Lokmat Sakhi >Mental Health > आपल्या आनंदाची जबाबदारी सतत दुसऱ्याच्या खांद्यावर काय म्हणून ठेवायची? आपण स्वत:साठी काय करणार?

आपल्या आनंदाची जबाबदारी सतत दुसऱ्याच्या खांद्यावर काय म्हणून ठेवायची? आपण स्वत:साठी काय करणार?

आज - आत्ता आनंदात जगणं आपल्याला का जमत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2024 06:05 PM2024-01-02T18:05:26+5:302024-01-02T18:13:34+5:30

आज - आत्ता आनंदात जगणं आपल्याला का जमत नाही?

how to be a happy, how to lead a happy and fruitful life, who is responsible for our happiness? | आपल्या आनंदाची जबाबदारी सतत दुसऱ्याच्या खांद्यावर काय म्हणून ठेवायची? आपण स्वत:साठी काय करणार?

आपल्या आनंदाची जबाबदारी सतत दुसऱ्याच्या खांद्यावर काय म्हणून ठेवायची? आपण स्वत:साठी काय करणार?

Highlightsआपला आनंद कोणकोणत्या खुंट्यांवर लटकवला जाईल. म्हणजे मग स्वतः स्वतःला आनंदी करायची जबाबदारी संपली.

प्राची पाठक

मला ते करायचं होतं, पण राहूनच गेलं... हे कौतुकाने बोलणं वेगळं आणि खंत म्हणून बोलणं वेगळं. आपण किती दिवस आतल्याआत स्वतःच्या आनंदासाठी झुरत राहणार? आज करू - उद्या करू, असं म्हणत राहणार, हा खरा मुद्दा आहे. अमुक झालं की, मी आनंदी होईन, तमुक मिळालं की, मी मनासारखं जगेन, ढमुक पार पडलं की, मोकळा श्वास घेईन, अशा अमुक - तमुक - ढमुकच्या खुंटीला आपला आनंद लटकवून ठेवणे, हे अनेक स्त्रियांच्या बाबत अगदी सहज घडते.

"स्त्री जन्माला येत नाही, तर ती घडविली जाते" इथपासून याची अगदी मूलभूत मनोसामाजिक - आर्थिक कारणं काढत बसता येतील. स्त्री - पुरुष समतेवर एक खापर फोडता येईल. घरातल्या परिस्थितीच्या नावाने एक बाण मारता येईल. अमकीला कसे सगळे आयते, सहजच मिळाले, मला ना असे काही मिळालेच नाही, असा नशिबालाही दोष देऊन टाकता येईल. तुलना, मत्सर, असूया, हेवा, कीव, सहानुभूती, राग, भीती, असहायता वगैरे अशा मनाच्या सगळ्या ट्रीप्स करता येतील. "काय ही स्त्री जन्माची कहाणी" म्हणत रडत बसता येईल. स्त्रीचे शरीरच कमकुवत, असा तथ्यहीन वाद घालता येईल. निसर्गच जिथे अन्याय करतो, तिथे बाकीच्यांचे काय, इथवर तो वाद ताणता येईल!

(Image :google)

हे सगळं करून आपण आपली कीव फक्त करत बसू आणि ती मागच्या पानावरून पुढे सुरूच राहील. आपला आनंद कोणकोणत्या खुंट्यांवर लटकवला जाईल. म्हणजे मग स्वतः स्वतःला आनंदी करायची जबाबदारी संपली.
आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या मनासारखे वागले की, मी आनंदी होणार, हा एक सापळा आहे. आपला आनंद कायम दुसऱ्याच कुणाच्या पार्किंग लॉटमध्ये नेऊन ठेवायचा नाही.


आनंदी होण्यासाठी उपाय काय?

१. आपल्या एखाद्या छोट्याशा इच्छेपासून सुरुवात करूया. एकदम मोठी उडी न मारता लहानसे काहीतरी टार्गेट आखून घेऊ. अगदीच एखाद्या दिवसाचे किंवा एका महिन्यात साध्य करू शकू असे.
२. कोणावरही अवलंबून न राहता हातातल्या गुगलच्या मदतीने जे काही शोधता येईल, ते करायचं. आणखी माहिती हवी असेल, तर तशी माणसे / व्यवस्था शोधायची. नीट होमवर्क करून ते काम करायचे. मग ती घरातली लहानशी खरेदी असेल किंवा एखादी गोष्ट शिकावीशी वाटत असेल. छोटा प्रवास असेल... माहिती घ्यायची, टप्पे आखायचे आणि ती गोष्ट करून टाकायची!
३. आणखी एक अडसर पार करायला हवा. समोरच्याने आपल्याला समजून घ्यावे, असे आपल्याला सतत वाटत असते. पण, आपले मन ऑटोमॅटिकली दुसऱ्याला कसे कळेल? त्यात आपल्याला मनातले सगळेच्या सगळे पण कुणाला सांगायचे नाही. निवडक गोष्टीच सांगायच्या आणि त्यावर तातडीने उत्तरे हवी. आपले दोष आपण क्वचितच पाहणार आणि समोरच्याला आपल्या मनातले कळत नाही म्हणून रुसून बसणं, अबोला धरणं, परस्पर भावना दुखावून घेणं तितकंसं उपयोगाचं ठरत नाही. नात्यातली गुंतागुंत अजून वाढते आणि नाही बोलत तर नाही, गेले उडत अशा ट्रॅकलादेखील मैत्री - नाते जाऊ शकते. म्हणूनच रुसवे - फुगवे - गेम्स खेळण्यापेक्षा मनातले मोजक्या शब्दांत, योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीकडे व्यक्त करता येणं हे शिकायला हवं.

(Image : google)

४. नवीन रेसिपी शिकताना जी धडपड करतो आपण, नव्याने गाडी शिकताना जसा स्वतःला वेळ देतो, तसंच मनातलं नीट आणि नेमकं सांगता येण्यासाठी वेळ घ्यायला हवा. कुटुंबात कोणत्याही विषयावर बोलता येणं, यासारखा दुसरा मानसिक आधार जगात कुठेही नाही!
५. सगळं जमलं तरी कामं टाळण्याची एक सवय असते. चालढकल, टंगळमंगळ, करू - होईल - बघू, असं म्हणत कामं टाळण्यामागे एक अनामिक भीती असते. आपण करायला जाऊ आणि आपल्याला ते झेपणार नाही, चुकलं तर काय, नाही जमलं तर काय, असं वाटतं, त्यावर एकच उपाय ते काम करून बघायचं. ते करताना किंवा करण्यापूर्वी स्वतःबद्दल ज्या शंका निर्माण होतात, त्यांना अडथळा म्हणून न बघता फॅक्ट म्हणून बघता आलं तर जे येत नाही त्यावर मात करायचे टप्पे दिसू लागतात. हळूहळू भीती कमी होते. कालांतराने ती निघून जाते. भीती कमी होते, तसा भीतीला चिटकून येणारा ताणदेखील नाहीसा होतो. "अरे, हे तर सोप्पे आहे", "काय मजा येतेय हे करताना" असे टप्पे दिसू लागतात.
६. अंधारातून गाडी जाते, तेंव्हा आपल्यापुरता प्रकाश सोबत घेऊन जाते. तसाच आपल्यालादेखील मार्ग दिसू लागतो. आपली लहानशी विशलिस्ट बनवणे, काम न टाळता, न कंटाळता करणं, इतका सोपा नव्या वर्षाचा आनंदी होण्याचा मंत्र असू शकतो.

(लेखिका पर्यावरण आणि मानसशास्त्र याविषयातील तज्ज्ञ आहेत.)
prachi333@hotmail.com

Web Title: how to be a happy, how to lead a happy and fruitful life, who is responsible for our happiness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.