डॉ. हमीद दाभोलकर
नेटफ्लिक्स वरती प्रदर्शित झालेला ‘ग्रेट इंडियन किचन’ नावाचा सिनेमा तुम्ही बघितलात का ? जरूर बघावा असा सिनेमा आहे. सध्या सोशलमिडियावर त्याची मोठी चर्चा चालू आहे. पुरुषप्रधान मानसिकतेच्या समाजात रोज स्वत्वाशी तडजोड कराव्या लागणाऱ्या आणि ह्या द्वंद्वातून शेवटी यशस्वीपणे बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका स्त्रीची ही गोष्ट आहे. महिलांचे मानसिक आरोग्य या विषयी लिहायचे म्हणून मी विचार करायला लागलो आणि मला पहिल्यांदा हा सिनेमाच आठवला. आपल्या देशातील महिलांचे मानसिक आरोग्याच्या प्रश्नांशी आपल्या समाजातील पुरुषप्रधान मानसिकता ही इतकी घट्ट जोडली गेली आहे की, तिचे संदर्भ समजून घेण्यापासूनच आपण आपण महिलांचे मानसिक आरोग्य हा विषयी चर्चेची सुरुवात करायला हवी असे वाटते.
मागच्या आठवड्यात माझ्याकडे उपचाराच्या साठी आलेल्या एका पेशंटची गोष्ट पुरुषप्रधानतेच स्त्रियांच्या मानसिक आरोग्याच्यावरचा प्रभाव समजून घेण्यासाठी उपयोगी पडू शकेल अशी आहे म्हणून थोडक्यात सांगतो. साधारण पन्नाशीच्या आसपास वय असलेल्या ह्या बाई. त्यांच्या यजमानांच्यासोबत माझ्याकडे मंत्रचळ ह्या त्रासाच्या उपचारासाठी आल्या होत्या. ‘मंत्रचळ’ ह्या आजारात एखादी गोष्ट मनात आली की ती सहजा सहजी जात नाही आणि त्यामुळे खूप अस्वस्थता निर्माण होते.खास करून स्वच्छता टापटीप याविषयी लक्षणे असतात. एखादी गोष्ट किती साफ केली तरी नीट स्वच्छ झाली आहे असे वाटतच नाही. आजारी व्यक्ती ती गोष्ट परतपरत साफ करत रहाते. स्वाभाविक आहे की सकाळी दात घासण्या पासून ते अंघोळीपर्यंत आणि घरातील प्रत्येक कामाच्यामध्ये ही लक्षणे अडचणीची ठरतात. ह्या महिलेचा खूप जास्त वेळ ती कामे करण्यात जातो.
हा झाला आजाराचा भाग पण याचा पुरुष प्रधानतेशी असलेला सबंध सजून घेवू. ही महिला तीच्या घरातील एकटी कमावती व्यक्ती आहे! ती धुणीभांडी करून कुटुंब चालवते. मंत्राचाळाचा आजार असलेल्या व्यक्तीला धुणीभांडी हे काम करणे किती अवघड जात असेल ह्यांची आपण कल्पना करू शकतो. सगळ्यात अक्षेपार्ह बाब म्हणजे ह्या महिलेचा तरुण मुलगा आणि नवरा दोघेही धडधाकट असून घरात बसून राहतात. काहीही काम न करता केवळ हुकुम सोडत राहतात. ह्या महिलेने स्वत: कमावलेले पैसे तिच्याच उपचाराच्यासाठी वापरायला आडकाठी करतात. प्रेमाचे दोन शब्द बोलत नाहीत आणि आजाराच्यामुळे काम करायला वेळ लागतो म्हणून सातत्याने टोचून बोलत राहतात.
हे उदाहरण समजून घेतले तर आपल्या लक्षात येवू शकेल कि किती वेगवेगळ्या पातळ्यांच्या वर ह्या स्त्रीला पुरुषप्रधान मानसिकतेचा सामना करावा लागत आहे. या महिलेचा मुलगा आणि नवरा दोघेही तिला मदत करून हा आजार आटोक्यात आणण्यासाठी आधार देवू शकतात. स्वत: काही काम करून कुटुंबाचा थोडा भार उचलू शकतात,घरातील धुणीभांडी, स्वच्छता करण्यासाठी मदत करू शकतात, ह्या महिलेचा आजार समजून त्याच्या उपचारात मदत करू शकतात. यामधील काही नाही केले तरी त्या महिलेने स्वत: मिळवलेल्या पैशाच्या मधून तिचा उपचार तरी निट करायला मदत करू शकतात. पण ह्या मधील कोणतीही गोष्ट ते करत नाहीत. ह्याचे कारण स्त्रियांना आपल्या समाजाने शतकानुशतके दिलेले दुय्यम स्थान हे आहे.अगदी पूर्णपणे नसले तरी काही प्रमाणात हा आजार निर्माण होण्यात आणि तो बरा न होण्यात ही पुरुषप्रधान मानसिकता हातभार लावत राहते.
पुरुषप्रधान मानसिकता ही केवळ पुरुषांच्या मधेच दिसून येते असे नाही. अनेक शतकानुशतकांच्या प्रभावातून अनेक स्त्रिया देखील ह्या मनोवृत्तीच्या बाहेर पडू शकत नाहीत. त्या देखील आपले समाजातील स्थान दुय्यम आहे असेच मानून जगत राहतात. स्वत:च्या हक्कांच्या विषयी जागरूक राहण्यापेक्षा शोषण सहन करत राहतात. स्वाभाविक आहे कि या शोषणाचा स्त्रियांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. एक व्यक्ती म्हणून जी निकोप वाढ व्हायला पाहिजे ती होताना अडथळे तर येतातच पण त्याच बरोबर विशिष्ट स्वरूपाचे मानसीक ताण तणाव आणि मानसिक आजार देखील निर्माण होऊ शकतात.
त्या विषयी ह्या लेखमालेत आपण पुढे सविस्तर बोलणार आहोतच पण तोपर्यंत एव्हडी तरी नोंद आपण आपल्याशी घेवून ठेवूया की अंगात येणे किंवा मानसिक ताण शारीरिक लक्षणाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा त्रास हे खास करून भारतीय उपखंडातील स्त्रियांच्या मध्ये दिसून येणारे आजार हे निर्माण होण्यात पुरुषप्रधान संस्कृतीचा मोठा भाग आहे.
हे जरी खरे असले तरी महिलांच्या मानसिक आरोग्याचे सगळेच खापर काही पुरुषप्रधान संस्कृतीवर फोडता येत नाही. त्यामधील एक मोठा भाग हा जैविक म्हणजे स्त्रीच्या शरीराशी देखील जोडलेला असतो. दर महिन्याला येणारी मासिक पाळी आणि गर्भधारणा ह्यांच्या अनुषंगाने स्त्रीच्या शरीरात होणारे जे हार्मोन बदलत असतात त्यांचा देखील स्त्रियांच्या मानसिक आरोग्य आणि आजारांशी जवळचा संबंध दिसून येतो. मासिकपाळीच्या दिवसांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मानसिक स्वास्थ्य खराब होणे. तसेच बाळंतपणाच्या नंतर येणारे डिप्रेशनसारखे मानसिक त्रास हे स्त्रियांच्या शारीरिकतेशी जोडलेले असतात. स्त्रीच्या आणि पुरुषांच्या मेंदूच्या ठेवणी मध्ये देखील काही सूक्ष्म फरक असतात ज्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. ह्या जैविक आणि मनोसामाजिक करणाच्या मिश्रणातून स्त्रियांच्या मधील मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्या विषयी आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.
एक अत्यंत महत्वाची गोष्ट मात्र आपण सुरुवातीलाच समजून घेवूया.
कारण कोणतेही असो आपल्या मानसिक आजाराला किंवा आरोग्याला दुसऱ्याला जबाबदार धरून आणि दोषआरोप करून आपण जास्तीत जास्त एखादा वाद जिंकू शकू पण प्रत्यक्षात आपले मानसिक आरोग्य दुरुस्त करण्यासाठी त्याचा उपयोग होईलच असे अजिबात सांगता येत नाही. ‘ग्रेट इंडियन किचन’ मधील नायिका ही जशी जगाला दोष देत बसत आणि ते बदलण्याची वाट न बघत बसता आपल्या आयुष्याची दोरी स्वत:च्या हातात घेते आणि पुढे चालू लागते तसे आपण देखील आपल्या मानसिक आरोग्याची दोरी आपल्या स्व:च्या हातात घेणार का? हा प्रश्न ह्या निमित्ताने आपण स्वत:ला विचारूया.
आपल्यावर मनावर खोलवर संस्कार करणाऱ्या परीकथा किंवा हिंदी सिनेमा प्रमाणे कोणी राजकुमार किंवा हिरो येवून आपले प्रश्न सोडवणार आहे यामधेच आपण अडकून राहणार का आपल्या गोष्टीची कथा स्वत: लिहायला घेणार यावरून पुढचे सगळे काही ठरणार आहे. एकदा का आपण आपल्या मानसिक आरोग्यासाठी स्वत:ला जबाबदार धरून दुसऱ्याला दोष देणे थांबवले की ते आपल्या ताब्यात आणण्याचे आणि अधिक सदृढ करण्याचे असंख्य मार्ग दिसू लागतात. फक्त हा निर्णय आपण घेण्याची तेवढी गरज आहे .
(लेखक मानसोपचार तज्ज्ञ आहेत. परिवर्तन संस्था आणि महाराष्ट्र अंनिस)
मानसिक आधार आणि आत्महत्या प्रतिबंध मनोबल हेल्पलाईन ७४१२०४०३००
वेबसाईट:www.parivartantrust.in