Lokmat Sakhi >Mental Health > Happy Holi : मेरे महबूब के घर रंग है री!- इश्कवाल्या रंगांची गोष्ट!

Happy Holi : मेरे महबूब के घर रंग है री!- इश्कवाल्या रंगांची गोष्ट!

रंगाबरोबर आपला प्रवास सुरु होतो. रंग माणसांच्या मनात काहीतरी जागं करतात,माणसाला जिवंत ठेवतात. रंगांचा हा प्रवास जितका बाहेरून दिसतो तितकाच तो आतूनसुद्धा होत असतो.आपल्या आतल्या रंगाचा प्रवास थांबू न देण्याचे कष्ट मात्र आपले आपल्याला घ्यावे लागतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 06:48 PM2021-03-29T18:48:05+5:302021-03-29T18:57:45+5:30

रंगाबरोबर आपला प्रवास सुरु होतो. रंग माणसांच्या मनात काहीतरी जागं करतात,माणसाला जिवंत ठेवतात. रंगांचा हा प्रवास जितका बाहेरून दिसतो तितकाच तो आतूनसुद्धा होत असतो.आपल्या आतल्या रंगाचा प्रवास थांबू न देण्याचे कष्ट मात्र आपले आपल्याला घ्यावे लागतात.

Happy Holi: -The story of colors in life which gave a human color to us. | Happy Holi : मेरे महबूब के घर रंग है री!- इश्कवाल्या रंगांची गोष्ट!

Happy Holi : मेरे महबूब के घर रंग है री!- इश्कवाल्या रंगांची गोष्ट!

Highlightsआपल्या रोजच्या जीवनात रंग इतके सरमिसळले आहे की, त्यांची जाणीव आपल्याला सहजासहजी होत नाही.एकच एक रंग हे कंटाळा आणणारी कृती आहे.मरणाचं लक्षण आहे.सृष्टी,निसर्ग हा विविध रंगांनी नटला आहे,त्याच्याकडे बघून तरी आपण काहीतरी शिकायला हवं ना? होळी,रंगपंचमी सारखे उत्सव हे आपल्याला हेच शिकवायला येत असावेत.

- अश्विनी बर्वे

व्वा! पण काय रंगत आणली!
तुम्ही आलात आणि मैफलीला रंग चढला!
अगदी रंगाचा बेरंग केला हो त्यांनी!
आता त्यांचे खरे रंग दिसायला लागले!
  असं आपण सहज बोलतानासुद्धा आपल्या भावनांची योग्य ती तीव्रता कळावी म्हणून रंग या शब्दाचा उपयोग करत असतो.खरंतर असे कमी जास्त रंग आपल्या रोजच्या जगण्याला लागलेले असतातच,पण आपलं सहज त्यांच्याकडे लक्ष जात नाही.
   वेगवेगळ्या रंगाच्या जाहिराती येवू लागल्या,रंगा संदर्भात गाणी ऐकू येवू लागली की आपल्याला वाटतं आली होळी,रंगपंचमी.खरंच आपलं आजूबाजूला लक्ष नसतं की मुद्दामहून जे सहज उपलब्ध आहे त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि जे कृत्रिम आहे,जे ट्रेण्डमध्ये आहे त्याकडे लक्ष द्यायचं असं आपण करत असतो.पण आपल्या जीवनात विविध रंग आहेत म्हणूनच तर आपण छान जगू शकतो.


   कदाचित तुम्हाला खोटं वाटेल,पण आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी पाहिलं की माझं म्हणणं तुम्हांला पटेल. बघा ना उन्हाच्या एवढ्या झळा सोसून गुलमोहर चहुबाजूनं फुलला आहे.एखादं हिरवं पान सुद्धा काही झाडांवर शिल्लक नाही. काही ठिकाणी तर जकरांडयाच्या जांभळ्या फुलांनी गालिचा पसरला आहे. बहाव्याच्या पिवळ्या फुलांचे घोस लोंबू लागले आहेत.याशिवाय सोनचाफा,हिरवा चाफा,नागचाफा आपल्या रंगांनी आणि सुगंधाने आपल्या रोजच्या धावपळीत बहार आणत आहेत.एवढंच नाही तर शेतात विसावलेला गहूसुद्धा त्याच्या लालसर सोनेरी रंगात डोलत आहे.आंब्याला आलेला मोहर सुद्धा हिरव्या पानांमध्ये उठून दिसत आहे.तसेच लिंबाऱ्याला आलेला पांढऱ्या पिटुकल्या फुल चांदण्यासुद्धा हसून आपला रंग मिरवत आहे.इतके सगळे रंग आपल्या अवतीभवती असतांना काळ्या आणि पांढऱ्या रंगात जग कसं पाहू शकतो हे मात्र मला कळत नाही.या दोन रंगांच्या मध्ये कितीतरी रंगांच्या छटा आहेत/असतात ज्या आपल्याला वास्तवाचे खरे रंग दाखवतात.पण आपण डोळे झाकून घेतो किंवा उघडे असूनही त्याकडे बघत नाही.


   आपल्या रोजच्या जीवनात रंग इतके सरमिसळले आहे की, त्यांची जाणीव आपल्याला सहजासहजी होत नाही.आता गाडी चालवतांना सिग्नल बघतो,त्यातही रंग असतात,त्याचे अर्थ आपल्याला चांगले माहित असतात पण जीवनात बेफिकिरीचा,बेमुर्वतपणाचा रंग यावा आणि त्यामुळे इतरांनी लाल व्हावे म्हणून काहीजण खुशाल सिग्नल मोडत असतात. तर बरेचसे तो पाळत असतात.एवढंच नाही तर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुद्धा या रंगांच्या साहय्यानं धोका आहे,नाही हे रंगांच्या माध्यमातून सांगितले जाते. हिरवा म्हणजे धोका नाही. पिवळा अलर्ट म्हणजे जागृत रहा,परिस्थितीकडे लक्ष ठेवून असा.केशरी रंग म्हणजे,धोका आहे तयार व्हा,आणि लाल म्हणजे धोकाच. हे चार मूळ रंग आपल्या आयुष्यात आपल्याला जिथं तिथं हवे असतात,दिसत असतात.याच रंगांच्या विविध छटा,पोत यांचा उपयोग करून आपण सजत असतो,आपली घरं सजवत असतो.हे आजूबाजूचे रंग आपल्या जीवनात जी गंमत आणतात त्यामुळेच आपण जिवंत वाटत असतो. हे रंगच नसते तर आपल्यातला हा जिवंतपणा, जीवनाबद्दलची आस कधीच संपली असती. अहो शाळेत जात असतांना रोज रोज तोच युनिफॉर्म घालायचा आपल्याला किती कंटाळा यायचा.तरीपण आपण सगळ्यांना एकाच रंगानं रंगवायला बघतो.किंबहुना आपण रंगाची विभागणी जाती-धर्मानुसार करतो.आणि तोच रंग वाढायला हवा म्हणून रंगाचा बेरंग करतो.एकच एक रंग हे कंटाळा आणणारी कृती आहे.मरणाचं लक्षण आहे. 

सृष्टी,निसर्ग हा विविध रंगांनी नटला आहे,त्याच्याकडे बघून तरी आपण काहीतरी शिकायला हवं ना?मला वाटतं होळी,रंगपंचमी सारखे उत्सव हे आपल्याला हेच शिकवायला येत असावेत.तसंही आपल्याला चित्रं बघण्याची फारशी सवय नसते,त्यात वापरलेले रंग आपल्याला काय सांगू इच्छितात याचा विचारही आपल्याला करायचा नसतो.कारण सहज सोप्पं,कोणीतरी सांगितलेलं आणि डोक्याला फारसा ताप होणार नाही असं वागायला आपल्याला आवडतं. त्याचमुळे असे उत्सव आपल्या आतल्या जाणीवा लख्ख करायला येत असावेत.याठिकाणी मला अमीर खुसरोच्या काही ओळी आठवतात, ते म्हणतात.
  “आज रंग है री महा रंग है
  मेरे महबूब के घर रंग है री,
मोहे पीर पायो निजामुद्दीन औलिया
जहाँ देखूं मोरे संग है री.”
   हजरत अमीर खुसरोंनी आपल्या लेखणीतून हिंदुस्तानी संस्कृतीचा रंग ओ गुलाल मनापासून उडवला. त्यांनी रंगालाच महा रंग म्हटलं.आणि हाच रंग कबीरापर्यंत पोहचला.कबीर म्हणतात.
  “गगन मंडल बिच होरी मची है,
   कोई गुरु गम तें लखि पाई,
असं लिहता लिहता कबीर स्वतःच एक उत्सव होवून गेले. जेव्हा त्याच्यावर हा बेखुदीचा रंग चढतो तर तो सामान्य माणसावर का नाही चढणाऱ्या रंगाचा हा प्रवास अनोखा आहे.एकदा चढला की तो उतरत नाही.रंगाबरोबर आपला प्रवास सुरु होतो. रंग माणसांच्या मनात काहीतरी जागं करतात,माणसाला जिवंत ठेवतात. रंगांचा हा प्रवास जितका बाहेरून दिसतो तितकाच तो आतूनसुद्धा होत असतो.आपल्या आतल्या रंगाचा प्रवास थांबू न देण्याचे कष्ट मात्र आपले आपल्याला घ्यावे लागतात.होळीचा हा ही एक अर्थ असू शकतो.सगळे रंग हे रंग आहेत,त्यांना आपण परिस्थितीनुसार अर्थ लावत असतो.म्हणूनच आपल्याला वर माणुसकीचा पक्का रंग चढवायला हवा,म्हणजे तो कधीच उतरणार नाही.

Web Title: Happy Holi: -The story of colors in life which gave a human color to us.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.