जेव्हा मुलं लहान असतात, तेव्हा आईचा सगळा वेळ मुलांच्या अवती- भोवती जातो. मुलांना काय हवं, काय नको, हे पाहण्यात आई पुर्णपणे गढून गेलेली असते. वर्किंग वुमन असेल तर दिवसातला काही काळ तरी ती मुलांपासून स्वतंत्र होऊन तिच्या विश्वात रमते. पण बहुतांश गृहिणींना मात्र मुलांव्यतिरिक्त दुसरं भावविश्व नसतं. ही मुलं जेव्हा पहिल्यांदा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घराबाहेर झेप घेतात, तेव्हा मात्र मग त्या आईला भयानक रिकामपणं जाणवू लागतं. मुलांच्या सभोवताली घोटाळणारी आई हताश होऊन अगदी एकटी पडते. आईची किंवा पालकांची ही जी अवस्था असते, यालाच Empty nest syndrome असं म्हंटलं जातं.
अशी अवस्था सध्या झाली आहे बॉलीवुड अभिनेत्री तथा ग्लॅमरस मॉडेल मलायका अरोरा हिची. मलायकाचा मुलगा अरहान शिक्षणासाठी पहिल्यांदाच तिला सोडून परदेशात जात आहे. त्यामुळे मलायका सध्या प्रचंड इमोशनल झाली असून तिने तिच्या भावना इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर व्यक्त केल्या आहेत. यामध्ये तिने तिचा आणि मुलगा अरहान याचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मलायका जे काही म्हणते आहे, ते विचार जिचा मुलगा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरगावी गेलेला आहे, अशा कोणत्याही आईच्या मनात येऊ शकतात.
तुम्हालाही असा एकटेपणा कधी जाणवला असेल, तर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात की Empty nest syndrome हा कोणताही मानसिक आजार नाही. ती प्रत्येक पालकाच्या मनाची एक अवस्था आहे. बहुतांश पालकांना कधीतरी या अवस्थेतून जावंच लागतं. जास्त मानसिक त्रास न होऊ देता, या अवस्थेतून लवकरच बाहेर पडायचं असेल, तर काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्यायला हवी.
मुलांनाही जाणवू शकतो Empty nest syndrome
केवळ पालकांनाच नाही, तर मुलांनाही Empty nest syndrome जाणवू शकतो, असे काही अभ्यासकांनी सांगितले आहे. ज्या पालकांना नोकरीनिमित्त कायम घराबाहेर रहावे लागते, अशा पालकांच्या मुलांना हा मानसिक त्रास जाणवू शकतो. पालक घराबाहेर असताना मुले घरी एकटीच असतात. यातही जर एकुलते एक अपत्य असेल, तर त्याला हा त्रास जाणवण्याचे प्रमाण अधिक असते. अशावेळी मुलांशी संवाद साधणे, त्यांचे म्हणणे ऐकुन घेणे, त्यांच्या आवडत्या विषयांवर गप्पा मारणे यासारखे उपाय पालक करू शकतात.
काय आहे Empty nest syndrome?
या अवस्थेत पालकांना किंवा मुलांना खूप एकटे वाटू लागते. आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. वेळीच यातून बाहेर पडता आले नाही तर नैराश्य येते.
Empty nest syndrome मधून बाहेर पडण्यासाठी......
- यातून जर लवकर बाहेर पडायचे असेल तर आपण मनाने खंबीर होणे खूप गरजेचे आहे. आपले पाल्य त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी घराबाहेर गेलेले आहे. त्यामुळे मुलांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून आनंदी राहणे किती गरजेचे आहे, हे पालकांनी स्वत:लाच पटवून दिले पाहिजे.
- आयुष्यात निर्माण झालेली ही पोकळी भरून काढण्यासाठी आपले छंद जोपासण्यात आणि आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवला पाहिजे.
- सकारात्मक विचार केला पाहिजे.
- फॉर अ चेंज म्हणून या अवस्थेतून जाणाऱ्या लोकांनी दोन- चार दिवस पर्यटनस्थळी जाऊन फिरून यावे, असा सल्लाही डॉक्टर देतात.