Lokmat Sakhi >Mental Health > मला कसं जमेल? लोक काय म्हणतील? मनातली ही भीती कशी पुसून टाकाल, पाहा सोपे उपाय

मला कसं जमेल? लोक काय म्हणतील? मनातली ही भीती कशी पुसून टाकाल, पाहा सोपे उपाय

पुसून मनातली भीती, कशी मिळेल नवी शक्ती? त्यासाठी आपण काय केलं तर आपलं जगणंही बदलेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 04:07 PM2023-10-25T16:07:22+5:302023-10-25T16:23:37+5:30

पुसून मनातली भीती, कशी मिळेल नवी शक्ती? त्यासाठी आपण काय केलं तर आपलं जगणंही बदलेल..

How do you overcome fear of people? how to try new things in life, how to gain confidence | मला कसं जमेल? लोक काय म्हणतील? मनातली ही भीती कशी पुसून टाकाल, पाहा सोपे उपाय

मला कसं जमेल? लोक काय म्हणतील? मनातली ही भीती कशी पुसून टाकाल, पाहा सोपे उपाय

Highlightsसमाजाच्या भीतीची, लोक काय म्हणतील या भावनेची अनेक पुटं मनावर लहानपणापासून चढवलेली असतात.

स्मिता पाटील
ती. छोट्या शहरातून मोठ्या शहरात आली. अपार्टमेंटच्या खाली येऊन उभी राहिली की तिला सगळे रस्ते सारखेच दिसायचे. माणसं आणि वाहनांच्या गर्दीने वाहते रस्ते बघून भीती वाटायची. या गर्दीत आपला कसा निभाव लागणार, या भल्या मोठ्या शहरातले रस्ते आपल्याला कधी समजणार आहेत की नाही, आपण या शहरात रुजू ना? असं काहीबाही मनात यायचं. मग एके दिवशी हिय्या केला आणि ती बाहेर पडली. पाण्याची बाटली, खाऊचा डबा आणि एक पुस्तक घेऊन चालत निघाली. रोज वेगवेगळ्या रस्त्यांवर, वेगवेगळ्या ठिकाणी. भूक लागली की एखादे हॉटेल बघून पुस्तक वाचत खायचं की परत चालत निघायचं. एकटीनं सिनेमा बघायचा, वेगवेगळे कार्यक्रम बघायचे, कधी एखाद्या मंदिरात ध्यान करायचं. छोट्या शहरात कामाशिवाय इतकं मोकळेपणानं कधी वावरता आलं नव्हतं. तिथल्या मैत्रिणींना हे सांगितलं की कुणी हसायचं, कुणी कौतुक करायचं तर कुणी नावंपण ठेवायचं. पण, एकटीने हिंडताना सापडलेल्या आनंदाच्या ठेव्यापुढे हे सगळं गौण होतं तिच्या दृष्टीनं. एक निराळाच आत्मविश्वास आला होता तिच्या व्यक्तिमत्त्वात.


(Imagge :google)

नवरा विमानाने जाणार म्हटलं की ती घाबरायची. ते विमान कोसळणार अशी भीती तिला वाटायची. हा विमान फोबिया आपल्या आयुष्यातून बाद करायचा असं तिनं ठरवलं. आणि एकटीनं विमान प्रवास करायचा घाट घातला. तिकीट काढण्यापासून ते परतीच्या प्रवासापर्यंत एकटीनं केलेल्या सगळ्या प्रवासामुळं आपल्या मनातल्या भीतीवर तिला मात करता आली. आता विमान फोबिया नावालापण उरला नाही. आता नवराच चिडवतो तिला आणि ती गालातल्या गालात हसते.
** **
“छ्या, मला नाही जमणार हे स्टेजवर जाऊन सगळ्यांसमोर बोलणं वगैरे. हातपाय लटलट कापतात माझे, घशाला कोरड पडते. असं आयुष्यात कधीच करणार नाही मी, तू मला उगाच भरीस घालू नको,” असं मैत्रिणीला कळवळून सांगणारी ती. “या वेळेला मी तुझं काही ऐकणार नाही. सतत मागे मागे राहतेस. असं काय ग करतेस? तू स्टेजवर जाऊन बोलायचं आहेच. ही माझ्या ५० व्या वाढदिवसाची भेट तू मला द्यायचीच आहे,” असं म्हणणारी तिची जवळची सखी. तिचं मन मोडायचं नाही म्हणून अखेर तिच्या वाढदिवसादिवशी आयोजित केलेल्या समारंभात ती स्टेजवर जाऊन बोलली. उपस्थित सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिच्या बोलण्याला दाद दिली. तिचं तिलाच उमगलं, अरे आपण छान बोलतो की.. आणि सगळ्यांसमोर बोलूही शकतो. इतके दिवस आपण हे करू शकलो नाही याची खंत वाटली तिला. पण, ठीक आहे. आता याच्यापुढे आपण असं घाबरायचं नाही. वेगवेगळ्या निमित्तानं सगळ्यांसमोर जाऊन बोलायचं हे उमगलं तिला.
** **
एकटीनं सायकलवर प्रवास करायचा असं तिच्या मनात आलं. तिनं तिच्या मनातली ही कल्पना घरात बोलून दाखवली. झालं.. मुलांनी चेष्टा केली. नवऱ्यानं भीती दाखवली. सासू म्हणाली, ‘या वयात काय सुचतं तुला हे असलं? नसतं धाडस करायचं कशाला?’ सगळ्यांच्या प्रतिक्रियांनी तिचं मन खट्टू झालं. पण, तिच्या मैत्रिणींच्या ग्रुपने मात्र तिला खूप प्रोत्साहन दिलं. ‘तू जाऊ शकतेस ग. नक्की जा,’ असं सांगितलं. रोज थोडा थोडा सराव करीत तिनं एकटीनं सायकलवर पन्नास किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. जाताना मनात खूप धाकधूक होती; पण, परतीच्या प्रवासात एका वेगळ्या आनंदानं तिचं मन भरून गेलं होतं.

 

(Image : google)

ओळखीच्या वाटल्या ना वरच्या गोष्टीतल्या सगळ्या जणी? अशा कितीतरी बाया आपल्या अवतीभवती असतात. मला बाई कसं जमेल म्हणून बिचकणाऱ्या, मागे राहणाऱ्या, स्वत:लाच कमी लेखणाऱ्या! आणि काही त्यातल्याच ज्यांनी ती भीती ओलांडून, कोण काय म्हणेल हे बाजूला ठेवून आपल्यातल्याच भीतीवर, कमतरतेवर मात केली. त्यांनी समाजाच्या भीतीवर मात केली आणि स्वतःच्या आनंदासाठी नव्या वाटा धुंडाळल्या. त्या वाटांवर चालून बघितलं.
स्वतःच स्वतःभोवती घातलेली धास्ती, भीती, न्यूनगंडाची सीमा ओलांडण्याची शक्ती खरंतर आपल्या सगळ्यांमध्ये असते.
नवरात्राच्या निमित्ताने आपल्यातल्या या शक्तीरूपाला आपण जागवू! आपल्याला हवं ते करून बघू! मग, एकटीने जाऊन खाणं असो, सिनेमा बघणं असो, एकटीनं प्रवास करणं असो, की घरातली कामं बाजूला ठेवून पुस्तक वाचत बसणं असो. इतकी वर्षे सगळ्या धबडग्यात बाजूला ठेवलेला एखादा छंद जोपासणं असो. आपल्याला हवं तसं हवं तेव्हा जगता येणं हे खरंच खूप अवघड असतं का? कदाचित नसेलही ते तितकेसे अवघड. आपण प्रयत्न तर करून बघू. सतत दुसऱ्यांसाठी जगणाऱ्या मनाला आपण स्वतःसाठी कधीतरी जगायला शिकवू.
आपल्यात असतेच दुर्गेची शक्ती. आपण ती वापरत नाही. समाजाच्या भीतीची, लोक काय म्हणतील या भावनेची अनेक पुटं मनावर लहानपणापासून चढवलेली असतात. ही आवरणं बाजूला करून आपल्या आतल्या ‘ती’ ला आपण भेटतच नाही. कधीकधी हळूच आपल्या आतली ‘ती’ आपल्याला खुणवायला लागते. पण, आपण दुर्लक्ष करतो. तसं न करता यंदाच्या नवरात्रात आपण आपल्याचभोवती घातलेली कुंपणं पार करू.. आपण आपल्याला ओलांडू आणि पुढे जाऊ.. करू या का प्रयत्न या सीमोल्लंघनाचा!

(लेखिका मुक्त पत्रकार आणि पालकत्व विषयात काम करणाऱ्या स्वनिल फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत.)
smita.patilv@gmail.com

Web Title: How do you overcome fear of people? how to try new things in life, how to gain confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.