व्रषाली विजय चाटोरीकर
छंद जपल्याने मानसिक त्रास कमी होऊ शकतो, मनावरचा ताण कमी करण्यासाठी छंद हे थेरपीप्रमाणे काम करतात, ही बाब आता मानसोपचार तज्ज्ञांनीही मान्य केली आहे. धावपळीच्या युगात आपल्या ध्येयांमागे धावताना आज प्रत्येकाचीच दमछाक होत आहे. यात कोरोनाने आणखी भर घातली असून प्रत्येक व्यक्तीपुढे वेगवेगळे प्रश्न उभे ठाकले आहे.
मनावरचा ताण कमी करून निखळ, निर्भेळ आनंद मिळवायचा असेल, तर आपले छंद निश्चितच मदतीला येऊ शकतात. आपल्या आवडीनिवडींमुळे आपण काही काळ निश्चितच तणावमुक्ती अनुभवू शकतो. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न असते. अगदी स्वंयपाकात रमून वेगवेगळ्या रेसिपी करून पाहण्यापासून ते थेट ट्रेकिंग करण्यापर्यंत काेणत्याही आवडीनिवडी असू शकतात. पण बऱ्याचदा विशेषत: महिलांच्या बाबतीत असं घडतं की घरच्या मंडळींच्या, मुलांच्या आवडीनिवडी सांभाळताना, आपल्याला काय आवडतंय किंवा काय आवडत होतं, हेच अनेक जणी विसरून जातात. त्यामुळे आयुष्यात एक वेगळंच रिकामपण येऊ बघतं.
म्हणूनच रोजच्या रहाटगाड्यातून स्वत:साठी काही वेळ निश्चितच काढा. आपल्याला नेमकं काय आवडतंय आणि कशातून मनमुक्त आनंद मिळतोय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ते एकदा शोधता आलं की आपली आनंदाची वाट आपल्याला गवसलेली आहे, हे समजावं आणि त्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करावा.
छंद माणसाला जिवंत ठेवण्याचं काम करतात. मरगळलेल्या, कोमेजलेल्या मनाला नवी ऊर्मी देतात. आपली मानसिकता सुधारतात. आनंदाने जगायला नवे प्रोत्साहन देतात. आशेचा किरण पल्लवित करतात . तणावमुक्त करतात. म्हणूनच तुम्ही गृहिणी असलात तरीही आणि वर्किंग वुमन असलात तरीही तुमचा छंद जोपासण्याचा मनापासून प्रयत्न करा.