रंगपंचमी म्हणजे रंगांची उधळण आणि मित्रमंडळी, कुटुंबियांबरोबर केलेली धमाल मस्ती (Holi Celebration 2022) . अनेकांसाठी रंगपंचमी (Rangpanchami)ही उत्साहाची किंवा आनंदाची असली तरी काही जण असेही असतात ज्यांना ही रंगपंचमी जवळ आली की छातीत धडकी भरते (Fear of colors), रंगांची उधळण नकोशी वाटते. रंग आपल्या आयुष्यात जान आणतात असे एकीकडे म्हणत असताना रंगांचा किंवा रंगपंचमीचा तिरस्कार करणारेही अनेक जण आपल्या आजुबाजूला असतात का नको वाटते या लोकांना रंग किंवा नुसतं रंगपंचमी असं म्हटलं तरी त्यांना भिती का वाटते याविषयी जाणून घेऊया...
१. याविषयी मानसोपचारतज्ज्ञ मेघा पालकर म्हणाल्या, अनेकदा लहानपणापासून एखाद्या विशिष्ट रंगाची भिती मनात बसलेली असते. यामागे एखादी घटना, त्रास दिलेल्या व्यक्तीने घातलेल्या कपड्याचा रंग यांचा संबंध असतो. लहानपणी मनात ठसलेली एखादी घटना किंवा व्यक्ती हे त्याच्याशी संबंधित असतात त्यामुळे मनात ठसलेली ही भिती मोठेपणी कायम राहते आणि विशिष्ट रंग नको वाटतो.
२. अनेकदा लहानपणी अंधाराची भिती दाखवली जाते. अंधारात भूत येते किंवा भूत काळे असते असे सांगून भिती घातली जाते. त्यावेळी ते योग्य वाटत असले तरी ही गोष्ट दिर्घकाळासाठी मनात ठसली जाते आणि त्याचा मनावर परिणाम होऊन काळ्या रंगाची भिती मनात खोलवर ठसली जाते. त्यामुळे रंगपंचमीमध्ये लावला जाणारा काळा रंग किंवा वेगवेगळे रंग एकत्र झाल्यावर काळा रंग नकोसा वाटतो असेही पालकर म्हणाल्या. त्यामुळे रंगपंचमीच्या वेळी माझी तब्येत बरी नाही किंवा मी घरात नाही अशा सबबी अनेकांकडून रंगपंचमी खेळण्यासाठी दिल्या जातात.
३. आपल्याला लावला जाणारा रंग चेहऱ्यावरुन निघेल की नाही. हा रंग कायम तसाच राहीला तर आपली ओळख पुसली जाईल की काय अशीही भिती अनेकींना वाटते. तसेच आपली त्वचा रंगांमुळे खराब झाली तर काय करायचे, विशेषत: यामुळे आपल्या सौंदर्यात बाधा येणार नाही ना या भितीपोटी रंगपंचमी नको वाटणाऱ्याही अनेक मुली किंवा महिला असतात असे समुपदेशक दिपा राक्षे सांगतात.
४. अनेकदा रंगपंचमीच्या नावाखाली मुलांचा नको तिथे स्पर्श होतो, रंगपंचमीच्या निमित्ताने मुले अंगलट येण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे हा सण नको वाटतो असे म्हणणाऱ्याही अनेक मुली असतात. रंग लावून आलेली व्यक्ती नेमकी कोण आहे हे ओळखणे अवघड होते आणि अशात आपल्यावर अतिप्रसंग होऊ शकतो अशी भिती मुलींच्या मनात असते. ऑफीसमध्ये किंवा इमारतीत, मित्रमंडळींमध्ये अनोळखी व्यक्तींचा स्पर्श नको वाटत असल्याने रंगपंचमीचे सेलिब्रेशनच नको असे म्हणणारा एक मोठा वर्ग आहे असेही दिपा सांगतात.