गौरी जानवेकरसुख आणि आनंद यांचा संबंध नेमका काय? तर आनंद नसेल तर सुख कितीही घेतलं तरीही पुरत नाही. Pleasure and happiness या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण सुख उपभोगतो तेव्हा आपल्या मेंदूत बक्षीस मिळाल्याची नोंद होते. काही तरी पुढे मिळेल असे वाटले की अजून प्रयत्न करावेसे वाटतात. जेव्हा माणसाच्या मन आणि शरीरावर खूप ताण असतो तेव्हा हे एकदाच मिळालेले बक्षीस पुरत नाही. ते पुन्हा पुन्हा मिळावे असे वाटते. काहींना ते साखरेतून मिळते काहींना खाण्यातून तर काहींना व्यसनातून. पुन्हा पुन्हा सुखाचा अनुभव घेतला तर ताण कमी होऊन आपण आनंदी होऊ असा भ्रम तयार होतो. असे पुन्हा पुन्हा घेतलेले सुख एका वेळी व्यसन होते आणि आनंद अधिकच लांब जातो.शास्त्रीय भाषेत बोलायचे झाले तर सुख म्हणजे डोपमाईन, आनंद म्हणजे सेरोटोनिन आणि ताण म्हणजे कॉर्टिसोल. जितका कॉर्टिसोल अधिक तितका अधिक डोपमाईन तयार करायची इच्छा होते. यात शरीर दमायला लागते.
(Image : google)
मग आनंद कधी निर्माण होतो? सुखाचे मूल्यमापन करून होतो. आपल्याला एखादा अनुभव खरंच हवा आहे का? किती हवा आहे? त्याचे परिणाम काय हे प्रश्न विचारले आणि तसे प्रयत्न केले तर मिळतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आनंद मिळवण्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांची जबादारी घेतली तर तो मिळतो.सुखाला केवळ वर्तमान कळतो, आनंदाला भविष्यकाळाची जाणीव असते. सुख स्वतःभोवती फिरते, आनंदात इतरांची आणि स्वतःची काळजी असते.फिनलॅण्ड हा सलग सहाव्यांदा आनंदी देश म्हणून घोषित झाला आहे, भारताचा नंबर १३६ वा आहे. यात समाज म्हणून आपण जसे आहेत, आपल्याकडे जसे राजकीय निर्णय घेतले जातात या सगळ्याचा हा परिणाम आहे.नुकताच जागतिक आनंद दिवस आहे झाला, त्याची या वर्षीची थीम आहे माइण्डफुलनेस आणि काइंडनेस!
(लेखिका मानसोपचारतज्ज्ञ -काऊन्सिलर आहेत.)