-प्राची पाठक
अमुक झालं की मी आनंदी होईन, तमुक मिळालं की मी मनासारखं जगेन, ढमुक पार पडलं की मोकळा श्वास घेईन अशा अमुक-तमुक-ढमुकच्या खुंटीला आपला आनंद लटकवून ठेवणे, हे अनेक स्त्रियांच्या बाबत अगदी सहज घडते.बाईचा जन्मच असा, आपल्यालाच तडजोड करावी लागते, मन मारावं लागतं इथपासून स्त्री पुरुष समतेवर मनासारखं जगताच न येण्याचं खापर फोडता येईल. घरातल्या परिस्थितीच्या नावाने एक बाण मारता येईल. अमकीला कसे सगळे आयते, सहजच मिळाले, मला ना असे काही मिळालेच नाही, असा नशिबाला दोष देऊन टाकता येईल.कारणं अशी अनेक सांगता येतील, मुख्य मुद्दा हा आहे की, ती आपल्याला सांगायचीच आहेत की, आणि काहीतरी निमित्त काढून आपला आनंद कोणकोणत्या खुंट्यांवर टांगून ठेवायचा आहे. म्हणजे मग स्वतः स्वतःला आनंदी करायची जबाबदारी संपली. "याने माझ्याशी असे केले, म्हणून माझे तसे झाले’, या पटरीवर रेल गाडी पॅसेंजरच्या वेगाने हळूहळू चालू! तिची सुपरफास्ट एक्स्प्रेस कधीच होत नाही. विमान दूरच राहिले. मग आपणच स्वत:ला सांगू लागतो की, अमूक माझ्या आयुष्यात आला की मी आनंदी, आजूबाजूचे माझ्या मनासारखे वागले की मी आनंदी.म्हणजे याचा अर्थ असा की तुमचा आनंद कायम दुसऱ्याच कुणाच्या पार्किंग लॉटमध्ये. आपले आनंदाचे झाड आपणच कधी होणार? आपल्यातच तो आनंद कधी शोधणार?
(छायाचित्र सौजन्य -गुगल)
अमुक झाले की मी आनंदी होईन, ह्या प्रकारात तुम्ही वरच्या पायरीवर चढलात तर वेगळे जग दिसते. तिथे पुन्हा वेगळे अमुक- तमुक गणित सुरु होते. ती साखळी कधी संपतच नाही. म्हणूनच प्रत्येक पायरीवर रडत बसायचे की एकेक पायरीवरून मस्त नजारा अनुभवायचा, हे आपल्याच हातात असते. आपल्याला आनंद मिळण्यात मुख्य अडसर आपणच तर असतो! सगळे अमुक, तमुक ढमुक केवळ निमित्तमात्र असतात.जगातले सगळे रडके, निगेटिव्ह मुद्दे कुणाच्याबाबत कितीही खरे असले, तरी त्यातल्यात्यात एखादी बारीकशी फट शोधून आनंद मिळविणे, हसरे-प्रसन्न राहणे इतके काही अवघड नसते. सदोदित सुखी जगात कुणीच नसते. काळोखात उजेडाची एखादी तिरीप सुद्धा प्रकाशाकडे न्यायला पुरेशी असते. तुकड्या तुकड्यातला आनंद जोडून मनमुराद जगायचा कॅनव्हास घडू शकतो. त्यासाठी स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकले पाहिजे. छोटे- मोठे निर्णय स्वतः घ्यायची सवय लावली पाहिजे. आरोग्यभान जपले पाहिजे. केवळ वरचेवर नटून शरीर साथ देणार नाही. आतूनच सर्व्हिसिंग छान असेल, तर नट्टा पट्टा जास्त खुलून दिसेल. "मला हे जमणारच नाही" आणि "ही काय बायांची कामे आहेत?" यातून बाहेर आले पाहिजे. मनातली धुसपूस नंतर बराच काळ तेवत ठेवण्यापेक्षा सुरवातीपासून सक्रिय सहभाग घेता आला पाहिजे. त्यासाठी थोडे चौकस व्हावे लागते. जेंडर रोल्स पलिकडे जाऊन आजूबाजूचे भान कमवावे लागते. "सुंदर मी होणार" चा जसा ध्यास लागतो, तसा "निर्णय मी घेणार" चा ध्यास लागला पाहिजे. तुमचा आत्मविश्वास आणि तुम्ही मांडलेले रास्त मुद्दे पाहून तुम्हांला ऐकून घेणारे हळूहळू वाढू लागतील. स्वतःची स्पेस तयार होईल. आपण काय आहोत, ते नेमके कळू लागेल. नवनवीन गोष्टी शिकणे, एकटीने छोटे-मोठे प्रवास करणे, लहान सहान आव्हानांना धीराने तोंड देणे, संवाद कौशल्य वाढविणे, मुद्देसूद बोलता येणे हे जमेल की हळू हळू. घट्ट पाय रोवून उभे राहायचे आणि भिडायचे आपल्या प्रश्नांना. निर्णय चुकले, तर ते आपल्या स्वतःच्या विचाराने, समजुतीने चुकले आणि त्या विचारांना ट्रॅक वर ठेवायची जबाबदारी देखील आपलीच आहे, हे समजणे हीच तर खरी कला आहे. "पडो झडो, आत्मविश्वास वाढो" अशीच ही गंमत आहे. ती प्रक्रिया देखील मस्त एन्जॉय करता येते. आणि मग आपला आनंद दुसऱ्याच्या पार्किंगमध्ये नाही नेवून ठेवावा लागत, तो आपला आपल्याला जगता येतो.
(लेखिका मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)