Join us  

गली में आज चाॅंद निकला! स्वप्न पाहण्याच्या वयापासून प्रेमात पडण्यापर्यंत, चंद्र सोबत करतो तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2024 2:08 PM

Diwali and dreams celebration : प्रत्येकाचं चंद्राशी खास नातं असतं आणि प्रत्येकाने चंद्राला सांगितलेलं गुपितही निराळंच! कोजागरी ते दिवाळी, चंद्राचा हा प्रवास आपल्या मनाचाही असतोच,

ठळक मुद्देकिती काळ लोटला कोण जाणे पण तू आलास आणि चंद्र उगवलाय बघ... ‘तुम आए तो आया मुझे याद, गली में आज चाॅंद निकला...’

- माधवी भटप्रत्येक भाषेतल्या कवी, लेखकांनी चंद्रावर ढीगभर लिहून ठेवलं असेल पण सर्वसामान्य माणसाला चंद्रावर प्रेम करायला लावलं ते गीतांनी. हिंदी, मराठी चित्रपट गीतं, नाट्यगीतं यांना हे श्रेय जातं. विशेषत: हिंदी गाणी. कारण चित्रपट आणि रेडिओच्या माध्यमातून ती रसिकांपर्यंत सहज पोहोचत होती. सोपी चाल, साधे शब्द आणि दृश्ये यातून योग्य तो परिणाम साधला जाई.विज्ञानाने कितीही प्रगती केली आणि चंद्राचं वास्तव फोटोंसह आपल्यापुढे आणून ठेवलं असलं, तरीही त्याची मोहिनी काही कमी झाली नाही. चंद्राच्या अमावास्या-पौर्णिमा पृथ्वीवरच्या माणसांना आजही आकर्षित करतात. त्याच्या मनात आनंद, सुख, आशा-निराशा यांची भरती-ओहोटी सुरू असते; ती व्यक्त करायला चंद्रच लागतो.

लहानपणी निंबोणीच्या झाडामागे लपलेल्या चंद्रापासून झालेली सुरूवात ते दर अमावास्या-पौर्णिमेपर्यंत लहान-मोठा होणाऱ्या चंद्राची कथा आपल्याला आजही आठवते. तेव्हा तो चांदोमामा होता. भाऊबीजेला आई, आजी, काकू, आत्या, मावशी बीज निघाली का म्हणून एकमेकींना विचारत आणि अल्पकाळ दिसणाऱ्या द्वितीयेच्या चंद्रकोरीला ओवाळत. पण चंद्र जाणतेपणी प्रथम कधी भेटला तर शाळेत रूपक अलंकार शिकले तेव्हा...‘उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी ‘मुखचंद्रमा’ सकळिकांसी।।’

या ओळीतला चंद्रा वेगळा आहे हे तेव्हा पहिल्यांदा लख्ख कळलं आणि चंद्र पूर्णपणे वेगळ्या परिप्रेक्षात ओळखीचा झाला. चंद्राला गीतकार, कवींनी किती वेगवेगळ्या उपमा देऊन भावना व्यक्त केल्या आहेत. प्रेम, मिलनाचा संकेत, शृंगार, विरह जास्त व्यक्त झाल्या आहेत. एखाद्या तरुणीच्या मनातला ‘संदेस’ पोहोचवण्याची विनवणी करणारं गाणं ‘चंदा जा, चंदा जा रे...’

प्रियकराच्या भेटीसाठी उत्सुक असलेल्या प्रेयसीला चंद्र आभाळातून चोरून बघतो...

‘बदली हटा के चंदा, चुपके से झाके चंदा, तोहे राहू लागे बैरी मुस्काए जी जलाईके’एकतर चोरून बघतो वरून खुदकन हसतो म्हणून त्याला राहूचा धाक दाखवणं लोभस आहे.त्याचप्रमाणे, ‘उंबरठा’ चित्रपटात चैत्र गौरीच्या कार्यक्रमात ‘चांद मातला मातला त्याला कशी आवरू ?’ असा थेट प्रश्न करून धीटपणे आपल्या मनची इच्छा सांगणारी नायिका या आधी भेटली होती ती ‘तू चंदा मै चांदनी...’ गाण्यात.मी ९० च्या दशकात वाढलेली आहे. माझ्या पिढीला अनेक चंद्रगीतं ठाऊक आहेत.‘समझकर चाॅंद जिसको आसमाॅं ने दिल में रख्खा है, मेरे मेहबूब की टुटी हुई चुडी का टुकडा है’,‘चाॅंद से परदा किजीये कही चुरा ना ले चेहरे का नूर...’

‘चाॅंद छुपा बादल में...’अशी कितीतरी गाणी. अनेक गाणी.

पण त्यात आजही ‘चंदा रे चंदा रे.. कभी तो जमीं पर आ...’ गाण्याला विशेष स्थान आहे हे कोणीही मान्य करेल.‘हुतुतू’ सिनेमात एक गाणं आहे चंद्रावरच. त्यात एक सुंदर ओळ गुलजारांनी लिहिली,‘वर्दी पे धब्बे है तेरे, कारखाने से निकला...’

चंद्राबद्दल अशी कल्पना फक्त तेच करू जाणोत.कदाचित म्हणूनच त्यांनी ‘आँधी’ सिनेमात एक सुंदर प्रसंग चित्रित केला आहे.

पुरातन इमारतीवरची अरबी आयते दिवसा खूप सुंदर दिसतात, असं आरतीला जेके सांगत असतो. ती म्हणते दिवसा मी कशी येऊ शकेन इथे?मग तो सांगतो, ‘हा चंद्र आहे ना, हा रात्रीच खूप सुंदर दिसतो. याला रात्री बघता येईल तसा हा रोजच उगवतो, पण कधी कधी अमावास्या येते. तशी अमावास्या पंधरा दिवसांनी येते, मगर इस बार बहुत लंबी थी...’

आरती गहिवरून म्हणते ‘नौ साल लंबी थी ना?’ आणि लगेच गाणं पुढे जातं ‘जी में आता है...’

काही लोकांना ज्योतिषी करंगळीत चांदीच्या कोंदणात मोती घालायला सांगतात. कारण मोती चंद्रावर नियंत्रण ठेवतो म्हणतात. कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. मनात उसळणाऱ्या भावनांच्या लाटांना तो आवरतो. चंद्राचा संबंध असा सरळ मनाशी आहे. प्रत्येकाचा चंद्र वेगळा असतो.

प्रत्येकाने चंद्राला सांगितलेलं गुपितही निराळं आहे. युगानुयुगं चंद्र ती सगळी गुपितं आपल्या मनात जपून ठेवतो आहे.सुरांनी चंद्र होऊन आपला निरोप प्रियकराला पोहोचवण्याची इच्छा एखादीच्या मनात विनाकारणच येत असावी का?जीवलगांच्या गुप्त भेटीत कोणी पाहणार तर नाही ना? याची दक्षता घेतात, पण तेच दोन जीव अतिशय आनंदाने गातात ‘चंद्र आहे साक्षीला..’

तरीही एखादी असते. जी वाट बघत बसते.

सगळ्या जगाची उस्तवार करून वेळ मिळाला की तो येईल. अगदी जरा वेळ का होईना पण येईल. तेवढी घटिका आपली. तो क्षण साजरा करायचा.पण म्हणून तगादा लावायचा नाही, करूणा भाकायची नाही. तो त्याचा हून आला पाहिजे. आणि एकेदिवशी ध्यानीमनी नसताना अचानक तो येतो... तिची त्रेधा उडते. तो आलाय. असा पुढ्यात येऊन बसलाय आणि अचानक तिला जाणीव होते.

किती काळ लोटला कोण जाणे पण तू आलास आणि चंद्र उगवलाय बघ...‘तुम आए तो आया मुझे याद, गली में आज चाॅंद निकला...’

madhavpriya.bhat86@gmail.com

टॅग्स :दिवाळी 2024बॉलिवूडसंगीतलाइफस्टाइल