किती वेगवान आणि गोंधळवणारे दिवस. मूडची पार वाट लागते. चिडचिड अटळ. त्यात आपण काहीच धड करत नाही, मनासारखं काहीच येत नाही असं वाटून अजून अपराधी वाटतं. त्यातून मन बिघडलं की शरीराची घसरण सुरू होते, पण हे टाळण्यासाठी मूडचा मेकओव्हर करायला हवा? आपण मेकओव्हर हा शब्द रंगरुप या अर्थानं वापरतो. पण मूड मेकओव्हर कसा करणार?त्यासाठी हे घ्या. ३० डेज चॅलेंज. डिसेंबर वर्षाच्या अखेरचा महिना आहे. वर्ष संपताना तरी आपण खूप काही केलं असा फिल हवा असेल तर १ ते ३० डिसेंबर फक्त ३० गोष्टी करा. एकदम सोप्या आहेत. रोज एकच करायची. यादी वाचून असं वाटेलही, यात काय नवीन? हे काय अवघड? याने काय होणार?पण करुन पहा.. मूड मेकओव्हरची ही सुरुवात आहे. वन स्टेप ॲट अ टाइम. बघा आहे का तयारी?छोट्या छोट्या, साध्या गोष्टी करून पाहा. न चुकता. आणि मग पाहा काय जादू होते! आपलं शरीर आणि मन आपोआपच छान वागायला लागेल. स्वत:साठी काही करण्यानं दुसऱ्यासाठी करण्यातला उत्साह वाढतो, टिकून राहातो, शिवाय वर्तमानात राहायला मदत होते. महिन्याच्या प्रत्येक दिवशी करायची वेगवेगळी गोष्ट खाली दिली आहे. रोज एकच. यामुळं भार यायचाही प्रश्न नाही. हवं तर जवळच्या मित्रमैत्रिणींशी रोजची गोष्ट बोलताही येईल.
बघा तर करून...
1. खोल श्वासाचा व्यायाम.2. जुन्या मित्र अगर मैत्रिणीशी संपर्क साधणं.3. काहीतरी गंमत ठरवणं व करणं.4. तुम्ही न वापरलेली एखादी वस्तू कुणालातरी देऊन टाका.5. तीस मिनिटं योगा.6. संतुलित व आरोग्यपूर्ण जेवण.7. मोकळेपणानं मदत मागणं.8. आवडीचं संगीत ऐकणं.9. दहा मिनिटं वाचन.10. चालण्यासाठी बाहेर पडणं.11. घरच्याघरी स्पासाठी वीस मिनिटं वेगळी काढणं.12. जुन्या छंदांना उजाळा.13. छानसा सिनेमा बघा.14. नेहमीपेक्षा अर्धा तास आधी झोपायला जा.15. आज पेय म्हणून केवळ व निव्वळ पाणी प्या, दुसरं बाहेरचं काही नको.16. कुठल्यातरी घरगुती बैठ्या, लहानपणी खेळायचो त्या खेळात कुटुंबासह रात्र जागवा!17. छोटंसं ध्येय ठरवा.18. करायच्या कामातल्या यादीमधलं बराच काळ रेंगाळत राहिलेलं एक काम उरकून टाका.19. कुणाचं तरी मोकळेपणाने कौतुक करा.20. मित्रमैत्रिणींसोबत झूमवर गप्पा टाका.21. पाच मिनिटं मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा.22. घरच्यांसोबत एकत्र काहीतरी करा किंवा स्वत:सोबत राहून काही करा.23. घराबाहेर पडा! ऊन खायला किंवा चांदण्या बघायला. आवडेल ते..24. बाहेरून काहीतरी खायला मागवा आणि साथीदारासोबत मस्त सिनेमा बघा.25. सोशल मीडियावरच्या एखाद्या नकारात्मक प्रोफाईलला अनफॉलो करा.26. ‘नाही’ म्हणण्याचा सराव करा.27. आज ‘फोन फ्री नाईट’ असू दे.28. एरवी बघितला नसता असा बिनडोक व्हिडिओ बघा.29. घडलेला एखादा चांगला प्रसंग लिहून काढा.30. एखादी नवी सवय सुरू करा.