अश्विनी बर्वेसूर्योदय आणि सूर्यास्त म्हटलं की मला एका लहान मुलीची गोष्ट आठवते.आधी तीच सांगते तुम्हांला.एका लहान मुलीला चित्रं काढण्याचे अतोनात वेड होतं. तिला चित्रं काढण्यासाठी कोणतीही जागा चालत असे किंवा कुठे,कधी,केव्हाही हातात येणाऱ्या कोणत्याही साधनाने ती चित्रं काढत असे आणि स्वतः काढलेल्या त्या रेषांकडं, आकृत्यांकडं मग्न होवून बघत बसे. जर तिची तंद्री कोणी मोडली तर बाईसाहेब मोठ्याने भोकाड पसरत. लहान होती तोपर्यंत सगळ्यांनाच तिचं हे चित्रकार असणं फार आवडत होतं. कारण त्यामुळे त्यांना तिच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत नसत. पण जसजशी ती मोठी होवू लागली, शाळेत जावू लागली तसतशा तिच्याकडून अपेक्षा वाढल्या. तिचं असं तंद्रीत बसणं खटकायला लागलं. विशेषतः तिच्या पालकांना तिच्यात वेडेपणाच्या छटा दिसायला लागल्या. म्हणून त्यांनी तिला कोंडून ठेवलं. तिच्याजवळ कोणतीही अशी वस्तू राहणार नाही,ज्यापासून ती चित्रं काढेल याची त्यांनी नीट काळजी घेतली. मुलीला खूप राग आला. आदळआपट आरडाओरड, किंचाळणे, दारावर धाड धाड आवाज करणे. हे सगळं करून ती थकली. शेवटी नीट वागण्याचा म्हणजे घरातली, शाळेतली सगळी कामं नीट करण्याचा वायदा झाला.( पण चित्र काढणार नाही’ हे मात्र तिने कबूल केले नाही.) तरीही कोणीच दार उघडले नाही. मनात संताप होताच. लहानच होती. चित्र न काढू देण्याच्या अनेक उपायांनी ती सतत ग्रासलेली होती. रागारागाने ती सगळीकडे थुंकली, शु केली आणि त्यातच काहीतरी गिरगटाला लागली, मनातलं अपार दुःख ती अशी व्यक्ती करायला लागली आणि हळूहळू शांत झाली. पहिल्या १-२ तासानंतर आवाज नाही. म्हणून संध्याकाळी पालकांनी दार उघडून पाहिलं तर पोर शांत होऊन पडली होती. तिने तिच्या डोळ्यात कोणतीही ओळख नव्हती. ते घाबरले. आई रडायला लागली. मुलीची सूर्योदयाची, सूर्यास्ताची चित्रं गोळा करून दाखवली पण तिच्या डोळ्यात ओळखच नव्हती. प्रखर प्रतिष्ठेच्या आगीने तिला एवढे तप्त केले की तिच्यातली ती जळून खाक झाली.
(Image : Google)
सूर्योदय आणि सूर्यास्त बघतांना ही गोष्ट मला नेहमी आठवते. त्या पोरीच्या डोळ्यांनी कितीतरी वेळा मी तो पाह्यचा प्रयत्न करते. अद्भुत वाटते. खरंतर आपल्यातल्या खूपजणांना हिलस्टेशनला किंवा एखाद्या पर्यटनस्थळी जावून सूर्यास्त बघण्याची हौस असते. रोज आपल्या गावात होणारा सूर्योदय,सूर्यास्त पाहण्याचे अप्रूप वाटत नाही. मला मात्र त्याचे नेहमीच अप्रूप आहे. आपण जर सूर्योदय आणि सूर्यास्त रोज पाहत असलो तर त्याच्या वेळा ऋतू प्रमाणे बदलत जातात हे लगेच कळते. त्याचे दक्षिणायन, उतरायण कधी सुरु झाले हे लगेच कळते आणि त्यातली गंमत अनुभवता येते. मग कॅलेंडर, पंचांग बघण्याची जरूर भासत नाही. शिवाय सूर्योदयाच्या वेळा शांत असतात. त्यावेळा तुमच्या ओटीत स्वप्नं टाकतात. ती ही त्याच्या तेजसाहित. हा विचारच मला फार आकर्षित करतो. दिवसाची उमेद बाळगावी असा वाटणारा हा विचार असतो. कधी कधी तर सकाळी मी खिडकी उघडून त्याला बघते तेव्हा म्हणतेसुद्धा, अरे बरं झालं तू वेळेत आलास ते. नाहीतर आज तुझ्याकडे मला बघायला वेळ झाला नसता. मग त्याची सोबत घेवून सकाळच्या कामांना छान सुरुवात करते.मला माहित आहे,‘आज’ या दिवसांत तो जेवढा छान आणि सुखावह वाटतो आहे तो पुढे कधीतरी वाटणार नाही. पण म्हणून ‘आज’ ला झाकोळून कसं चालेल.?
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)