-गिरिजा मुरगोडी
सर्वांची सत्त्वपरीक्षा पाहणारा हा कोरोना दैत्य, काळ बनून आपले सैतानी हात अमर्याद क्रूरतेनं पसरवत चाललाय... जरा कुठे त्याचा जोर कमी होतोय म्हणून सुस्कारा टाकणाऱ्या अवघ्या मानवजातीला पुन्हा नव्या दमानं आपल्या राक्षसी बाहुंनी वेढून घेत चाललाय. पण माणूस कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही आरिष्टासमोर संपूृर्ण शरणागती कधीच पत्करत नाही. सर्व शक्तीनिशी सर्व प्रकारच्या क्षमतांनिशी निकरानं लढत राहतो. आणि असतात सोबतीला काही विसाव्याची बेटंही. त्यातलंच एक बेट असतं, दैनंदिन जीवनात वेगळेपण, बदल आणणारे, आनंद पेरणारे, वेगळी ऊर्जा पुरवणारे सण समारंभ...भोवतालचं मळभ दूर सारत, रखरखत्या उन्हाच्या झळा सौम्य करत वसंतनाद, रंगबहर आणि चैत्रपालवी घेऊन आलाय गुढीपाडवा ! एक प्रकारचं कोंडलेपण अनुभवत रोज नव्या अनपेक्षिताला सामोरं जाताना हा सण साजरा करतोय आपण.
(गुढी : सर्व छायाचित्रं- प्रशांत खरोटे)
वसंतागमनासह वर्षारंभाचे उज्ज्वल संदेश घेऊन येणारा चैत्र महिना आणि सर्व मंगल मांगल्य असा हा गुढीपाडव्याचा सण!चैत्र शुध्द प्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस. हा दिवस नवे संकल्प , तसेच नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो. सर्व पारंपरिक कथांचं सूत्र लक्षात घेतलं तर ‘दूरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’ हेच असल्याचं लक्षात येतं. एकंदरितच आनंदाचं, विजयाचं प्रतीक म्हणून आपण गुढी उभारतो.आजचे असुर वेगळे, आजची तपश्चर्या वेगळी, आजची युध्दं वेगळी आणि आजचे विजयही वेगळे.आताही याही दूरितांचे तिमिर जाऊन नव्या आशेची, यशाची, प्रगतीची किरणं अनुभवता येतीलच येतील. दृष्ट प्रवृत्तींचं निर्दालन आणि ते झाल्यानं केलेला विजयोत्सव हे या सणाचं एक रुप, तर सृजनोत्सव साजरा करणं हेही या सणाचं एक स्वरुप.चैत्र म्हणजे पालवी, बहर, मोहर, कोकिळ कूजन.... नवपल्लवाने सजलेलं निसर्ग रुप हा सृजनोत्सव मनाला नवी ऊर्जा पुरवणारच. वसंगगौरीचा उत्सव चैत्रगौरी निमित्त समारंभहे सगळं म्हणजे सृजनोत्सव आस्वादण्याचेच अनुभव. पन्हं, कैरी डाळ, कलिगंड, काकडी हे रुची वाढवणारे, शरीराला थंडावा देणारे पदार्थ, तर त्यानिमित्त होणाऱ्या भेटीगाठी हे मनाला विसावा देणारे क्षण. या वेळी हे सगळं नाही नेहमीसारखं करता येणार. पण घरच्यापुरतं, कूटूंबापुरतं तर करुच शकतो ना... मनाची मरगळ घालवण्यासाठी यावेळी तर हे जास्तच आवश्यक आहे.दरवर्षीप्रमाणे सुंदर गुढी उभारुया, श्रीखंड पुरीचा बेत करुन एकमेकांना शुभेच्छा देऊन येणारं वर्ष चांगले अनुभव सोबत घेऊन येईल अशी सदिच्छा बाळगत विवंचना थोड्या बाजूला सारुन हा दिवस आनंदात घालवूया!आपल्या आत डोकावून तिथलाही तिमिर दूर करुया. सदभावनांची , सहकार्याची, आपुलकीची गुढी उभारुया!सतत वाढत चाललेल्या तणावाखाली असणाऱ्या प्रत्येकाला मन:पूर्वक सैलावण्याचे काही थोडे क्षण; जे निरामय जगण्यासाठी आवश्यक असतात ते मिळोत. जग जवळ येतंय आणि मनं दूर होत चाललीयत, संवाद संपत चाललाय ते संवादाचे सूत काहीसे बळकट करण्याचं कामही या माध्यमातूनच होत असतं.निसर्गातलं आणि आपल्या जीवनातलं जे जे उत्तम , उदात्त, महन्मधूर आहे त्या सर्वांची जाणीव ठेवणं; त्याबद्दल कृतज्ञता बाळगणं व त्याला वंदन करणं ही प्रत्येक सणामागची मूळ भावना आहे. आनंदाची, समाधानाची, निरामय आरोग्याची गुढी उभारण्यासाठी आपापला खारीचा वाटा उचलण्याचा आपण संकल्प करुया!
(लेखिका गोव्याच्या असून साहित्य आणि सामाजिक विषयावर लेखन करतात)gmmurgodi@gmail.com