देशभरात सण उत्सवांना सुरूवात झाली आहे. सगळीकडे हरितालिका आणि गणेशोत्सवाची तयारी केली जात आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला हे व्रत करतात. शिव पार्वतीची उपासना करण्यासाठी हा दिवस शुभ असल्याचं मानलं जातं. महिला या दिवशी उपवास करून देवाची पूजा करतात. हिंदू मान्यतांनुसर माता पार्वतीची पूजा करत असलेल्या महिलांच्या पतीला दीर्घायुष्य मिळते.
हरितालिका हे व्रत कुमारिका, सवाष्णींच्या बरोबरच विधवा स्त्रियाही करतात. हे या व्रताचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कुमारिकांना मनासारखा पती मिळावा म्हणून त्या हे व्रत करतात. सवाष्ण स्त्रिया मिळालेला जोडीदार जन्मोजन्मी मिळावा व त्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे व्रत करतात. तर विधवा स्त्रिया शिव शंकराची आराधना म्हणून हरितालिकेचे व्रत करतात. या व्रताचेही काही खास नियम आहेत. हरितालिकेच्या दिवशी उपवास केल्यास हे नियम पाळायलाच हवेत. विशेषतः या दिवशी महिलांनी काही चूका करणं टाळायला हवं.
मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष ठेवू नका
धर्म तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की कोणताही उपवास तेव्हाच पूर्ण मानला जाऊ शकतो जेव्हा तुम्ही ते पूर्ण मनाने आणि भक्तीने स्वच्छ मनाने करता. मनात एखाद्याबद्दल द्वेष किंवा तिरस्काराची भावना असेल तर उपवास मोडतो. या दिवशी कुणाबद्दल चुकीच्या भावना आणू नयेत. मन शुद्ध आणि सात्विक ठेवून उपवासाच्या दिवशी देवाला प्रार्थना करावी.
कोणाचाही अनादर करू नका
उपवासाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीचा अनादर होऊ नये. मान्यतांनुसार देव प्रत्येकाच्या हृदयात राहतो, याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीचा अनादर करून तुम्ही थेट देवाचा अनादर करता. यादिवशी घरातील ज्येष्ठांची सेवा करा, त्यांना आनंदी ठेवा. असे केल्याने उपवास यशस्वी होतो. उपवासाचे फळ कोणालाही दुखावल्याने मिळत नाही.
मन विचलित होऊ देऊ नका
उपवासाचा एक अर्थ म्हणजे स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून स्वतःला ईश्वराला शरण जाणे. ज्या स्त्रिया हरितालिका तीजचे व्रत पाळतात, त्यांनी आपल्या रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे. प्रत्येकाने भेटून प्रेमाने बोलावे. दिवसाचा जास्तीत जास्त वेळ देवाच्या उपासनेत घालवावा. असे केल्याने तुम्हाला उपवासाचे पूर्ण फायदे मिळू शकतात.