Lokmat Sakhi >Mental Health > इएमआय भरभरुन जे घर घेतो, त्या घरातली दुपार कशी असते हे कधीतरी पाहिलं-अनुभवलं आहे?

इएमआय भरभरुन जे घर घेतो, त्या घरातली दुपार कशी असते हे कधीतरी पाहिलं-अनुभवलं आहे?

दुपार. रोजच होते दुपार. पण आपण कधीतरी दुपारचं जग अनुभवलं आहे का? बाहेरचं जाऊ द्या, निदान आपल्या घरातली दुपार तरी? -प्रभात पुष्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 04:46 PM2022-09-16T16:46:09+5:302022-09-16T16:50:07+5:30

दुपार. रोजच होते दुपार. पण आपण कधीतरी दुपारचं जग अनुभवलं आहे का? बाहेरचं जाऊ द्या, निदान आपल्या घरातली दुपार तरी? -प्रभात पुष्प

Have you ever seen-experienced an afternoon in your home? mindfulness, lifestyle with full of life. | इएमआय भरभरुन जे घर घेतो, त्या घरातली दुपार कशी असते हे कधीतरी पाहिलं-अनुभवलं आहे?

इएमआय भरभरुन जे घर घेतो, त्या घरातली दुपार कशी असते हे कधीतरी पाहिलं-अनुभवलं आहे?

Highlightsदुपारी घरात येणारं निवांत ऊन, कुठं तरी वाजणारी खिडकी, आपलंच जरा शांत आळसावून बसलेलं घर? कशी दिसते आपल्या घरातली दुपार?

अश्विनी बर्वे

“दुपार” कसा वाटतो हा शब्द? असं मी बस मधल्या माझ्या शेजारणीला विचारलं , तर तिने (स्वतःच्या ) कपाळावर( स्वतःच ) आठ्या आणल्या आणि माझ्याकडे पाहिले. त्यामुळे मला समजले स्वनिर्मिती (आठ्या )ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्या आतच असते.  तिच्या उस्फुर्त निर्मिती कडे पाहून क्षणभर मला तिचा हेवा सुद्धा वाटला. वाटलं की चित्रकलेच्या वर्गात “दुपार” ची चित्रनिर्मिती करण्याच्या विषय न देता हा सोपा विषय दिला असता तर? पण “आठ्यांचे “चित्र काढणे हे कपाळावर आठ्या आणण्यापेक्षा काहीसे अवघडच आहे. पण तरीही तिच्याजवळ दुपार होती आणि तिने मला तिच्या पद्धतीने दाखवली.
 एरवी ‘दुपार’ या नैसर्गिक घटनेकडे मी शब्द म्हणून पाहत होते. पण त्याचे  चित्र माझ्या दृष्टीने  पाहिले नव्हते. त्यांच्यातले रंग मी बघितले नव्हते. त्यांच्या शाब्दिक रंगाचा खेळ आसपास होता पण त्यातले आकार आणि रंगाचे खोल स्तर तर अनुभवलेच नव्हते. दुपार या शब्दाच्या चित्राला घाबरले होते. आपण उगीच यात पडलो असे वाटायला लागले होते कोणाला विचारावे तर ते ही शक्य नव्हते. पण आशा माझा हात कधी सोडत नाही म्हणून लगेचच मनात विचार आला, आता पडलोच आहोत तर जसे जमेल तसे पूर्ण प्रयत्नांशी करून बघू. एका चित्रासाठी मी माझ्या विचारांचा लंबक नाही पासून हो पर्यंत जोरजोरात फिरवत होते. शेवटी तो हातात धरून मी म्हटले स्वतःशीच “मला हे चित्र काढायचे आहे” असं म्हणतांना मला स्पष्ट जाणीव होती की ,’माझ्या बोटात अजून ती जादू नाही”, चित्र काढायला मी शिकत आहे. चित्र काढण्याचे जेव्हा ठरवले तेव्हा दुपार माझ्या समोर वेगवेगळे रंग घेवून येवू लागली. म्हणजे तिला रंग होते पण मी आज तिच्याकडे अधिक सजगतेने बघत होते.

(Image : google)

दुपारी बस पुलाखालून जात होती, त्यावेळी मला कळलं की यावेळी रस्त्यावर गर्दी नसते आणि पुलाखाली काही माणसं बिनधास्त डुलकी घेत होते. गाड्यांचे आवाज येत होते, अंगावर धूर आणि धूळ दोन्ही उडत होते पण ते गाढ निद्रेत होते. आज आत्ता मला या सगळ्याचे एका विशिष्ट चौकटीतले चित्र दिसत होते. कुठून कसे चित्र पाहायचे, ते आपल्याला कोणत्या चौकटीत बसवायचे आहे आणि ती चौकट आपल्याला झेपणार आहे की नाही हे क्लासमध्ये सांगितले जात असे. ते आताशा जरा कळू लागले होते.
 रस्त्यावर एका घरा शेजारी असणाऱ्या झाडाच्या आडोशाला मुली सागरगोटे खेळत होत्या. वर उडणाऱ्या सागरगोट्यांकडे त्यांचे आशेने बघणे आणि त्याच बरोबर हातात अचूक पकडण्याचे त्यांचे कसब मला मोहवून टाकत होते. मी मनातल्या मनात त्या खेळात भाग घेतला तर सागरगोट्यांबरोबर मी ही वेगळ्याच विचारात गुंतले आणि शेवटी त्या  हाताबाहेर पडल्या. या दुपारीने मला अगदीच शहाणे करून सोडायचे ठरवले की काय? कोणाला कधी आणि कसे शहाणपण येईल हे काही आपल्या हातात नसते.

(Image : google)

रस्त्यावर एक रिक्षा जात होती आणि त्यात रिक्षावाल्याचे पाय दिसत होते. लांबसडक पायाचा तळवा. घोट्यापर्यंत दिसत होते. त्याचा चेहरा मला दिसलाच नाही. अचानक मला अशा लांबसडक अनवाणी पायांची हुसेन साहेबांच्या पायांची आठवण झाली. अशी ही दुपार अनोळखी होती ती ओळखीची झाली.
तुमच्या ओळखीची आहे अशी दुपारी?
इएमआय भरुन आपण जे घर कष्टानं घेतो, त्या घरातली दुपार पाहिली आहे कधी? कसं दिसतं दुपारी घर? दुपारी घरात येणारं निवांत ऊन, कुठं तरी वाजणारी खिडकी, आपलंच जरा शांत आळसावून बसलेलं घर? कशी दिसते आपल्या घरातली दुपार?
बघा, एखाद्या सुटीच्या दिवशी?
अशी निवांत दुपार तरी कुठं आपल्या वाट्याला येते आता?

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

Web Title: Have you ever seen-experienced an afternoon in your home? mindfulness, lifestyle with full of life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.