रोजचे तेच ते काम घर, जबाबदाऱ्या यांमुळे आपण अनेकदा शरीराने आणि मनाने थकून जातो. अशावेळी आपल्याला काहीतरी चेंज असावा असे वाटते. त्यात बाहेर असणारे कडक ऊन आणि उकाडा या वातावरणामुळे तर आपण आणखीनच उदास होतो. पण आपले मन उदास असेल तर आपल्याला काहीच करावेसे वाटत नाही. आपण कसातरी आला दिवस ढकलत राहतो. पण असे होऊ नये असे वाटत असेल आणि सतत आनंदी राहायचे असेल तर आपणच आपल्य़ाला बूस्ट करणे गरजेचे असते. (How To Be Energetic in Summer) यासाठी रोजच्या जगण्यात काही सोपे बदल केल्यास आपण स्वत:ला आतून आणि बाहेरुन आनंदी ठेऊ शकतो. हे उपाय कोणते ते समजून घेणे आवश्यक आहे.
१. फिरायला जा
शहराच्या आजुबाजूला असणाऱ्या टेकड्या, किल्ले, धरणे अशा निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या ठिकाणी किमान २ दिवस जाऊन या. मोकळ्या हवेत, मोकळ्या वातावरणात गेलात की नकळत फ्रेश वाटेल. रोजच्या रुटीनमधून थोडा आराम मिळाल्यने मन आनंदी व्हायला मदत होईल. थोडी मोठी सुट्टी मिळणे शक्य असेल तर दुसऱ्या शहरात, राज्यात अशी एखादी ट्रिप करुन या.
२. खरेदी करा
खरेदी हा आपला मूड फ्रेश करण्याचा एक उत्तम उपाय असू शकतो. कपडे, दागिने, कॉस्मेटीक्स किंवा अगदी घरातील गरजेच्या किंवा शोभेच्या वस्तू यांची खरेदी करा. त्यामुळे तुम्हाला आतून आनंदी वाटू शकते. नवीन गोष्टी घेतल्याने अनेकदा आपण खूश होतो. काही घ्यायचे नसेल तर नुसती विंडो शॉपिंग करुनही आपल्याला आनंदी वाटण्याची शक्यता असते.
३. आपल्या आवडीच्या गोष्टी करा
अनेकदा रोजची नोकरी, घर-जबाबदाऱ्या यांमध्ये आपल्या आवडीच्या गोष्टी मागे पडतात. पण काही दिवस सुट्टी घेऊन किंवा नोकरी सांभाळून आपले मागे पडलेले छंद नव्याने जोपासा. यामध्ये डान्स क्लास, गाणे किंवा एखाद्या वाद्याचा क्लास, चित्रकला किंवा अभिनय अशा विविध गोष्टींचा समावेश असू शकतो. यामुळे तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटू शकते.
४. मित्रमंडळींशी बोला, त्यांना भेटा
रोजच्या व्यापात अनेकदा आपण मित्रमंडळींशी संवाद साधायला विसरतो. पण मित्रमंडळी हे आपल्यासाठी टॉनिक असू शकतात. मित्रांशी गप्पा मारल्याने, त्यांच्यासोबत काही विनोद केल्याने आपल्याला फ्रेश वाटू शकते. त्यामुळे शक्य होईल तेव्हा मित्रमंडळींना भेटायला हवे. भेटणे शक्य नसेल तर किमान त्यांच्याशी फोनवर मनमोकळ्या गप्पा मारा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल.