मानसी चांदोरकर
आपण प्रत्येकच जण आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक सकारात्मक अर्थात 'पॉझिटिव्ह' आणि नकारात्मक अर्थात 'निगेटिव्ह' अशा अनेक भावना आणि त्यांचा छटा अनुभवत असतो. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यावर वातावरणात एकप्रकारचे उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण होते. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहेच पण हाच गणपती आपल्याला शांत राहण्याचाही संदेश देतो. मात्र आपण जास्तीत जास्त आवाज करुन आपल्या मनातली आणि आजुबाजूची शांतताही भंग करतो. आपण जेव्हा मनःशांतीचा विचार करतो तेव्हा सकारात्मक भावना मनःशांतीसाठी अत्यंत उपयुक्त व प्रभावी असतात. परंतु नकारात्मक भावना या मनशांती ढासळण्यास कारणीभूत ठरतात (How to avoid negativity, Anger and get mental peace).
सध्याच्या काळामध्ये प्रत्येकच वयोगटात प्रामुख्याने आढळून येणारी नकारात्मक भावना म्हणजे 'राग'. लहान मुले असोत, वयात येणारी मुले असोत, किंवा तरुण असो, प्रत्येकामध्येच एक प्रकारचा टोकाचा राग पाहायला मिळतो. हा वाढता राग ही सध्याची मोठी मानसिक समस्या बनत चालली आहे. या रागावर नियंत्रण मिळवणे प्रत्येकच वयोगटातील व्यक्तींना अवघड जात असल्याचे अनेक मानसशास्त्रीय संशोधनातून निदर्शनास आले आहे. आणि हाच राग ढासळत्या मनस्थितीला कारणीभूत ठरत आहे. आपली मनस्थिती चांगली ठेवायची असेल, मन:शांतीचा अनुभव घ्यायचा असेल, तर आपल्या रागावर नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी काही गोष्टी अवश्य करायला हव्यात.
1) सर्वप्रथम आपल्याला नक्की राग कशामुळे येतो हे शोधणे गरजेचे आहे.
2) त्यानंतरची अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे राग आल्यानंतर तो त्वरित व्यक्त न करता शांत राहून संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
3) ज्या परिस्थितीचा किंवा घटनेचा किंवा व्यक्तीचा आपल्याला राग आला आहे त्यामागील कारणे, आपले विचार, यांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे.
4) एकदा हे कारण सापडले की मग ती समस्या शांतपणे बोलून कशी सोडवता येईल याचा विचार करणे ही पुढची पायरी आहे.
जेव्हा आपल्या मनात राग भरलेला असतो तेव्हा या तीव्र नकारात्मक भावनेमुळे आपल्याकडून चुकीची कृती घडण्याची शक्यता असते. त्यामुळे राग आल्यानंतर लगेच प्रतिक्रिया न देणे ही अत्यंत महत्त्वाची पायरी प्रत्येकाने पाळायलाच हवी. एकदा या रागावर नियंत्रण मिळवता आले की मनःशांती आपोआपच मिळेल. हा राग स्वतः नियंत्रित करता येत नसेल तर समुपदेशकांची मदत घेणे महत्त्वाचे आहे.
(लेखिका समुपदेशक आहेत)
संपर्क - 8888304759
इमेल आयडी - Cmanasib01@gmail.com