Join us  

गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज फॉरवर्ड करताय? फॉरवर्ड करण्यापूर्वी १० गोष्टी वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:06 PM

डिजिटल कचरा तयार होतो, तो आपण आपल्याही डोक्यात भरतो आणि इतरांनाही देतो. आपण मेसेज बाजाराचे गुलाम होतोय का?

ठळक मुद्देफॉरवर्ड, फेक न्यूज आणि मेसेजच्या बाजाराचे हुकमी गुलाम म्हणून वावरणे आता तरी आपण बंद केले पाहिजे...

- मुक्ता चैतन्य

काल सोशल मीडिया दिवस होता. सोशल मीडिया आपल्या जगण्याचा भाग झालेला आहे. व्हॉट्सॲप ग्रूप तर भारीच प्रिय. त्यावरच्या गप्पा, फॉरवर्डही सतत सुरु असतं. मात्र फेसबुक, व्हॉट्सॲप, शेअर चॅट वगैरेंवर फिरणारे फॉरवर्ड्स सिरियसली घेताना आणि आपल्याला नेमकी माहिती पहिल्यांदा मिळाली आहे आणि साऱ्या जगाला ती वाटून आपण सगळ्यांचे कल्याण करणार आहोत असे वाटून घेताना क्षणभर थांबा. काही मुद्दे लक्षात घ्या, स्वतःला काही प्रश्न विचारा.

1) तुमचा हेतू कितीही चांगला असला तरी चुकीची/ खोटी/ द्वेष पसरविणारी माहिती पुढे पाठविताना आपण कशासाठी आणि काय फॉरवर्ड करतोय, याचे भान फार आवश्यक आहे.2) आपल्यापर्यंत पोहोचलेले सगळे खरे नसते आणि सगळे पोहोचलेले पुढे धाडले पाहिजे असेही काही नसते. त्यामुळे चुकीच्या माहितीचे वाहक/ गुलाम बनून ती पसरविण्यात सहभागी होऊ नका.3) ही माहिती खरी असू शकेल का? आहे का? (जमल्यास त्यातले तपशील खरे आहेत का? हे तपासा, त्यासाठी गुगलची मदत घ्या.. जरा थांबा खात्री नसेल तर)4) पूर्वग्रहदूषित विचार नको. लॉजिकली काही गडबड वाटली, शंका आली तर खात्री केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका.5) आपण जो फोटो बघतोय तो फोटोशॉप केलेला तर नसेल ना, हा प्रश्न फॉरवर्डमधल्या प्रत्येक फोटोसाठी स्वत:ला विचारा.6) एखादी गोपनीय माहिती न्यूज चॅनलकडे, वृत्तपत्राकडे असणे वेगळे आणि व्हॉट्सॲप, शेअर चॅट वर अचानक फिरायला लागणे वेगळे. फॉरवर्ड खेळासाठी आपला वापर होतोय का, याचा विचार करा.7) बातम्या तर्कशुद्ध पद्धतीनेच बघायला हव्यात. तशा आपण बघतोय ना? हे स्वतःला विचारा.८) सतत सकारात्मक मेसेज फॉरवर्ड केले की सकारात्मकता पसरते हा मोठा गैरसमज आहे. त्यामुळे जगाचे सतत कल्याण करण्यासाठी मेसेज फॉरवर्ड करायच्या मोहापासून स्वतःला वाचवा.९) हा मेसेज मी का? फॉरवर्ड करतोय/ करतेय? त्याचा समोरच्याला उपयोग आहे का? त्याचा समोरच्याला त्रास होणार नाही ना? मी सतत सुप्रभात, शुभ रात्री आणि विविध दिनविशेष मेसेज करण्याची गरज आहे का?१०) फॉर्वर्डच्या निमिताने आपण आपल्या आणि समोरच्याच्या फोनमध्ये डिजिटल कचरा तर तयार करत नाही आहोत ना?फॉरवर्ड, फेक न्यूज आणि मेसेजच्या बाजाराचे हुकमी गुलाम म्हणून वावरणे आता तरी आपण बंद केले पाहिजे... कारण त्याने डिजिटल कचरा तयार होतो, डोक्याचा ताप वाढतो आणि ताणही! विचार करा, जागते राहा.

(लेखिका सोशल मीडियाच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल