-सायली जवळकोटे
श्रावण.. विविध व्रतवैकल्ये अन् सणांनी भरगच्च असा आनंदोत्सव. माझ्या लहानपणी या उत्सवाची तयारी तब्बल पंधरा दिवस आधी सुरु व्हायची. अख्ख्या वाडयाची साफसफाई व्हायची. घरातील महिला वर्ग कामात दंग तर आम्ही बच्चे कंपनी 'झोका कुठे बांधायचा,' या शोधात. जेव्हा की ओसरीमध्ये लाकडी झोपाळा विसावलेला असायचा. तरीही दोरखंड किंवा जुन्या साडीचा झोका आम्हाला प्रिय. या झोक्याच्या हेलकाव्यासोबत श्रावण हलकेच अंगणात उतरायचा.
प्रत्येक दिवस म्हणजे जणू धमाल. रोज घरात कोणाचा तरी उपवास अन् आम्हा मुलांची चंगळ. व्रत-उपवास सुरु असतानाच यायची नागपंचमी. त्यादिवशी तर आम्हा मुलींची खूप मजा असायची.
छायाचित्र:- गुगल
नागपंचमीच्या चार पाच दिवस आधीपासूनच याची तयारी सुरु व्हायची. ज्वारीच्या लाहया,भाजक्या दाळीचे करदंट अन् भाजणीचे पदार्थ असा भरगच्च सरंजाम असायचा.. तर रात्री जागर. गल्लीतल्या सगळ्या बायका-मुली जेवण आटोपून जमायच्या.
त्या काळी सगळ्यांकडेच टिपऱ्या नसायच्या. मग स्वयंपाक घरातलं लाटणं टिपऱ्या म्हणून उपयोगी पडायचं. सासुरवाशिणीपासून माहेरवाशिणीपर्यंत साऱ्याच आबाल-वृद्ध महिला एकत्र येवून फेर, गाणी, टिपऱ्या, उखाणे अन् इतर गोष्टींचा आनंद लुटायच्या. पहाट कधी व्हायची, हे समजायचंही नाही. अशा तीन-चार रात्री जागवून नागपंचमी यायची.
त्याआधी असायचा भावाचा उपवास. उपवासाच्या आदल्यादिवशी मेंदीचाही एक मोठ्ठा कार्यक्रम असायचा. त्या वेळी 'कोन' नसायचे. काडीपेटीच्या काड्या, भेंडी अन् कंगवा यांचा पुरेपूर उपयोग करून आमचे हात लालचुटुक व्हायचे.
मग दुसऱ्या दिवशी रंगायचा नेलपेंट लावण्याचा सोहळा. सकाळीच सुरु व्हायचा हा प्रोग्रॅम. वर्षातून केवळ एक किंवा दोन वेळाच आम्हाला नेलपेंट मिळायचा.आम्ही स्वत:वर फार खुश असायचो.
नागपंचमीच्या दिवशी तर नटून-थटून नवे कपडे घालून आई, काकू अन् इतर सगळ्याजणी मिळून मंदिरात जायचो. मंदिराजवळ मोठ-मोठे बांबू वापरून भला मोठ्ठा झोका बांधलेला असायचा. तिथं प्रचंड गर्दी असायची.
छायाचित्र:- गुगल
त्या गल्लीतले 'दादा' लोक गर्दीवर लक्ष ठेवून नंबरप्रमाणे झोका खेळायला देत. कधी एकटयाने तर कधी दोघी मिळून झोका खेळायचो. केवळ मुलीच नाही तर मोठ्या बायकाही या झोक्यावर बसायच्या. तेव्हा यात कोणालाही कसलाही संकोच-बिंकोच वाटत नसायचा. विशेष म्हणजे माहेरवाशिणीला यात प्राधान्य असायचं.
आज काल हे सगळे सणवार हळूहळू काळाच्या पडद्याआड़ जातांना दिसत आहेत. मात्र ग्रामीण भागात आणि शहरातील गावठाण भागात थोड्या फ़ार प्रमाणात हे उत्सव पार पडतात. त्यात साऱ्या विश्वावर आलेलं कोव्हीडच संकट. त्यामुळे सर्वत्र उदासी,नाराजी,भीतीचं वातावरण आहे.मात्र लवकरच आपण यातून बाहेर पडू हा विश्वास महत्वाचा. मन नागपंचमीच्या झोक्याकडे धावतंच. पुन्हा ते दिवस यावे. पुन्हा सर्वत्र श्रावण बहरावा. अन् आनंदाच्या झोक्यावर सर्वांनी मोकळा श्वास घ्यावा. हेच मागणे या निसर्गाला, ईश्वराला.
sayalijavalkote@gmail.com