आपल्या अवतीभोवती काही मित्रमैत्रिणी पहा, ते सोशल मीडियात कायम आनंदी दिसतात. काहीजणी तरी इंन्स्टावर प्रचंड हॉट दिसतात. देखण्या. आनंदी. मुक्त. अगदी हॅपनिंग लाइफ. कुणालाही हेवा वाटावा की आपण नोकरीच्या गाड्याला बांधलेले असतात हे इतके भन्नाट आयुष्य कसं काय जगतात. मात्र जे दिसतं ते प्रत्यक्षात खरंच असेल असं नाही. अनेकदा अटेंशन सिकिंग ही गोष्ट फक्त स्वत:च्या जवळच्या वर्तुळापुरतीच मर्यादित न राहता ती अशी सोशल मीडियात जगजाहीर सुरु होते आणि प्रत्यक्षात एकटेपणा, बुजरेपण, सेल्फ इमेजचे प्रश्न, आत्मविश्वास कमी या सगळ्या समस्या छळत असू शकतात.
(Image : Google)
मानसशास्त्र कौन्सिलर प्रिया देशपांडे सांगतात, सुंदर दिसावं, तू खूप सुंदर दिसतेस असं सगळ्यांनी म्हणावं, आपण सगळ्यांच्या डोळ्यात भरण्याइतपत भारी असावं हे वाटणं तरुण वयात स्वाभाविक असतं. मात्र पूर्वी ते एका चाैकटीत सिमीत होतं. आता व्हॉट्सॲपचा डीपी, इन्स्टाग्राम, फेसबुकचा डीपी, स्टेटस, स्टोऱ्या, रिल्स यासाऱ्याच ठिकाणी आपण झळकणं आणि आपल्याकडे सर्वांचं लक्ष वेधुन घेणं हे इतक्या मोठ्या वेगानं होतंय की आपण अटेंशन सिकर झाले आहोत हे करणाऱ्याच्या लक्षातही येत नाही. त्यात पिअर प्रेशर असतंच. सोबतचे मित्रमैत्रिणी करतात ते किंवा त्याहून भारी आपण काहीतरी करावं असं वाटतं. टीनएजर्स कशाला अगदी वयाच्या तिशीत आलेल्या अनेकांनाही नव्या गुड लूक्स स्पर्धेत स्वत:ला पळवत ठेवायला आता आवडतं.
(Image : Google)
एकदम बहनजी दिसते, असं कुणी म्हंटलं तरी अनेकींना अपमान वाटतो. मग सुंदरच नाही तर हॉट दिसण्यासाठी प्रयत्न सुरु होतात. काहीजणींना बॉयफ्रेण्ड सांगतात की तू हॉट दिसायला हवं, तसे फोटो काढ, हॉट-सेक्सी फोटो त्यापायीही अनेकजणी काढतात. मात्र त्यातून आत्मविश्वास गमावून बसणं, आपल्या सेल्फ इमेजचे प्रश्न निर्माण होणं, आपण जसं नाही तसं असण्या-दिसण्यासाठी प्रयत्न करणं असं चक्र सुरु होतं. जे छळतं. त्रास देतं. लाइक्सच्या चक्रात स्वत:मध्ये बदल करत हेच विसरुन जाताता की आपण नेमक्या कशा आहोत. ’
यासाऱ्यातून बाहेर पडायचं तर स्वत:चा स्वीकार, स्वत:ची कर्तबगारी आणि मनासारखं जगण्याचं खरं स्वातंत्र्य हे महत्त्वाचं आहे. इतरांपुढे मांडून ठेवायला आपण काही शो-पीस नाही.