Join us  

जेवण झालं? जा, भांडी घासून घे!- भांड्यांसारखं आपलं मन कसं घासूनपुसून लख्ख होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2022 2:26 PM

प्रभात पुष्प : किती लडबडलेलं असतं आपलं मन, ते कसं स्वच्छ होणार?

ठळक मुद्देआपलं मन असं स्वच्छ-लख्ख करता यायला हवं.. निदान प्रयत्न तरी करू..

अश्विनी बर्वे

नुकतीच मी एक झेन गोष्ट वाचली. त्यात एक शिष्य आपल्या गुरूकडे येतो आणि म्हणतो की मला साधना शिकवा. गुरू विचारतात, “ तू जेवलास का?” शिष्य म्हणतो, “हो”गुरु म्हणतात, “मग जा भांडी घासून घे.”शिष्य म्हणतो, “बरं” आणि त्याला साक्षात्कार होतो.मी प्रथम ही गोष्ट वाचली, तेव्हा मला वाटलं ही मी रोज भांडी घासते आहे आणि मला काहीच साक्षात्कार होत नाही? हे कसं बुवा.पण झेन तत्त्वज्ञानात सांगितलेल्या गोष्टी वरून जितक्या साध्या दिसतात, तितका गहन अर्थ त्यात लपलेला असतो. तो आपल्याला समजून घ्यावा लागतो. म्हणून मग ही गोष्ट ज्यांनी मला सांगितली, त्यांनाच मी विचारलं की याचा अर्थ काय?

(Image : Google)

तर ते म्हणाले, गुरुजींनी जेवला का? असं विचारलं. म्हणजे तुला ज्ञान म्हणजे काय हे कळलं का? की फक्त शब्दांची घोकंपट्टी केली आहेस? समोर जे आहे ते तसं तुला दिसतं का? खरा अनुभव घेतला आहेस का? अभ्यास झाला आहे का? असा त्याचा अर्थ होतो.भांडी घासून टाक म्हणजे, जे काही ज्ञान म्हणून तुझ्याजवळ आहे, ते ‘आपलं’ म्हणून स्वतःजवळ बाळगू नकोस. जा ते घासून स्वच्छ कर. भांडी घासली की त्याच्यात काय शिजवलं होतं. ते सगळं निघून जातं. त्याचा वाससुद्धा त्यात राहत नाही. तसा स्वच्छ होऊन ये.आपण आपलं मतं, विचार आणि काय काय हे सगळं पकडून ठेवतो. ते सगळं घट्ट धरून ठेवल्यानंतर दुसरं कसं दिसेल? म्हणून काय काय धरून ठेवणारं आपलं मन, त्यात कितीतरी कचरा साठून राहिला आहे. ते स्वच्छ करायला हवं. चावचाव करणारे, मनात दंगा करणारे विचार बाजूला सारले नाही तर आनंद कसा सापडणार?जा, भांडी घास याचा हा असा अर्थ.भांडी घासण्यात एवढा विचार आहे हे कळलं की वाटतं, आपलं मन असं स्वच्छ-लख्ख करता यायला हवं.. निदान प्रयत्न तरी करू..ashwinibarve2001@gmail.com

टॅग्स :मानसिक आरोग्य