कोरोना, लॉकडाऊन काळात ज्या आत्महत्या झाल्या, त्यातील बहुसंख्य आत्महत्या या आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे झाल्या आहेत. या काळात वाढलेले कौटुंबिक कलह, विविध कारणांमुळे आलेला एकटेपणाही आत्महत्येस कारणीभूत ठरला आहे. म्हणूनच आपल्या घरात, मित्रपरिवारात जर अशा नैराश्य आलेल्या व्यक्ती असतील, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण एक स्त्री, एक पत्नी, आई किंवा एक मैत्रीण म्हणून तुम्ही उत्तम प्रकारे एखाद्याला समजून घेऊ शकता.
मानसिक, भावनिक व शक्य असल्यास आर्थिक स्तरावरही त्यांना जमेल तसा आधार द्या आणि सगळ्यात आधी बदललेल्या वाईट परिस्थितीला त्या व्यक्ती जबाबदार आहेत, असे त्यांना दूषण देणे थांबवा. घरातल्या महिलेने जर पुढाकार घेतला तर नवऱ्यासकट अख्ख्या घराला या संकटातून बाहेर काढण्याची ताकद तिच्यामध्ये आहे, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.
नैराश्य घालविण्यासाठी हे करा..
- लहान मुलांसोबत वेळ घालवावा.
- सकारात्मक गोष्टी पहाव्यात आणि ऐकाव्यात.
- हा काळ लवकरच निघून जाईल, असे म्हणत स्वत:ला हिंमत देण्याचा प्रयत्न करावा.
- अपघात, मृत्यू, आत्महत्या, आजार यासंदर्भात बोलणे आणि ऐकणे टाळा.
तुम्हाला जे आवडेल ते सॉफ्ट म्युझिक ऐका किंवा फक्त इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकण्यावर भर द्या.
नैराश्याची लक्षणे
कोरोनामुळे आज जगभरातच जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या स्वरूपातली चिंता वाढली आहे. यामुळे वरवर जाणवत नसले, तरी अनेक व्यक्ती आतून खूप दुखावल्या गेल्या आहेत. परिस्थितीने हताश झाल्या असून त्यांना नैराश्याने घेरले आहेे. सारखे- सारखे छातीत दुखणे, जीव घाबरणे, डोकेदुखी, निद्रानाश, नैराश्य, श्वास घ्यायला त्रास होणे, आपल्याच विचारात गुंग राहणे, असे मानसिक आजार जर तुम्हाला जाणवत असतील आणि सगळ्या टेस्ट करूनही जर तुमचे रिपोर्ट नॉर्मल येत असतील, तर तुम्ही मानसिक आजाराने त्रस्त आहात, असा त्याचा अर्थ होतो.
कुटुंबाने घ्यावी काळजी
आपल्या कुटूंबात जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक संकटामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे नैराश्य आले असेल, एकटेपणा जाणवत असेल, तर पुढील उपाय करून पहावेत, असे औरंगाबाद येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रश्मिन आचलिया यांनी सांगितले.
- आपल्या कुटुंबातील व्यक्ती सध्या कोणत्या त्रासातून जात आहे, हे कुटुंबाला चांगल्याप्रकारे माहीत असते. त्यामुळे त्या व्यक्तीची मानसिकता समजून घ्या. त्याच्याशी विविध विषयांवर संवाद साधून त्याला बोलते करा.
- त्याच्या सभोवतालचे वातावरण नेहमी प्रसन्न आणि समाधानी ठेवा.
- घरात पैसा नसेल तर निश्चितच अनेक अडचणी उद्भवतात. पण असेल तेवढ्यात भागवू असे म्हणून रोजगार गेलेल्या जोडीदाराला भावनिक आधार द्या.
- सगळे जगच थोड्याफार फरकाने या अवस्थेतून जात आहे. त्यामुळे हा काळही बदलेल, असे वारंवार सांगून नैराश्यग्रस्त व्यक्तीला नवी उभारी देण्याचा प्रयत्न करा.
- आर्थिक आणि मानसिकदृष्टीने खचलेल्या व्यक्तींना शक्यतो एकटे सोडू नका. मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेऊन त्यांचे समुपदेशन करून घ्या.