अश्विनी बर्वे
डिसेंबर महिना सुरू झाल्यापासूनच आपल्याला नवीन वर्षाची चाहूल लागलेली असते. आपण पुढच्या वर्षी काय करणार याचा विचार करायला लागतो. यावर्षीचा आपला विचार किती पक्का आहे हे स्वतः पेक्षा इतरांवर ठासवत असतो. “बघाच तुम्ही मला पुढच्या वर्षी, मी ही गोष्ट नियमित करणारच..!” अशाही गमज्या मारत असतो. कधी एकदा पुढच्या वर्षात पाय ठेवतो असे आपल्याला झालेले असते. पण त्याचबरोबर आपला एक पाय मात्र मागच्या वर्षात अडकलेला असतो. अगदी ‘जानस’ या रोमन देवतेसारखा. असे म्हणतात की या देवतेला दोन मुख आहेत आणि त्याचे एक तोंड भूतकाळाकडे आहे तर दुसरे भविष्याकडे. पुढे जाताना मागे काय काय घडले याचा मागोवा आणि पुढे काय होणार याची उत्सुकता आपल्याप्रमाणे या देवतेलाही असावी.
खरेतर आपला ‘उद्या’ आजवरच उभा असतो. नीट लक्ष देऊन विचार केला तर आपल्या लक्षात येतं, की आपण रोजच एका दिवसाचा निरोप घेतो आणि उद्याचे स्वागत करतो. रोज काही ना काही कमावतो आणि त्याची पुंजी करून उद्यासाठी, भविष्यासाठी बाजूला ठेवतो. आपण आपल्या ‘आज’मध्ये उद्याचे जगणे जगत असतो. उद्या चांगला पाहिजे, सुखाचा पाहिजे म्हणून झटत असतो. पण म्हणून आजचा आपण कुठे निरोप घेतो? घेऊच शकत नाही, कारण त्याच्याकडे आपले लक्षच नसते, ते कायम असते उद्यावरच.
(Image : Google)
खरेतर गेल्या काही दिवसापासून अनेकांना असे वाटते की, आपल्याला नीट जगताच येत नाही. कारण आपल्याला एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या आहेत.
वर्तमानपत्रात आलेला लेख वाचायचा आहे, त्याचवेळी त्या लेखकाची इत्यंभूत माहितीही हवी आहे म्हणजे नक्की त्याचा दृष्टिकोन मला कळेल. याशिवाय त्याच विषयावर आलेले नवनवीन व्हिडीओ बघायचे आहेत. त्यात आलेले वेगवेगळे विषय तपासून बघायचे आहेत. मग त्यासाठी टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप या यंत्रांचा वापर करायचा. हे सगळे मला एकाचवेळी करायचे आहे आणि हे करताना डोक्यातले विचार आणि हातातला चहाचा कप किंवा जेवणाचा घासही ‘मिस’ करायचा नाही. परत त्या त्या ऋतूतले वैभव मला किती लोभस वाटते आणि त्याबद्दल मी किती संवेदनशील वगैरे आहे, त्याचा मी किती सूक्ष्म विचार करते हे ही जगाला दाखवायचे आहे.
एखादा विचार नीट सखोल माहीत करून घेत बसले तर जग सगळे पुढे निघून जाईल याची भीती वाटून आधीच धाप लागते आहे. मग आरोग्याचा विचार करायला घेतला की, आजच्या काळात स्मार्ट व्हायचे असेल तर हे होणारच अशी पळवाट काढून चेहऱ्यावर एक मोठ्ठ (मठ्ठ) हसू आणून ‘जगाच्या कल्याणा’चा चेहरा घेऊन जगात वावरायला लागते आणि आणखीन आणखीन फसगत होत राहते.
तेव्हा मात्र वाटते ‘जानस’ या देवतेला फक्त दोन तोंड दाखवली जातात. पण, आमच्यासारख्या मानवाचे काय? तो कोणत्या तोंडाने जगाकडे बघतो? कारण मागे बघितले तरी अनेक गोष्टी दिसत राहतील आणि पुढे तर अनंत गोष्टी आहेतच.
(Image : Google)
यात ‘जगणे’ कुठे आहे?
म्हणजे जे आपण करत असतो त्याला जगणे म्हणायचे असेल तर ते नक्की तेच आहे का? माहीत नाही.
निरोपाचे क्षण कोणाला आवडतात? पण तो तर घ्यावाच लागतो. त्याच्याशिवाय नवीन येणाऱ्या क्षणांचे स्वागत कसे करणार? फक्त स्वागत करताना लक्षात ठेवावे लागेल, की मागच्या निरोपावर हा क्षण उभा आहे. ती एक अखंड साखळी आहे. पटकन ती तुटणार नाही, त्यांचे एकमेकांवर अवलंबून असणे नेहमीच राहणार आहे. म्हणून ‘पेरले ते उगवेल बाबा, बेसावधपणे पेरू नको, हातीचा बाण सुटल्यावर मग उद्वेगाने झुरू नको.’ हे लक्षात ठेवावे लागणार!
आपण भराभरा स्क्रीन पुढे ढकलत आहोत तेव्हा कोणत्या बातमीशी, व्हिडिओशी आपण किती काळ थांबलो आहोत याचा हिशेब कोणाला तरी लागतो आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवे. कारण आता तुम्ही बाहेर लोकांना कसे दिसता? काय लिहिता? यापेक्षाही तुम्ही एकटे असताना कुठे रेंगाळत आहात यावरून तुम्ही खरे कसे आहात, हे कळणार आहे. म्हणून आजचा निरोप घेताना आणि उद्याचे स्वागत करताना मागे राहिलेले पुसून टाकणे या डिजिटल युगात शक्य नसले तरी उद्या तरी मी काही गोष्टी करणार नाही हे ठरवायला हवे. कारण आपला खरा चेहरा आता आरपार दिसणार आहे, दिसत आहे, तो लपवून ठेवता येणार नाही. म्हणूनच उद्याकडे, आपल्याकडे येणाऱ्या माहितीकडे ती आली तशी न बघता तिच्या हेतूकडे लक्ष ठेवता यायला हवे आपल्याला. तरच आपण पुढच्या वर्षी थोडे तरी शहाणे होऊ...जगू मनासारखे.
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
ashwinibarve2001@gmail.com