सुचेता कडेठाणकर
रात्री झोपताना हमखास किंवा दिवसभरात सुद्धा अनेकदा मधूनच मनात नको ते विचार सुरु होतात. असं होतं का? आपल्या आरोग्याला काही धोका नाही ना, एखादा आजार आई वडिलांना असेल तर मलाही वयोमानापरत्वे हा आजार होणार नाही ना, हा आजार होऊ नये म्हणून मी नेमकं काय करायला हवं. किंवा माझ्या मुलांचं कसं होईल, किंवा पुरेसे पैसे कसे मिळवता येतील, माझं आणि माझ्या कुटुंबाचं आयुष्य आणि भविष्य सुरक्षित कसं ठेवता येईल. या सगळ्या विचारांकडे लक्ष देऊन पाहिलं तर कळतं की हे सगळे विचार भविष्याबद्दलचे असतात. मनाला वर्तमानात ठेवणं गरजेचं आहे, हे तर आता प्रत्येकाला माहीत झालं आहे. पण कितीही ठरवून आपल्याला ते जमतेच असे नाही (How To Control on Thoughts 1 Easy Remedy).
ही काळजी त्रासदायक केव्हा होते?
१. अशा भविष्याबद्दलची काळजी, चिंता वाटणं सहाजिक आहे आणि काही अंशी, ही आपल्याला उत्तम काम करायला प्रवृत्तही करते. त्यामुळे प्रत्येक काळजीचा विचार दूर करायला हवा असं आजिबात नाही.
२. परंतु, भविष्याच्या काळजी आणि चिंतेची ही मालिका जर आपल्या वर्तमानात डोकावू लागली आणि त्यामुळे वर्तमानातले आपले नातेसंबंध आणि आरोग्य यांवर परिणाम करु लागली तर मात्र याला अतिविचार किंवा विनाकारण केला जाणारा विचार असं म्हणावं लागेल.
हे विचार टाळायचे कसे?
१. मुळात माझ्या मनात असे नकारात्मक विचार येताच कामा नयेत, असा आग्रह सोडून देऊ. कारण सतत धावणं हेच मनाचं लक्षण आहे. विचार येणार पण त्या विचारांचा परिणाम मी माझ्यावर होऊ देणार नाही, असा दृष्टीकोन ठेवू, म्हणजे आपली उर्जा या त्रासदायक विचारांना दूर ढकलण्यावर खर्च न होता, त्याचा परिणाम होऊ न देण्यासाठी स्वतःभोवती भक्कम तटबंदी बांधण्यावर खर्च होईल.
२. या तटबंदीमध्ये सर्वाधिक महत्वाचा आहे, शारिरिक व्यायाम, योग, पोहणे, चालणे, धावणे, सायकलिंग यासारखा कोणताही शारिरिक व्यायाम लगेच सुरु करु आणि तो नियमित करु. नियमिततेमुळे स्वतःला शिस्त लागते आणि शिस्तबद्ध मनुष्य बरेचदा मानसिकरित्या सक्षम असतो. बाहेर जाऊन व्यायाम करणे वेळे अभावी शक्य नसेल, तर हल्ली उत्तम पद्धतीने घेतले जाणारे अनेक ऑनलाईन योगवर्ग आहेत.
३. प्राणायाम, ध्यान या गाष्टींचा दैनंदिन जीवनात समावेश आवश्यक आहे. सुरुवातीला कदाचित कंटाळा येईल. पण तरीही कंटाळा करत करत करा, काही हरकत नाही. त्याचे जादुई परिणाम दिसू लागले, की आपोआप करावंसं वाटेल.
विचारांवर नियंत्रण मिळवण्याचे एक सोपे सूत्र
कामाच्या दिवसाची सुरुवात करताना आपण ऑफिसमध्ये जाऊन ऑफिसच्या नेटवर्कवर लॉग-इन करतो आणि काम संपलं की लॉग-आऊट करतो. स्वतःच्या मनात येणाऱ्या विचारांच्या मालिकेत आपण सतत लॉग-इनच असतो. पण मनात चालू असलेल्या विचारांच्या मालिकेमधून लॉग-आऊट होण्याची किल्ली नेमकी कोणती, हे माहीत असायला हवे. त्यासाठी एक युक्ती आहे. बरेचसे खेळाडू स्वतःचा फोकस वाढवण्यासाठी काहीतरी कृती किंवा मुद्रा करतात. म्हणजे, टाळी वाजवणे किंवा बॅट अथवा रॅकेट उंच करणे असं काहीतरी, ती त्यांची किल्ली असते. अशी विचारांमधून लॉग-आऊट होण्याची किल्ली ठरवून टाका. माझ्यासाठी मी अशी एक किल्ली ठरवली आहे. हलकेच शीळ वाजवायची, मला शीळ घालता येते. जेव्हा मला लक्षात येतं की विचारांची गाडी भरघाव वेगाने भविष्यात धावू लागलेली आहे, तेव्हा मी शीळ वाजवते. गाडी एकदम वर्तमानात येते. सुरुवातीला मुद्दाम मध्ये मध्येच शीळ वाजवायचे आणि स्वतःला बजावायचे की शीळ म्हणजे वर्तमानात येण्याची खूण. एकदा मेंदूला हे कळलं की ही युक्ती मस्त काम करते. तुम्ही पण अशी एखादी किल्ली शोधा स्वतःसाठी, आणि बघा हे विचार आटोक्यात येतात की नाही.
(लेखिका योगतज्ज्ञ आहेत.)
वेबसाईट - www.kohamfit.com
संपर्क - 744 781 5781 (फक्त व्हॉट्सअॅप)