Join us  

मनं जुळतात तेव्हा भाषा अडसर ठरत नाही, भाषेपलीकडच्या मैत्रीची जर्मन गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 1:04 PM

देश आणि भाषेच्या सीमा ओलांडून ओळखी होतात, तेव्हा त्या दोन्हीकडून मोजूनमापून, एकमेकांच्या स्वभावाचा, संस्कृतीचा अंदाज घेतच! काही पटकन जुळतात, काही मागे पडतात.

ठळक मुद्देसगळेच अनुभव एवढे गोड असतात असे नाही; पण जगात सगळीकडेच वेगवेगळ्या पद्धतीने का असेना प्रेम, जिव्हाळा असतोच!

 चैत्राली परळकर-साखरे

देश सोडला की एक अनामिक भीती असते नवीन संस्कृती, नवीन माणसांची.. सुदैवाने आता सगळीकडे भारतीय पसरले असल्यामुळे छान ग्रुप्स होतात, सण साजरे होतात, जिवाभावाच्या मैत्रिणी मिळतात. त्यामुळे करमत नाही असे होत नाही. या मैत्रीमध्ये एक बिनधास्तपणा असतो; कारण संस्कृती, विचार करण्याची पद्धत ओळखीची असते.पण जेव्हा देश आणि भाषेच्या सीमा ओलांडून ओळखी होतात, तेव्हा त्या दोन्हीकडून मोजूनमापून, एकमेकांच्या स्वभावाचा, संस्कृतीचा अंदाज घेतच! काही पटकन जुळतात, काही मागे पडतात. काही अचानक जुळलेल्या आणि टिकलेल्या अशाच मैत्रिणींच्या आठवणी..

लहान मुलं असली की पटकन मैत्री होते आयांची. अशीच माझी मैत्रीण भेटली रोमेनिया देशातली, नवऱ्याच्या नोकरीसाठी जर्मनीत आलेली. एकाच बिल्डिंगमध्ये तिचं घर पाचव्या मजल्यावर आणि आमचं नवव्या- लिफ्टमध्ये ओळख झाली आणि रोज मुलांना शाळेतून आणतानाची सोबत बनली. रोज ठराविक वेळी बिल्डिंगच्या खाली भेटायचो आम्ही आणि मग जायचो आणायला. काय झाला का स्वयंपाक वगैरे सुरू झाल्या मग गप्पा. तेव्हा ती दुसऱ्यांदा प्रेग्नन्ट होती. काही दिवसांत तिचे आई-वडील आले मदतीला. त्यांना अजिबात इंग्लिश येत नसे. मग मैत्रीण ट्रान्सलेट करून सांगे आणि आमचं बोलणं होई. तिच्या डिलिव्हरीआधी मी म्हटलं, आता काय महिना, दोन महिने भेट नाही होणार. पण पठ्ठी पाचव्या दिवशी बाळासोबत मोठ्या मुलाला आणायला बाहेर. दुसराही मुलगाच झाला म्हणून खट्टू झालेली आणि मुलीसाठी तिसऱ्या बाळाचे स्वप्न बघणारी ती पाहून ‘हम दो-हमारा एक’वर खूश असलेल्या मी तोंडात बोटं घालायचंच बाकी होतं. एक-दोन महिन्यांनी आम्ही ते शहर सोडलं, तेव्हा तिने घरी बोलावलं होतं. केळीचे पॅनकेक केले होते माझ्यासाठी व्हेज रेसिपी शोधून. मी तिला समोसे खायला घरी बोलावले दुसऱ्या दिवशी, तर घरातली सामानाची बांधाबांध बघून तिचा बांध फुटला- हमसून हमसून रडली. नवीन देशात अनोळखी लोकांशी वागताना किती जवळ जायचं, किती फॉर्मल राहायचं याचे ठोकताळे बांधताना हे तिचं गुंतणं मनाला भावून गेलं.

याच शहरात अजून एक रशियन जोडपे असेच जीव लावणारे भेटले मंदिरात. भारताबद्दल आणि इथल्या संस्कृतीबद्दल प्रेम, ओढ असलेले हे जोडपे आणि त्यांची नऊ वर्षांची मुलगी- आमची त्या शहरात एक्सटेंडेड फॅमिली झाले. माझं जर्मन खूपच बेसिक होतं आणि तिला रशियन आणि जर्मन सोडून काही येत नसे. तरी बरेचसे सूप्स, सलाड, काही रशियन स्वीट्स शिकले तिच्या स्वयंपाकघरात घुसून. मेडिएटर अर्थात तिचा नवरा - तो दारात उभं राहून ट्रान्सलेट करून देई आमचा संवाद. तिला खूप उत्सुकता होती भारताबद्दल आणि मला खूप प्रश्न होते जर्मनीमधल्या सुपरमार्केटमध्ये ढिगाने मिळणाऱ्या खाण्याच्या गोष्टींपैकी नक्की काय, कसं वापरायचं याबद्दल. नंतर मी जर्मन शिकले तेव्हा तिलाच खूप आनंद झाला - मेडिएटर लागणार नाही आता म्हणून. तिची मुलगी माझ्या मुलीची “दीदी" झाली. अजूनही भेट होईल तेव्हा मधल्या काळात झालेल्या वाढदिवसांचं गिफ्ट मिळतं आम्हा तिघांनाही. तिचं दागिन्यांबद्दल प्रेम पाहून भारतातून आणलेले गळ्यातले- कानातले दिले, तेव्हा कित्येक दिवस तेच वापरत होती ती. ते शहर सोडल्यावर एकदा आवर्जून राहायला बोलावलं होतं त्यांनी. तेव्हा त्यांचं रुटीन, रशिया ते जर्मनी आणि मग आतापर्यंतचा प्रवास अशा खूप गप्पा झाल्या. भाषा येवो न येवो, मनं जुळली की संवादासाठी मार्ग निघतोच.

जर्मन क्लासमध्ये अशीच एक युक्रेनची मैत्रीण भेटली. खरंतर सगळे देश मला ओळख झाल्यावर नकाशावर शोधावे लागत होते. ती रोज माझ्यासाठी क्लासमध्ये जागा पकडे, मुलीला शाळेत सोडून धावतपळत क्लास गच्च भरल्यावर पोहोचलं की तिने पकडलेली दुसऱ्या बेंचवरची जागा वरदान वाटे. तिला माझं अरेंज्ड मॅरेज कसं ठरल्यापासून दोन महिन्यांत झालं हे आश्चर्य, तर मला इंटरनेटवर भेटलेल्या अनोळखी ग्रीक मुलाशी लग्न करण्यासाठी देश, नोकरी सोडून जर्मनीला आलेल्या हिचं नवल. परीक्षा झाली की पहिल्यांदाच सासरच्यांना भेटायला जाणार होती ती ग्रीसला. त्यासाठीची खरेदी करण्यासाठी क्लास सुटला की आजूबाजूच्या दुकानांमध्ये भटकत असू आम्ही.

माझ्या नोकरीच्या ट्रेनिंगमध्ये माझी दोन महिने रूममेट असलेली माझी जर्मन मैत्रीण तर एकदम सॉर्टेड मुलगी होती. खूप हुशार, करिअर फोकस्ड आणि फिटनेस फ्रिक. तिच्याकडून इथले वर्क एटीकेट्स कळाले मला. पहिल्याच दिवशी तिने डिक्लेअर केलं - तुझं जर्मन कम्युनिकेशन सुधारण्यासाठी तू जर्मनमध्ये बोलत जा माझ्याशी, इंग्लिशची पळवाट नको शोधू. तिचा वक्तशीरपणा, सकाळी निघण्याच्या अर्धा-एक तास आधी हॉलच्या टेबलवर मांडलेलं चावी, मोबाईल, टोपी, हातमोजे बघून पहिल्या दोन-तीन दिवसांत निघताना गडबड करणारी मी नंतर शिस्तीत वेळेआधी आवरायला लागले. नंतर एकाच प्रोजेक्टमध्ये वेगळ्या टीममध्ये काम करताना आवर्जून ती आठवड्यातून एकदा कॉफीसाठी किंवा लंचसाठी मीटिंग रिक्वेस्ट पाठवे. तिच्या वाढदिवसाला मी घरून केक बनवून नेला, तर प्रोजेक्टमुळे हॉटेलमध्ये राहणारी ती खुश झाली. आम्हा दोघींचं पहिल्याच वर्षी एकत्र प्रमोशन झाल्यावर मी तिला ‘थँक यू’ म्हटलं. शेवटी तिच्या पळवाट न शोधण्याच्या आग्रहामुळेच मीटिंग्समध्ये थोडं बरं जर्मन बोलत होते मी. तर ती म्हणे उलट तुझ्यामुळे भारतातल्या टीमसोबत कसं डील करायचं त्याचा अंदाज आला मला!

नवीन घरात शिफ्ट झाल्यावर बिल्डिंगमध्ये पहिल्याच दिवशी जर्मन्ससाठी नॉट सो कॉमन असलेले वेलकम ग्रीटिंग पाठवणारी बिल्डिंगमधली एक आजी, आमच्याकडे बाळ येणार आहे कळल्यावर हरखून गेली होती. दवाखान्यातून घरी आल्यावर फोन करून बाळ जागं असल्याची खात्री करून आली, ते बाळासाठी दोन ड्रेस आणि एक-दोन दुपटे घेऊनच. बाळाचं जावळ, घरात पसरलेले कपडे आणि पाळणा वगैरे बघून तिच्या मुलीचं लहानपण आठवून डोळ्यांत पाणी आलं. आम्ही नाही पोहोचलो तरी कोणत्यातरी आजीचा आशीर्वाद मिळाला बाळाला, म्हणून तिकडे भारतात बाळाच्या दोन्ही आजींचे डोळे पाणावले.

सगळेच अनुभव एवढे गोड असतात असे नाही; पण जगात सगळीकडेच वेगवेगळ्या पद्धतीने का असेना प्रेम, जिव्हाळा असतोच! मोजूनमापून सुरुवात करून का होईना, हळूहळू ते मैत्र जुळत जाते आणि जगणे सुंदर होते. 

chaitralisakhare@gmail.com