गौरी पटवर्धन
दहा मिन्टात स्वयंपाक तयार होईल. तोवर ताटं घे, जेवायला बसायची तयारी कर.असं ती त्याला सांगते. तो ही ताटं, वाट्या, पाणी प्यायची भांडी आणि पाणी घेतो. आपण कशी बायकोला मदत केली म्हणून स्वतःवर खूश होऊन फोन घेऊन बसतो. आणि मग ती दहा मिनिटांनी घाम पुसत येते आणि चिडतेच.“अरे तुला सगळी तयारी करायला सांगितली होती ना मी?”“हो मग, ही काय, केलीये ना…” तो बावचळतोच.ती चिडते. कटकट करायला लागते.आपण ताटं, वाट्या, पाण्याची भांडी आणि पाणी हे सगळं घेऊनसुद्धा आपण नापास का झालो हे त्याला बिचाऱ्याला कळत नाही. मग ती एक एक विचारायला आणि दाखवायला सुरुवात करते.“ताटं पुसून घ्यायची. ओली आहेत.”“अरे हो. लगेच पुसतो.”“बाकी सगळं घेतलंच नाहीस तू…”“बाकी सगळं म्हणजे?” ताटं पुसता पुसता तो इकडे तिकडे बघतो. आता अजून काय घ्यायचं होतं, हे त्याला लक्षात येत नाही.
“अरे तूप, मीठ, लोणचं, चमचे, गरम वस्तू ठेवायच्या लाकडी चकत्या…” पोळ्यांचा डबा, कुकरमधला भात..“अरे हो…” त्याला तोवर सुचलेलंच नसतं. तो घाईघाईने त्या सगळ्या वस्तू आणायला जातो. आणि मग दोघं जेवायला बसतात. हे जेव्हा पहिल्यांदा, पाचव्यांदा किंवा दहाव्यांदा होतं तोवर बायकोचा पेशन्स टिकतो. कारण लग्न होईपर्यंत आपल्या नवऱ्याने कधीच हे काम केलेलं नाही हे तिने समजून घेतलेलं असतं. पण सहा महिने झाल्यानंतरसुद्धा जेव्हा त्याला हे कळत नाही की जेवायला बसतांना काय काय घेऊन बसायचं, त्यावेळी मात्र तिची चिडचिड व्हायला लागते.कारण आपला नवरा एरवी बुद्धिमान आहे हे तिला माहिती असतं. त्याच्या ऑफिसमध्ये त्याची कीर्ती अशी असते की त्याच्या कामात कधीच बारीक बारीक चुका राहत नाहीत. तेही तिला माहिती असतं. मग ऑफिसचं काम परफेक्ट करणाऱ्या माणसाला घरातल्या इतक्या साध्या साध्या कामांचा उरक कसा नाही हे तिच्या लक्षात येत नाही. पण तो ते काम नीट करत नाही हे मात्र तिच्या पक्कं लक्षात येतं. मग ती त्याला सतत सूचना द्यायला लागते. त्या ऐकून तो कंटाळतो. एका लिमिटनंतर तो म्हणतो की, त्यापेक्षा तूच कर ना ते काम. कर तूला हवं तसं.आणि मग एक तर त्यांचं भांडण होतं किंवा रागारागात ती ते काम स्वतःच करून टाकते. आणि मग म्हणतेच की घरात कुणीच मला मदत करत नाही..
तर अशा वेळी करायचं काय?
१. भांडण हे उत्तर नाही आणि तिने स्वतः ते काम करून टाकणं म्हणजे तर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणंच आहे. ते करू नये.२. तर त्याने घरातलं काम ऑफिसच्या कामाइतकं सिरियसली करायचं. ऑफिसमध्ये कशा आपण चुका होऊ नयेत, आपलं काम परफेक्ट असावं यासाठी प्रयत्न करतो तसंच घरीही करायचं. एका एका कामाची संपूर्ण जबाबदारी घ्यायची. घरातली कामं दोघांची असतात हे मान्य करायचं. ती कामं शेअर करायची. त्या कामांचा विचार पण स्वतः करायचा. सांगकाम्यासारखं फक्त सांगितलेलं काम करायचं नाही. तर त्या कामाचा मेंटल लोडसुद्धा घ्यायचा.३. ही कामं लग्नाआधी केलेली नसल्यामुळे ती नीट जमायला वेळ लागेल, पण ती चिकाटीने करायची. हळूहळू ती उत्तम जमतील यावर विश्वास ठेवायचा आणि प्रयत्न करायचे.४. आणि तिने काय करायचं तर त्याला ती कामं हळूहळू उत्तम जमतील यावर विश्वास ठेवायचा आणि त्याला प्रयत्न करू द्यायचे. प्रत्येक काम आपल्याला पाहिजे तसंच झालं पाहिजे याचा हट्ट सोडून द्यायचा.५. घरातल्या इतर सदस्यांवर जबाबदारी टाकायची. ती त्यांनी पार पाडली नाही तर होणाऱ्या गोंधळाची फळं सगळ्यांना भोगू द्यायची. त्यातूनच हळूहळू कुटुंब शिकतं.६. आणि अश्या जबाबदारी वाटून घेणाऱ्या कुटुंबात वाढलेलं मूल आपोआप जबाबदारी घ्यायला शिकतं… समाज समानतेच्या दिशेने एक पाऊल पुढे जातो. तेवढं तर आपण करुच शकतो.
(लेखिका पत्रकार आहेत.)