Tips to sharp memory : बरेच लोक आजकाल स्मरणशक्ती कमजोर झाल्यानं वैतागलेले असतात. कारण अनेक महत्वाच्या गोष्टी वेळेवर आठवत नसल्यानं वेगवेगळ्या समस्या होतात. अनेकदा मोठं नुकसानही सहन करावं लागतं. तुम्ही सुद्धा अशा लोकांपैकी असाल तर जास्त चिंता करण्याची गरज नाही. कारण काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही स्मरणशक्ती मजबूत करू शकता. हार्वर्ड युनिव्हर्सिटीनं नुकत्याच काही टिप्स शेअर केल्या आहेत. ज्या फॉलो करून तुम्ही कमजोर झालेली स्मरणशक्ती मजबूत करू शकता. यात शारीरिक आणि मानसिक दोन्ही मुद्द्यांचा समावेश आहे. जे मेंदुचं कार्य आणखी चांगलं करण्यासाठी मदत करतात. चला जाणून घेऊ कोणत्या आहेत या टिप्स.
स्मरणशक्ती कशी वाढवाल?
१) हार्वड युनिव्हर्सिटीनुसार, जर तुम्ही नवनवीन गोष्टी शिकाल तर यानं तुमची स्मरणशक्ती वाढते. उदाहरणार्थ तुम्ही जर पेंटिंग शिकत असाल, नवीन भाषा शिकत असाल, कोडं सोडवत असाल अशा अनेक गोष्टींच्या मदतीनं तुम्ही स्मरणशक्ती वाढवू शकता.
२) सुगंधानेही स्मरणशक्ती मजबूत होते. रोज नवनवीन सुगंध घेऊन कमजोर झालेली स्मरणशक्ती वाढवू शकता. एखादं नवीन परफ्यूम, अत्तर किंवा फुलाचा सुगंध घेऊन मन फ्रेश करू शकता आणि याने स्मरणशक्तीही वाढते.
३) स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला आपले विचार सकारात्मक ठेवणं फार गरजेचं असतं. रिसर्चनुसार, जे लोक सकारात्मक विचार ठेवतात, त्याची गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता अधिक असते. यामुळे डोकं शांत राहतं आणि मेंदु गोष्टी चांगल्या प्रकारे स्टोर होतात.
४) ज्या गोष्टी तुम्ही विसरता त्या पुन्हा पुन्हा केल्यानंही मेंदू शार्प होऊ शकतो. गोष्टी रिपीट करण्याची ही पद्धत गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरते.
५) त्याशिवाय रोज तुम्ही तुमच्या दिनचर्येबाबत काहीना काही लिहा. रोजचं प्लॅनिंग एका नोटबुकमध्ये लिहून काढा. यानेही तुमची स्मरणशक्ती वाढू शकते. सोबतच असं केल्यानं तुमचं टाइम मॅनेजमेंटही चांगलं होईल.