आपल्याला एकदा राग आला सहन होत नाही. मग रागाच्या भरात एकमेकांना शिव्या देणे, वाटेल ते बोलणे, प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत गोष्टी जातात. हा राग कंट्रोल न झाल्याने आपल्या आयुष्यात नको ते प्रसंग आणि घटना घडून बसतात. नंतर आपल्याला त्याचा पश्चातापही होतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असल्याने आपण काहीच करु शकत नाही. वेळच्या वेळी रागावर ताबा मिळवता (How To Control Anger) आला तर ठिक आहे. नाहीतर आपले दैनंदिन जीवन अवघड होऊन बसते. आपल्यला खूप राग येतो तेव्हा शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्सची संख्या वाढते. यामुळे आपले टेन्शन तर वाढतेच पण यामुळे बीपीची समस्याही वाढते. यामुळे ब्रेन हॅमरेज आणि ब्रेन स्ट्रोकची समस्या वाढते. या परिस्थितीपासून वाचायचे असेल तर कमीत कमी रागराग करणे आणि जास्तीत जास्त आनंदी राहणे आवश्यक आहे हे लक्षात घ्यायला हवे. पाहूयात राग कमी करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत...
१. नियमीत व्यायाम करावा
व्यायाम केल्याने शरीरातील स्ट्रेस हॉर्मेन्स कमी होण्यास मदत होते. हे हॉर्मोन्स कमी झाले तर आपण आनंदी राहू शकतो. त्यामुळे नियमीतपणे काही ना काही व्यायाम आवर्जून करायला हवा. यामध्ये अगदी नुसते चालण्यापासून ते जीम, योगा, अॅरोबिक्स यांसारखे विविध व्यायामप्रकार तुम्ही करु शकता. यामुळे आपल्या रागाचे प्रमाण आणि तीव्रता दोन्ही कमी होण्यास मदत होईल.
२. ध्यान करायला हवे
ध्यान करणे हा अनेक गोष्टींवरील उत्तम उपाय आहे. ध्यानामुळे आपले मन एकाग्र होण्यास मदत होते. डोक्यातील विचार काही प्रमाणात कमी होऊन आपले मन आणि मेंदू शांत होण्यास याची चांगली मदत होऊ शकते. त्यामुळे नियमीतपणे ध्यान करणे फायद्याचे ठरु शकते.
३. दिर्घ श्वसन करावे
खूप राग आला की दिर्घ श्वसन करायला हवे. त्यामुळे आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग आला असेल तर तो जाण्यास मदत होते. आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली आणि आपल्याला खूप राग आला तर त्यावर प्रतिक्रिया न देता दिर्घ श्वास घ्यायचा. त्यामुळे आपल्या मनातील भाव बदलण्याची तसेच हार्मोन्सचे संतुलन राखण्याची क्रिया घडते. यामुळे रागाच्या भरात अपशब्द उच्चारण्यावर नियंत्रण येऊ शकते. त्यामुळे हा सर्वात सोपा आणि सहज कोणालाही करता येण्याजोगा उपाय आहे.
४. संगीत ऐकणे
संगीत ऐकणे हा रागावर नियंत्रण मिळवण्याचा एक उत्तम उपाय आहे. मोकळ्या वेळात मोटीव्हेशनल किंवा भक्ती संगीत ऐकल्याने आपला मूड फ्रेश होतो आणि आपण आनंदी राहू शकतो. यामुळे एखाद्या गोष्टीवरील रागाची भावना कमी होऊन आपण आनंदी आयुष्य जगू शकतो. आपल्या मनाविरुद्ध काही घडत असल्यास अशावेळीही आपल्या आजुबाजूला संगीत लावून ठेवणे आवश्यक आहे हे लक्षात घ्यायला हवे.