Join us  

डोक्यातला कलकलाट बंद करुन रिलॅक्स व्हायचं तर हे 7 उपाय , नो मोअर बर्नआउट! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 3:46 PM

बर्नआउट झाल्याच्या जाणीवेतून बाहेर पडण्यासाठीचे उपाय वैयक्तिक पातळीवरच करता येतात. हे उपाय म्हणजे स्वत:ला, स्वत:च्या मनाला, कामाला शिस्त लावणं ,आनंद मिळवणं आणि स्वत:कडे लक्ष देणं या स्वरुपाचे आहेत. घर आणि ऑफिसचं काम या चक्रात अडकून थकून पिचून गेलेल्या महिलांनी हे उपाय अवश्य करुन पाहावेत.

ठळक मुद्दे कामापासून स्वत:ला काही काळ अलग केलं तरच कामातून आलेला ताण आणि थकवा दूर होवू शकतो.काही तास सलग काम केल्यानंतर 15 मिनिटं कामातून थोडा ब्रेक घ्या. आपली काळजी घेणार्‍या-करणार्‍या माणसांच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवायला हवा, यामुळे मनावरचा ताण हलका होतो.

खूप थकल्यासारखं वाटणं म्हणजेच बर्नआउट होणं ही बाब आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक बाब आहे. शिवाय या अवस्थेत आपण जे काम करतो त्यातली गुणवत्ता लोप पावलेली असते आणि केवळ त्रागा, वैताग , कंटाळा या गोष्टी कामाच्या ठिकाणी घडतात आणि आणखी मनस्ताप देतात. आपण बर्नआउट झालोय हे स्वत: ओळखणं सहज शक्य आहे. बर्नआउटची लक्षणं आपल्यात दिसायला लागली तर हतबल न होता त्याच्याशी दोन हात करणं महत्त्वाचं आहे. बर्नआउट झाल्याच्या जाणीवेतून बाहेर पडण्यासाठीचे उपाय वैयक्तिक पातळीवरच करता येतात. हे उपाय म्हणजे स्वत:ला, स्वत:च्या मनाला, कामाला शिस्त लावणं ,आनंद मिळवणं आणि स्वत:कडे लक्ष देणं या स्वरुपाचे आहेत. घर आणि ऑफिसचं काम या चक्रात अडकून थकून पिचून गेलेल्या महिलांनी हे उपाय अवश्य करुन पाहावेत.

बर्नआउटमधून बाहेर पडण्यासाठी

विलग होणे

 विलग होणे हा बर्नआउटमधून बाहेर पडण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. स्वत:हून स्वत:ला कामापासून विलग केल्याशिवाय स्वत:साठी मिळणं हे केवळ अशक्य आहे. ऑफिसच्या कामासाठी मी चोवीस तास उपलब्ध असते. घरी गेल्यावर फोन, मेसेज ,मेलद्वारे काम करते असं अनेकजणी म्हणतात. पण यामुळे या महिलांना ताणातून बाहेरच पडता येत नाही. आपल्या कामावर नव्यानं लक्ष केंद्रित करण्यासाठी , कामासाठी स्वत:मधे पुन्हा ऊर्जा येण्यासाठी या महिलांना अवकाशच मिळत नाही.आणि त्यातूनच काही काळानं आपण बर्नआउट झाल्याची जाणीव होते. म्हणूनच घरी आल्यानंतर पूर्णवेळ कुटुंबाला, घराला, स्वत:ला देता यायला हवा. घरी आल्यावरही काम करण्याची गरज असेल तर ते काम कधी आणि किती वेळ करावं हे ठरवायला हवं. त्या विशिष्ट वेळेत काम केलं की पुन्हा डोकं कामातून बाहेर काढता यायला हवं. कामापासून स्वत:ला काही काळ अलग केलं तरच कामातून आलेला ताण आणि थकवा दूर होवू शकतो. शनिवार रविवारीही ऑफिसचे मेल, मेसेजेस बघण्याची एक विशिष्ट वेळ ठरवून घ्या आणि त्याला ठरवला तितकाच वेळ द्या. यामुळे सुटीच्या दिवशी रिलॅक्स होता येतं. कामाच्या पातळीवर तडजोड न करताही ताण घालवण्यासाठी , रिलॅक्स होण्यासाठी कामापासून अलग होण्याचे हे छोटे छोटे कप्पे तयार करता यायला हवेत.

 

शरीराकडे लक्ष द्या

आपलं शरीर सतत आपल्याला काहीतरी सांगत असतं. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. डोकं दुखत असेल तर पाणी कमी पिलं गेलं असेल कदाचित असा विचार करतो, पोटात दुखत असेल तर काहीतरी अरबटचरबट खाल्ल्यानं दुखत असेल असा स्वत:चा समज करुन घेतो. मान दुखत असेल तर झोपेत आखडली असेल म्हणून दुर्लक्ष करतो. पण प्रत्येक वेळेस वेदनेची हीच कारणं नसतात. बर्‍याचदा कामातून आलेला ताण, भीती हे या वेदनेमागील कारण असतं. बर्नआउटचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होत असतो. त्यामुळे शरीर काय सांगतंय याकडे धावपळीतून दुर्लक्ष न करता ते लक्षपूर्वक ऐका, त्याचा थोडा थांबून विचार करा. असं केलं तरच वेदनेची मूळ कारण सापडेल. बर्नआउट झालोय हे वेळीच लक्षात येईल आणि त्यावर उपाय करता येतील.

कामाच्या ठिकाणी रिलॅक्सेशन शोधा

काम करताना थोडा वेळ स्वत:ला रिलॅक्स करण्यासाठी काढा. थोडा विरंगुळा शोधा.  सतत काम करुन मेंदू शिणतो. त्यामुळे विशिष्ट कालावधीनंतर आपण काम तर करतो पण मन नसतं. त्यासाठी कामाच्या ठिकाणी अर्धा तास काढा. त्यावेळेत काहीतरी चांगलं वाचा. याचा उपयोग कामातून आवश्यक असलेला ब्रेक मिळतो. पुन्हा ताजतवानं होता येतं. आणि पुढच्या कामातही लक्ष लागतं.

झोपेच्या गोळ्या घेणं टाळा

बर्नआउटचा मोठा परिणाम झोपेवर होतो. पण झोप येत नाही ती का येत नाही याचं कारण न शोधता झोप लागण्याची औषधं घेतली जातात. पण यामुळे मेंदूतील झोपेच्या नैसर्गिक प्रक्रियेत व्यत्यय येतो. झोपेच्या दरम्यान मेंदू महत्त्वाचं काम करत असतो तो घातक विषारी घटक काढून टाकतो, दिवसभराच्या अनुभवांना स्मृतींच्या कप्प्यात टाकत असतो, काही स्मृती पक्क्या करतो तर काही काढून टाकत असतो. झोपेच्या गोळ्यांमुळे या प्रक्रियेत अडथळे येतात. मेंदूच्या प्रक्रियेत काही अडथळे निर्माण झाले तर झोपेच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो. झोप लागत नाही म्हणजे बर्नआउट झालो आहोत हे लक्षात घेऊन त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास सुखाची झोप नक्की लागेल.कामांना शिस्त लावा

रोजच्या कामातून अतिरेकी ताण येत असेल, थकवा येत असेल तर त्यात कामाचा दोष नसतो. दोष असतो तो आपल्या चुकीच्या आणि विस्कळीत नियोजनाचा. कामाला शिस्त लावली, त्यात सुसूत्रता आणली तर कामाचा वेग आणि कामातील अचूकता दोन्ही वाढते. आणि कामाने ताण न येता आनंद मिळतो.

कामातून थोडा ब्रेक घ्या

तासामागून तास जातात आणि आपण कामच करत राहातो, मानसशास्त्रीय दृष्ट्या हे चुकीचं आहे. काही तास सलग काम केल्यानंतर 15 मिनिटं कामातून थोडा ब्रेक घ्या. आपण थकल्यानंतर ब्रेक घेऊ असं म्हणून ब्रेक घेण्याचं टाळलं जातं आणि त्याचा परिणाम कामावरही होतो आणि थकायलाही होतं. हे सलग असंच होत असेल तर काम नकोसं व्हायला लागतं. हे होवू नये म्हणून काही तासांच्या कामानंतर 15 मिनिटांचा ब्रेक स्वत:साठी घ्यावा.

मदत घ्या

 जवळच्या माणसांना दूर ठेवून सतत स्वत:च पळत राहाणं यामुळे मनावर विचित्र ताण येतो. आपली जवळची माणसं आपल्याला मदत करु शकतात, आपला थकवा, आपल्याला आलेला ताण घालवण्यात हातभार लावू शकतात हा विश्वास ठेवायला शिकायला हवं. आपली काळजी घेणार्‍या-करणार्‍या माणसांच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवायला हवा, यामुळे मनावरचा ताण हलका होतो. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांसमवेत थोडा हास्य विनोद करत गप्पा मारल्यानं कामाच्या ठिकाणीही मजा येते.

या सर्व उपायांनी बर्नआउटमधून सहज बाहेर पडता येतं. पण जर यातले उपाय आपल्यासाठी उपयोगी ठरले नाही असं जेव्हा वाटेल तेव्हा आपल्या कामाचा विचार करा. आपण जे काम करतो ते आपल्याला आवडतय ना हे एकदा तपासून पाहा. कारण न आवडणारे काम करत राहिल्यानेही बर्नआउट होतं. तसं असेल तर आपलं काम आणि आपलं आरोग्य यात कशाला प्राधान्य द्यायला हवं हे आपलं आपणच ठरवावं.