सतत काम करुन शरीराला जसा थकवा येतो तसाच मनालाही येतो. शरीराप्रमाणे मनाच्या थकव्यावरही उपाय करणं आवश्यक असतं. रोजच्या दिनचर्येत अडकून जाणं, सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:ला अजिबात वेळ देता न येणं या कारणांनी शरीरासोबत मनही थकतं. हा थकवा जर जाणवण्याइतपत वाटू लागला तर त्यावर तातडीने उपाय करायला हवेत. शरीर आणि मन दोन्ही थकलं तर ते अनारोग्यास कारण होतं. वेळच्यावेळी सोपे उपाय करुन थकवा घालवणं आवश्यक आहे. शरीर आणि मनाला आलेला थकवा घालवण्यासाठी घरच्याघरी उपाय करता येतात. शरीर आणि मन हलकं फुलकं आणि उत्साही करण्याचे उपाय सोपे आहेत.
Image: Google
थकलेल्या मनाला उत्साही करण्यासाठी
1. निरोगी आरोग्यासाठी आहार हा महत्वाचा घटक आहे. शरीर उत्साही राहाण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवं. आहार तज्ज्ञ शरीर आणि मन उत्साही राहाण्यासाठी हेल्दी फॅट, प्रथिनंयुक्त आहार, चांगली कर्बोदकं असलेला आहार घेण्यास सांगतात. यासाठी आहारात कडधान्यं, स्टार्चयुक्त भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा खूप थकवा आलेला असेल तेव्हा मुद्दाम आहाराकडे बारकाईनं बघून आहारात वरील घटकांचा जाणीवपूर्वक समावेश करावा. काम करताना आलेला थकवा घालवण्यासाठी मध्ये मध्ये सुकामेवा खाल्ल्यानं, जवस, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया या आरोग्यदायी बिया सेवन केल्यानं भूक भागते. उत्साही वाटतं. मनावर आलेला ताण निघून जातो.
2. खूपच थकल्यासारखं वाटत असल्यास गरम पाण्यानं आंघोळ करावी. आंघोळीच्या पाण्यात इप्सम साॅल्ट घालावं. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. स्नायू उत्तम काम करतात. इप्सम साॅल्ट घातलेल्या गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं शरीर आणि मनाला आलेला थकवा दूर होतो. या उपायानं शरीरावर आलेली सूजही निघून जाते.
Image: Google
3. रोज सतत थकल्यासारखं वाटत असल्यास दिवसातून कमीत कमी 5 मिनिटं स्ट्रेचिंगचे व्यायाम प्रकार करावेत. यामुळे आखडलेले स्नायू मोकळे होतात. शरीर आणि मनाला आलेला थकवा घालवण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा योगसाधना करावी.
4. एकाच जागी बसून खूप वेळ काम केल्यानं किंवा तासनतास बसून टीव्ही बघितल्यानं शरीर स्थिर राहातं. शरीर खूप काळ स्थिर राहिल्यास शरीर थकतं. मनावरही मरगळ येते. हा थकवा आणि मरगळ निघून जाण्यासाठी सतत एका जागी न बसता मधून मधून उठून फेऱ्या माराव्यात. रोज व्यायाम करावा. ध्यानधारणा करावी. या उपायांनीही शरीर आणि मनाला उत्साह येतो.
Image: Google
5. मरगळलेल्या, थकलेल्या मनाला उत्साही करण्यासाठी ॲरोमा थेरेपी फायदेशीर ठरते. सुगंधामुळे मनावरील ताण निघून जातो. ॲरोमा थेरेपीसाठी आपल्या आवडीचं इसेन्शियल ऑइल घ्यावं. खोबऱ्याच्या/ तिळाच्या तेलात या इसेन्शियल तेलाचे काही थेंब घालून हे तेल अंगास मसाज करत लावावं. नंतर गरम पाण्यानं आंघोळ करावी. या सोप्या उपायांनी शरीर आणि मनाला आलेला थकवा घालवता येतो.