Join us  

हा छंद जीवाला..!- देहभान विसरुन जीव रमेल असा एकही छंद नाही तुम्हाला? मग सुख कुठं शोधणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2021 3:12 PM

तुम्हाला कुठला छंद आहे या प्रश्नाचं काय उत्तर देता तुम्ही? स्क्रीन टाइम बंद आणि मेंदू ऑन ॲक्टिव्ह मोड असं होतंच नसेल तर मग कसला आलाय छंद?

ठळक मुद्देहा छंद जीवाला लावी पिसे.. असं होतंय का तुमचं बघा, स्ट्रेसवर याहून छान औषध नाही.

गौरी पटवर्धन

दिवसाकाठी थोडा वेळ आपल्या छंदासाठी खर्च केला तर आपल्या मनातल टेन्शन कमी होऊ शकत. पण हे छंद कुठले असावेत? तर सगळ्यात पहिलं म्हणजे या छंदात शक्यतो कुठलाही स्क्रीन नको. आपल्या सगळ्यांचाच स्क्रीन टाईम सध्या नको इतका वाढलेला आहे त्यात अजून छंदांची भर नको. म्हणजे यूट्यूब व्हिडीओज बघणं, सिनेमा बघणं, वेबसीरिज बघणं असे छंद नकोत. त्याने स्क्रिनटाईम वाढतो हे तर आहेच, शिवाय एकाच जागी बसून राहिल्याने तात्पुरतं बरं वाटलं, तरी स्क्रीन बंद केल्याबरोबर आपला आधीचा अस्वस्थपणा दामदुपटीने परत येऊ शकतो. त्यामुळे छंद असा पाहिजे ज्यात हाताने काहीतरी काम करावं लागेल. काहीतरी कृती करावी लागेल. या कृतीसाठी संदर्भ म्हणून एखादा व्हिडीओ बघणं ठीक आहे. पण त्या गोष्टींचे व्हिडीओज बघत राहणं या ट्रॅपपासून सावध राहिलं पाहिजे. असे आपल्याला कुठले छंद असू शकतात?

तर अनेक जणींना विणकामाचा छंद असतो.

विणकामाची सुरुवात बहुतेक सगळ्या जणींच्या बाबतीत अगदी भयंकर कंटाळ्याने होते. म्हणजे शाळेत जनरली हस्तकलेच्या तासाला विणकाम शिकवलेलं असतं. ते त्या वेळी आपल्या अगदी डोक्यात गेलेलं असतं. किती तरी वेळ बसलं तर एखादा इंच विणून होतं हे बघितल्यावर जेवढं कंपलसरी आहे त्याच्या पलीकडे आपण त्याला हातच लावायचा नाही हे शाळेत असतांना ठरलेलं असतं. ज्यांच्या शाळेत हे शिकवलेलं नसतं, त्यांना जनरली आई / मावशी / आत्या / आजी / वहिनी / मामी / मावशी अश्या कोणाकडून तरी विणकामाची दीक्षा मिळालेली असते. मग कॉलेजमध्ये गेल्यावर एकमेकींच्या घरी जाऊन बसायचं, गाणी लावायची आणि गप्पा हाणत तसचे तास बसून विणकाम करायचं.बहुतेक वेळेला शाळेत साधं दोन सुयांचं विणकाम शिकवलेलं असतं. त्यातही दोन सुया सुलट दोन सुया उलट च्या चक्रव्यूहातून बऱ्याच जणी बाहेर येत नाहीत. शिवाय दोन सुयांचं विणकाम हळूहळू वाढतं. त्याची सवय झाली आणि लय साधली की मग सुयांकडे न बघता सुद्धा टाके बरोबर यायला लागतात. तेव्हा स्पीड वाढतो, पण ते एकूण चेंगटच काम. शिवाय बाजारात इतके छान स्वेटर्स विकत मिळत असतांना ते आपण दोन उलट दोन सुलट करत कशाला विणत बसायचे असंही वाटतं.पण नंतर केव्हातरी क्रोशाच्या सुईचा शोध लागतो. ते विणकाम दोन सुयांपेक्षा फारच सुसाट होतं हा शोध लागल्यावर तर आयुष्यात क्रांती होते. अट एकच, साखळीच्या नादी लागायचं नाही, सगळं बांधकाम खांब घालून करायचं. एकदा ते जमलं की त्याचे चौकोन, मग गोल, मग फुलं, मग हे एकमेकांना जोडून छोटी पर्स, मग टीव्हीवर टाकायचा रुमाल, मग टॉप, ओळखीतल्या किंवा नात्यातल्या बाळाचे कपडे, मोजे, टोप्या, ब्लॅंकेट...

एक लोकरीचा गुंडा आणि क्रोशाची सुई किंवा दोन सुया म्हणजे थेट मेडिटेशन… हवं तर शांत बसून करावं, गप्पांची मैफिल जमवावी नाही तर गाणी लावावीत. आपल्या हाती हळूहळू आकार घेणारा कपडा बघतांना होणारा आनंद विणकाम करणाऱ्यांनाच समजू शकतो. मधल्या काळात या सुया कुठेतरी अडगळीत गेल्या असतील, प्लॅस्टिकच्या डब्यांना भोकं पाडायला, मुलांच्या नाटकात तलवारी म्हणून कुठे सेवेत रुजू झाल्या असतील, तर त्या शोधून आणा… आणि होऊ द्या सुरु… दोन उलट दोन सुलट!हा छंद जीवाला लावी पिसे..असं होतंय का तुमचं बघा, स्ट्रेसवर याहून छान औषध नाही.