गौरी पटवर्धन
झाडांची हिरवाई बघून बरं वाटतं हे आधुनिक आपल्याला माहिती आहे. त्यामुळे सध्या सतत येणाऱ्या टेन्शनसाठी कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जाणं हे अनेकांसाठी स्ट्रेस बस्टर असू शकतं. पण आत्ताच्या परिस्थितीत ते करणंही आपल्याला शक्य नाहीये. प्रवास करणं जितका टाळू तितकं शहाणपणाचं ठरतंय. मग अशा वेळी केवळ निसर्गातच मिळणारी आणि आत्ता सॉलिड महत्वाची झालेली ही मनःशांती आणायची कुठून?
तर साधा विचार करायचा. आपण निसर्गाकडे जाऊ शकत नाही, तर निदान निसर्गाचा एखादा तुकडा आपल्याकडे आणू शकतो का? मोठी झाडं नाही, तर निदान छोटी झाडं तरी आपल्या घराच्या अंगणात / गच्चीत / गॅलरीत / खिडकीत लावू शकतो का? छोटीशी बाग फुलवू शकतो का?
तुम्हाला जर असं वाटत असेल, की बाग करणं म्हणजे फार वेळखाऊ काम आहे, रोज पाणी कोण घालेल, कुंड्यांमधून पाणी घातल्यावर थोडी का असेना माती बाहेर येते ती कोण आवरेल, आणि मुख्य म्हणजे आत्ता लॉक डाऊनमध्ये कुंड्या, झाडं, माती हे सगळं आणायचं कुठून? तर त्यावर एक फार फार सोपी आयडिया आहे. कुंड्या, माती आणि झाड यातलं काहीच आणायचं नाही.
घरातले जुने प्लास्टिकचे डबे असतात त्यांना तळाशी भोकं पाडायची, त्यात घराखालची थोडीशी माती आणि बाकी भरपूर पालापाचोळा घालायचा. त्याचं काहीच दिवसात कुजून खत होतं. त्यात घरातले धने किंवा मेथी पेरायची. किंवा एखादा खराब झालेला टोमॅटो कुस्करून त्यात टाकायचा. एखादी लाल सुकी मिरची टाकायची. यातलं काहीही तुम्ही पेरलं आणि त्याला नियमितपणे पाणी घातलंत तर ते उगवून येणारच.
आता रोजचं पाणी घालण्यातून आपल्याला काय मिळतं? तर सगळ्यात भारी म्हणजे रोज रोज आपल्याला मातीचा वास घेता येतो. तोच तो वास, जो पहिल्या पावसात आपल्याला वेडं करून सोडतो. तो सुगंध आपण रोज आपल्या घरात निर्माण करू शकतो. आपण पेरलेल्या बीचा अंकुर उगवणं, आपण लावलेल्या झाडाला नवीन पालवी येणं, त्याला फूल येणं आणि ते आपण अनुभवणं हा फार प्रसन्न करून टाकणारा अनुभव असतो.
खरं वाटत नसेल तर आठवा बरं, तुम्ही शेवटचा मातीत हात कधी घातला होता? किटाणूंच्या सफाईने आपल्या आयुष्यातून माती काढून घेतली. पण मातीत हात घातल्यावर त्या मातीशी जे कनेक्शन जाणवतं त्याची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही.
अनेक बागप्रेमी या कठीण काळात त्यांच्या त्यांच्या बागेत टेन्शन जिरवतायत. फेसबुकवर, व्हाट्सअँपवर बागप्रेमींचे अनेक ग्रूप्स असतात. तिथे तुम्हाला हवं ते मार्गदर्शन मिळू शकतं. बियांची, रोपांची, फांद्यांची सतत देवाणघेवाण चालू असते. बागेबद्दलच्या चर्चा तिथे सतत होत असतात. त्यातून लोक ऊर्जा वाटून घेत असतात. असा एखादा ग्रुप जॉईन करून बघा. त्यातून अजून आयडीयाज मिळतील. लोक घरातल्या घरात पुदिना, कोथिंबीर, लिंबं लावतात. जास्वंदीपासून ते बोन्साय वडाच्या झाडापर्यंत प्रयोग करतात. पण ते नंतर…
आत्ता निदान सुरुवात म्हणून गाजराचा शेंडा पाण्यात ठेऊन द्या, धणे पेरा… कारण त्यातून उगवणारा प्रत्येक अंकुर आणि फुटणारं प्रत्येक पान शुभंकराची चाहूल घेऊन येत असतं. त्याच्या हाती निसर्ग निरोप पाठवत असतो… ऑल इज वेल!