ली कुठे बाहेर जायचं म्हंटलं म्हणजे मला नकोच वाटतं.”
“मुलीला ती हल्ली घालतात तसली गुढग्यावर फाडलेली जीन्स घ्यायची आहे. तिच्या सगळ्या मैत्रिणींनी घेतली आहे. पण सासरे नाही म्हणतात. त्यावरून ती चिडून बसली आहे. आणि ती चिडली म्हणून सासरे वैतागले आहेत. ते म्हणतात तू तिला समजावून सांग की असले फाटके कपडे घालायचे नाहीत. आणि ती म्हणते की तू अण्णांना समजाव की ती जीन्स फाटकी नसते, ती फॅशन आहे. माझं मधल्यामध्ये दोन्हीकडून मरण होतं.”

“माझी नणंद आमच्या जवळच राहते. तिला कुठेही बाहेर जायचं असलं, की ती माझ्या सासूबाईंना फोन करते आणि दोन्ही मुलांना आमच्याकडे सोडू का म्हणून विचारते. सासूबाई कशाला वाईटपणा घेतील? त्या लगेच हो म्हणतात. मग ती मुलांना इकडे सोडून जाते. आणि असं ती आठवड्यातून तीनदा तरी करतेच. मुलांचं करण्याबद्दल काही नाही गं, पण त्या मुलांना अजिबात शिस्त नाही. काहीही सांगितलेलं ऐकत नाहीत. घरी जो स्वयंपाक केलेला असतो तो खात नाहीत. त्यांना मामीकडून सारखं नूडल्स, बिस्किटं असलं खायला हवं असतं. तेही करायला माझी हरकत नाही. पण उद्या जर ती म्हंटली की माझ्या मुलांना ही नीट जेऊ घालत नाही तर? आणि त्या दोघांचं बघून माझी मुलंपण सारखी वेफर्स आणि बिस्किटांचा हट्ट करायला शिकली आहेत. काय करावं तेच कळत नाही. नणंदेच्या मुलांना काही बोललं की सासूबाईंना राग येतो…”


- ही वाक्य ओळखीची वाटतात ना? घरोघरच्या बायका सतत अशा प्रकारच्या भावनिक गुंतागुंतीमधून वाट काढत असतात. बहुतेक घरातील स्त्रियांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची परवानगी नसते. काही ठिकाणी वर वर पाहता ती परवानगी आहे असं जरी वाटत असलं, तरी त्या स्त्रीने तो निर्णय कोणाशीतरी चर्चा करून, आणि खरं म्हणजे परवानगी मागून मगच घ्यावा असंच अपेक्षित असतं.
घरातल्या प्रथा, परंपरा, समजुती, पद्धती याची तिच्याभोवतीची चौकट इतकी घट्ट असते, की तिला तिच्या किंवा तिच्या मुलांच्या आयुष्यातले कुठलेही निर्णय स्वतंत्रपणे घेता येत नाहीत. आणि त्यात तसं बघितलं तर फार वरवरचे विषय सुद्धा अडकून पडलेले दिसतात. मुलांनी आणि विशेषतः मुलींनी कुठले कपडे घालावेत, त्यांनी कधी घरी यायला हवं, त्यांनी घरात कसं वागायचं अशा गोष्टींमधले निर्णय त्या पंधरा वर्षांच्या मुलांच्या आईला, जी स्वतः चाळीस वर्षांची झालेली असते, घेण्याची मुभा नसते.
आणि मग सगळा इमोशनल लोड ती स्वत:वर घेते, त्यात पार पिचून जाते, पण हा लोड आहे हे बाहेरुन दिसतं का कुणाला?
नाही ना, मग त्याविषयीच बोलूया..

Web Title: emotional load, mental load and women, why women carry all the burden?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.