Join us  

कितीही काम करा, तरीही घर आणि ऑफिस दोन्हीकडे आपण कमीच पडतो, असं वाटतं तुम्हाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 5:05 PM

सगळी कामं मीच करणार, परफेक्टच हवं सगळं, मी कुठंच कमी पडणार नाही, वर्क लाइफ आणि घर दोन्ही बेस्टच करणार, हा हट्ट सोडा, गिल्टही मनातून काढून टाका. 

ठळक मुद्देथोडीही मानसिक अनारोग्याची चाहूल लागली तर त्वरीत मानसोपचारतज्ज्ञांशी संपर्क साधा. कारण मन आनंदी तरच शरीर निरोगी आणि तरच आयुष्य रंगीबिरंगी आणि आनंदी.

डॉ. ज्योती उगले

जॉब आणि घर दोन्ही सांभाळावंच लागतं. अनेकींना कामासाठी ८-१० तास घराबाहे रहावं लागतं. कधी कधी नाईट शिफ्ट मध्ये काम करावे लागते. अशावेळी घर आणि जॉब सांभाळताना तिला तारेवरची कसरत करावी लागते. या दोघांमध्ये समतोल राखण्याचा सतत प्रयत्न करत असते. मुलांचं संगोपन, घरातल्या आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या अशी तिहेरी जबाबदारी असते. आणि तीनही गोष्टी आपण समान कार्यक्षमतेने करायला हव्यात असं वाटतं. कुटुंबाकडून ही तशी अपेक्षा असते. मुलं अभ्यासात मागे पडली तरी स्त्रीला ऐकवले जाते की तुझं सगळं लक्ष करिअरवर आहे. मुलांकडेही थोडाफार लक्ष देत जा. त्यात स्पेशल चाईल्ड असेल तर त्या स्त्रीची फार तारांबळ उडते. कुठलीही एखादी बाजू कमी पडली की मग तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते आणि मग त्यातून नैराश्य येऊ शकते. याचा वाईट परिणाम पालकत्वावर होतो, मुलांवरही होतो. नोकरी करणाऱ्या बायकांच्या मनातही काही गिल्ट घर करुन राहतात.

(छायाचित्र -गुगल)

त्यात "सुपर वुमन” नावाचा सिंड्रोमही बघायला मिळतो. मीडियामध्ये स्रीची जी प्रतिमा दाखवली जाते त्याप्रमाणे अनेकजणी वागू पाहतात. सर्व कामे मीच केली पाहिजे आणि ती ही अगदी परफेक्ट. त्यातून अनेकजणी स्वत:वर कामं ओढावून घेतात. त्या स्वतःच्या पर्सनल वेळेचा (म्हणजे आरामाची वेळ, रिलॅक्स होण्याची वेळ, छंदांची वेळ) कामासाठी बळी देतात. कामांच्या ओझयाखाली दबून गेल्यामुळे त्यांना डोकं वर करुन श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही त्यामुळे एकंदरीतच त्यांचा ताण- तणाव वाढून जातो. त्यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल नावाचा हार्मोनची पातळी वाढते. स्त्रीची प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे तिचं शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात येते. त्यातून तिला नैराश्य अतिचिंताया सारखे मानसिक आजार होऊ शकतात.नैराश्य हे स्त्रियांना बऱ्याच वेळा परिस्थितीजन्य कारणांमुळे होते, तसेच काही बायालॉजिकल (जैविक ) कारणांमुळे ही होऊ शकते.महिलांना आयुष्यातील काही विशिष्ट टप्यांवर नैराश्य होण्याची शक्यता जास्त असते. ते म्हणजे पाळी येण्यापूर्वीचा काळ, प्रसूतीनंतरचा काळ, आणि रजोनिवृत्ती (म्हणजे पाळी बंद होण्याचा काळ) नैराश्याच्या कॉमन लक्षणाव्यतिरिक्त डोकेदुखी,अंगदुखी ही लक्षणेही महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. हे सारं आढळलं तर मानसिक आरोग्य तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या.

(छायाचित्र -गुगल)

मात्र त्यापूर्वी वर्कलाइफ आणि घर यांचा बॅलन्स सांभाळतांना ताण-तणाव नियोजनासाठी काय करावं? तर हे करुन पहा..

१. ताण-तणाव हा आपल्या जगण्यातील आनंद हिरावून घेतो.  त्यांच्या मुळाशी असतात अवास्तव अपेक्षा ज्या आपण स्वतःकडून करतो व इतर लोक आपल्याकडून करतात. आणि त्या पूर्ण करण्याचा आपण अतिरेकी हट्ट धरून बसतो हा हट्ट आपण सोडला पाहिजे. म्हणून ‘नाही’ म्हणायला शिका. सकारात्मकतेने सांगा की मला हे जमणार नाही.२. सुपर वूमन बनण्याचा प्रयत्न करू नका. एक नॉर्मल स्त्री म्हणून आयुष्य जगा, प्रत्येक ठिकाणी आपण १००% देऊ शकत नाही.३. कुठे कमी पडलात तर स्वतःला माफ करायला शिका. स्वतःशी कठोर वागू नका.४. आपली ताकद आणि कमजोरी समजून घ्या. आपल्या त्रुटी स्वीकारा. प्रत्येकाने आपलं कौतुक केलं पाहिजे हे मनातून काढून टाका. कारण त्रुटी सर्वांमध्येच असतात, कुणीही परफेक्ट नसतं. ५. बाह्य सौंदर्याच्या पलीकडे जाऊन विचार करा आपल्या व्यक्तिमत्त्वातील इतर गुण खुलवण्याचा प्रयत्न करा.६. प्रत्येक स्त्री ही वेगळी असते तिने इतरांशी तुलना करू नये. कारण त्यात आपल्या कुटुंबाचा नुकसान होण्याची शक्यता असते.७.  घरातील कामे इतरांनाही वाटून द्या, कामाची विभागणी करा जेणेकरून एकट्या स्त्री चा तणाव वाढणार नाही.८. आपली जी "टू डू लिस्ट” (कामाची लिस्ट) असते त्यामध्ये स्वतःला अगदी शेवटी न ठेवता वरती स्थान द्या. स्वतः साठी वेळ काढा. छंद जोपासा ..व्यायाम, ध्यानधारणा करा.८. मनमोकळा संवाद साधा (मैत्रीणींशी, नवऱ्याशी, आई बहिणीसोबत ) तो तुमच्यासाठी ऑक्सिजनचं काम करेल.९. थोडीही मानसिक अनारोग्याची चाहूल लागली तर त्वरीत मानसोपचारतज्ज्ञांशी संपर्क साधा. कारण मन आनंदी तरच शरीर निरोगी आणि तरच आयुष्य रंगीबिरंगी आणि आनंदी.

(लेखिका मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)(लेखन सौजन्य : आयपीएच -माइण्ड लॅबच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मानसिक जनजागृती उपक्रम)

टॅग्स :मानसिक आरोग्य